मी लोकशाही बोलतेय - दर्पण

Wednesday, June 8, 2011

मी लोकशाही बोलतेय

नमस्कार
अशक्त का असेना तुम्हाला बोलण्याइतपत माझ्यात शक्ती थोडी शिल्लक आहे.ज्या देशात माझा गौरव झाला, ज्या देशाचा मला अभिमान वाटायचा आणि त्याचा देशात माझ्याच रखवालदारांनी माझा गळा घोटण्याचे काम केले आहे अशी मी लोकशाही बोलतेय ........
माझे वर्णन करताना असे म्हणतात कि , लोकांनी, लोकांच्यासाठी आणि लोकांकरिता अशी केली होती परंतु भ्रष्ट नेत्यांनी त्यात बदल केलाय "स्वत :, स्वत:चे खिसे भरण्यासाठी देशहिताला हरताळ फासून जमेल त्या मार्गाने पैसा मिळवायला कशाचीही भीती नसलेली व्यवस्था असे झाले आहे. लोकहो , या भ्रष्टाचाराने मला खिळखिळे करून टाकले आहे.माझ्या रखवालदाराच या भ्रष्टाचाराचे रक्षणकर्ते आहेत. कायद्यातील पळवाटा शोधून घटना व कायदे यांना हाताचे बाहुले करून टाकले आहे. देशाचे समाजाचे अपराधी आज उजळ माथ्याने फिरत आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या अपेक्षेने माझा स्वीकार केला गेला तो आज सपशेल धुळीस मिळाला आहे. माझे स्वप्न दिवास्वप्नच ठरले.आता या देशात माझा श्वास गुदमरतो आहे.सामान्य नागरिकाची वाताहत आता मला पाहवत नाही. त्याला स्वातंत्र्याचे फळही तर मिळाले नाही हालअपेष्टा काही कमी झाल्या नाहीत. शासनाने केलेल्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचताच नाहीत. टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय साहेब कामच करीत नाहीत. हीच का माझी व्यवस्था ?
गरिबांचे बिनदिक्कतपणे शोषण करताना यांना कोणाचीही भीती वाटत नाही. कुठल्याही कायद्यातील शिक्षा यांना काहीही करू शकत नाही हे माझे दुर्दैव.हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणारे देशभक्तीची, समाजसेवेची मोठमोठी भाषणे देतात तेव्हा माझ्या अंगाची लाही लाही होते. भारत हा कृषिप्रधान देश. शेतकरी हा अन्नदाता आहे. परंतु जसे एखाद्या स्त्रीचे नाव लक्ष्मीबाई ,पण वास्तविक तिला रोजचे खायचेच वांदे. अगदी तसेच शेतकरी राजाला अतोनात कष्ट करूनही त्याचे चीज काही होत नाही. खत, बियाणे, वीज आणि उरलासुरला सावकार शेतकऱ्याला पिळवटून टाकतो. त्यांना आत्महत्या करताना पाहून माझी मलाच लाज वाटते. गांधीजीनी स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंग केला. आता कायदेभंग रोजच होतो आणि तो फक्त स्वार्थासाठी,पैसे खाण्यासाठी, देशाला लुटण्यासाठी.
समान न्याय हा माझा प्राण, पण इथे तर पैशाच्या जोरावर न्याय ठरतो. सेलेब्रिटी उच्च्चभ्रू, राजकीय वरदहस्त असणारी मंडळी आणि सामान्य नागरिक या वर्गवारीनुसार न्याय ठरतो. माझ्यासाठी याहून वाईट परिस्थिती कोणती असू शकेल.
आताच स्वामी रामदेव बाबा नावाचा संन्याशी हजारो लोकांना घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध तसेच विदेशातील काळी संपत्ती परत आणण्यासाठी सत्याग्रह करत होता. महात्मा गांधीनी दिलेल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने हे आंदोलन चालू होते. पण बाबांना हे माहित नव्हते कि शारीरिक व्याधी मिटवण्यासाठी योगासन, प्राणायाम आहेत. पण देशभक्ती वाढवण्यासाठी, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी जगात कुठलेही आसन नाही. व्हायचे तेच झाले रात्री १.३० वाजता पोलिसी बलाचा वापर करून आंदोलक महिला, बालक,यांच्यावर अमानुषपने लाठीचार्ज केला. अफजल गुरु, अजमल कसाब यांना जावायाप्रमाने पोसणाऱ्या सरकारला निशस्त्र, निरपराध देशभक्तांना मारहाण कार्यात काहीच वाटले नाही.काय गुन्हा होता त्यांचा ? केवळ देशातील भ्रष्टाचार मिटावा म्हणूनच होते ना हे सारे , परंतू माझ्याच व्यवस्थेत माझ्या अधिकारांचा दुरुपयोग केला गेला.देशाचे पंतप्रधान म्हणतात कि याच्याशिवाय पर्याय नव्हता.
माझी लक्तरे वेशीवर टांगणारा हा नंगानाच मी हतबलतेने बघत होते . ज्यावेळी संसदेत उघडपणे खासदारांचा घोडेबाजार झाला, गरीब शेतकरी, कष्टकरी आत्महत्या करत होता आणि जाणता राजा म्हणवणारे आय पी एल मध्ये गुंग झाले होते तेव्हा माझ्या काळजात चर्रकन झाले आणि तरीही मी बघतच होते.सामान्य नागरिकाला भ्रष्ट व्यवस्थेला तोंड देतादेता जीव मेटाकुटीला आला असताना माझे अंत:करण पिळवटून जाते आहे आणि तरीही मला हे बघावेच लागते आहे. अफजल गुरु, कसाबला एशोआराम तर सत्याग्रहीना लाठी मारणारे तसेच भ्रष्टाचारी, गुन्हेगार यांना अभय देणारे मला पंगुत्व आणत आहेत हे सुद्धा मी बघतच होते.
पण आता मात्र हे सहन होत नाही. माझ्याच नावावर मला काळीमा फासणे मला आता मान्य नाही. पुरे झाले माझे हाल म्हणून सज्जनहो माझ्यासाठी थोडे काही कराल का ? मला यःची जाणीव आहे कि तुम्ही दैनंदिन गरजा भागवण्यातच व्यस्त असता, परंतु वास्तविकता हीच आहे कि तुमच्याशिवाय आता कुणीही मला वाचवू शकत नाही. वाचाळ व्यक्ती, निश्क्रीय बुद्धीमत्ता यांच्याने हे काम आता होणार नाही.तुमचे एक पाउल मला संजीवनी देईल.सज्जनांचे संघटन उभे करा त्यात सहभागी व्हा. अन्यायाचा वेळोवेळी प्रतिकार करा. तुम्ही गप्प राहिलात तर दुर्जन सक्रीय होतील आणि त्यासोबतच मला कायमचे संपवतील, असे होऊ नये असे वाटत असेल तर पुढे या हीच योग्य वेळ आहे. माझा विश्वास खोटा ठरवू नका.मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणारी उज्ज्वल परंपरा या देशाला आहे त्याचे आणि त्यांच्या कार्याचे विस्मरण होऊ नये यासाठीच हा पत्रप्रपंच.

आपलीच
अस्तित्वासाठी झगडणारी लोकशाही

No comments: