शिक्षक या पदाचे वाढते अवमूल्यन - दर्पण

Thursday, June 30, 2011

शिक्षक या पदाचे वाढते अवमूल्यनसृष्टीची निर्मिती झाल्यापासून संबंध मानवजातीत माणूसपण आणण्यासाठी , ज्ञान देऊन प्रगल्भ करण्यासाठी गुरु, शिक्षक हि संस्था ज्ञानदान करत आलेली होती .त्यासाठी आवश्यक अभ्यास ,चिंतन करून इतरांना ज्ञान देण्यासाठी कष्ट करण्याची समर्पित वृत्ती असणारे ते एक चालते बोलते 
विद्यापीठ होते. बोले तैसा चाले याचा एक आदर्श वस्तुपाठ होते. मानवाच्या प्रगतीसाठी संशोधन करून विविध शास्त्रांचा विकास व्हावा हा निर्मळ हेतू त्यामागे होता. नैतिक मुल्यांची जपणूक तर त्यांच्या जगण्याचे मुलभूत अधिष्ठान होते. त्यामुळे समाजातील नैतिक व सांस्कृतिक वातावरनाचे नेतृत्व शिक्षकांकडे होते. थोडक्यात काय तर त्यागी वृत्तीचा शिक्षक, प्राध्यापक हा सृजनशील समाज निर्मितीचा पाया होता.
आता होता म्हणावे लागतेय हे आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. हा वारसा साने गुरुजींपर्यंत पाळला गेला. पण नंतरच्या काळात मात्र या अभेद्य किल्ल्याचे बुरुज हळूहळू ढासळत गेले आणि सध्याच्या या शोर्टकर्टच्या जमान्यात तर शिक्षक, प्राध्यापक संस्थेचा पार धुव्वा उडाला आहे. हे चिंतन व्हायला कारणीभूत झाली ती गोंदिया जिल्ह्यातील धाबे पवनी येथील घटना. तेथे एका शिक्षकाने व्ययक्तिक वादातून आपल्या शिक्षक सहकारयाला मारण्यासाठी चक्क विद्यार्थ्यालाच सुपारी दिली. तसेच बीड येथील राजस्थानी विद्यालयातील घटना. येथे शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना पकडले. शिक्षक या संस्थेचे किती खालच्या स्तरापर्यंत स्खलन झाले आहे याची हि प्रातिनिधिक घटना. हि एकच नाही तर शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या अश्या घटना आता काही नवीन राहिल्या नाहीत. विद्यादान हे वृत्त म्हणून स्वीकारणारे कुठे आणि विद्यार्थ्यालाच सुपाऱ्या देणारे हे निर्ल्लज कुठे ? " विद्यार्थ्याला घडवणे म्हणजे राष्ट्रनिर्मिती करायची असते " अशी वाक्ये आता पुस्तकात देखील सापडणार नाहीत. परीक्षाकेंद्रित शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी प्रगल्भ होण्याची दूरवर कुठेही शक्यताच नाही. विद्यार्थ्यांसमोर मोठमोठी नैतिक मूल्यांचे भाषण देणारे प्रत्यक्षात वेगळाच आदर्श निर्माण करण्यात मग्न असतात. आचरण शुद्धता हे केवळ स्वप्न रंजन बनले आहे.माझा विद्यार्थी पास होण्याबरोबरच तो राष्ट्राचा एक सक्षम नागरिक बनला पाहिजे या ऐवजी मला जास्तीत जास्त मोकळा वेळ आणि पगार कसा मिळेल याचीच चिंता अधिक वाटते.
आपण समाजाला उत्तरदायी आहोत याचे जराही भान नाही. समाज आपल्याकडे बघून बरे-वाईट ठरवतो याचे ओझे वाटायला लागते. केवळ पदोन्नती साठी आदर्श शिक्षक पुरस्कार अक्षरश: विकत घ्यायचा. त्यासाठी पुरस्कारांची निवड करणाऱ्यांना नाना प्रकारे खुश करायचे. असले प्रकार सर्रास होतात. सरकार दरबारी तर पुरस्काराची विक्री करून औपचारिकता पार पाडली जाते. सहावा वेतन आयोग मिळवण्यासाठी संप करतात पण विद्यार्थ्यात गुणवत्ता निर्माण करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याची उदाहरणे क्वचितच सापडतील. संशोधन तर निव्वळ पदवीसाठीच होते. असे संशोधन समाजास कसे उपयोगी पडणार.
देश घडवणाऱ्या या शिक्षण क्षेत्रातील अंदाधुंदीला विविध घटक जबाबदार आहेत. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अर्थातच शासन आणि हे धोरण ठरवणारे तथाकथित तज्ञ. गुणवंत विद्यार्थी आणि त्यांना घडवणारे शिक्षक या दोघांची निर्मिती प्रक्रिया मुळापासून तपासण्याची गरज आहे. हि सदोष यंत्रणा आजच्या या भयान परिस्थितीला कारणीभूत आहे. डिग्री मिळवली कि झाला तो सुशिक्षित. त्याने ती कशीहि मिळवलेली असो हा पायंडा घातक आहे. आपल्याकडील शिक्षणसम्राटांचे डिग्री वाटण्याचे कारखाने अगोदर बंद झाले पाहिजेत. ज्याच्याकडे पैसा तो डिग्री विकत घेतो आणि क्षमता असूनही गुणवंत विद्यार्थी उच्च शिक्षणास मुकतात. परिणामी कौशल्य असूनही अनेक संधीवर पाणी सोडावे लागते. शिक्षक व प्राध्यापक याना नोकरी देतानाही शिक्षणसम्राट सौदे करतात. एकूण काय पैसे दिले कि डिग्री आणि नौकरी दोन्हीही मिळतात. मग या प्रक्रियेतून येणारे आदरणीय शिक्षक व प्राध्यापक किती दर्जेदार असतील हे सांगायला कुण्या ज्योतिषाची अजिबातच गरज नाही.
शासनाचे शैक्षणिक धोरण हे त्या त्या वेळच्या शासन कर्त्यांचे शिक्षण तज्ञ ठरवतात.गुणवत्ता कि सार्वत्रिकीकरण यातला सुवर्णमध्य आपल्याला अजूनपर्यंत काढता आलेला नाही. दूरदृष्टी व सर्वसहमतीच्या अभावामुळे असे धोरण निरुपयोगी ठरते. आणि म्हणूनच ते एवढे तकलादू होते कि त्याला एक दोन वर्षातच गुंडाळावे लागते. नवीन सरकार, नवीन तज्ञ , नवीन धोरण या खेळात शिक्षण व्यवस्थेचा मात्र बोजवारा उडालेला दिसतो. परंतु या मुळापासून उखडून टाकणाऱ्या वादळातही बोटावर मोजण्या इतके का असेना काहीजण आजही साने गुरुजींचा वारसा चालवत आहेत.
मला वाटते , प्रश्न फक्त शासनस्तर किंवा शिक्षक यांच्यापुरता मर्यादित नाही तर तो व्यवस्थेतील प्रत्येकाच्या उत्तरदायित्वाचा, जबाबदरीचा आहे . आधुनिक होण्याच्या नादात आपण एवढे बेधुंद झालो कि शिक्षण व्यवस्थेला आधार असणारया विविध घटकांचा नाश होत आहे याचेहि आपल्याल्या भान नाही. नाशिक जिल्ह्यातील घटना हि याचीच परिणीती. आज राष्ट्र घडवण्याचे पवित्र कर्तव्य बजावणारे शिक्षक हवे आहेत. समाजाला सांस्कृतिक नेतृत्व देणारे शिक्षक हवे आहेत. नैतिक मुल्यांची जोपासना करून आदर्श चरित्र निर्माण करणारे शिक्षक हवे आहेत. दु:ख वाटते कि हि परिस्थिती बदलण्याची गरजच वाटत नाही, ज्याना गरज वाटयाला हवी ते उदासीन आहेत आणि ज्यांना वाटते ते हतबल आहेत. देशाची यापेक्षा मोठी शोकांतिका ती काय असू शकेल.

No comments: