बिन पैशाचा तमाशा - दर्पण

Friday, January 20, 2012

बिन पैशाचा तमाशा

महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर पक्षबदल काही नवीन नाही. हा बिन पैशाचा तमाशा हा महाराष्ट्र गेली कित्येक वर्षे पाहत आहे. आपली अडचण झाली म्हणजे पक्षापेक्षा स्वत:च्या मनाप्रमाणे झाले नाही कि घुसमट, अन्याय इ. शब्द वापरून पक्षबदल करायचा धंदा बिन बोभाटपणे चालू आहे.

राज्यात नुकतेच भाजपचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या भावाने बंड केले.भाजपचे आ.प्रकाश शेंडगे पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत.रा.कौ. चे ठाण्यातील आमदार व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.याला उत्तर म्हणून शरद पवार यांनी शिवसेनेचे ठाणे - कल्याण येथील खासदार आनंद परांजपे यांना शिवसेना पक्ष अडचणीचा असल्याची व तसेच राष्ट्रवादी पक्ष विकास करणारा असल्याची जाणीव करून दिली.त्यांनाही हि पटली. आणि मग पुन्हा तीच रटाळ भाषा " विठ्ठलाशी मतभेद नाहीत, बडव्यांचा त्रास आहे" मला यांना एक विचारावेसे वाटते कि , कुठलाही वारकरी बडव्यांचा त्रास होतो म्हणून वारी कधीतरी चुकवतो का ? हि सगळी संधिसाधू वाक्य आहेत. यांचा विठ्ठल वगैरे काही नसतो. प्रश्न फक्त व्यावहारिक फायदा-तोट्याचाच असतो. फायदे -तोटे सगळेच बघतात पण ज्या कार्यकर्त्यांनी यांना निवडून येण्यासाठी रात्रंदिवस एक केली.महत्वाचा वेळ दिला. ज्या मतदारांनी तुम्हाला एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्याचे काय ? त्यांच्या भावभावनांचे काय ? हा जनतेशी,कार्यकर्त्याशी द्रोह नाही का ? 
वाईट याच गोष्टीचे वाटते कि लोकशाहीची हि खिल्ली उडवणे आहे. विकासाच्या फक्त गप्पा मारतात.कुठलीही एक विचारसरणी नाही.विकासाचा अभ्यास नाही. वाटेल ती आश्वासने देत सुटायचे. काल ज्या पक्षाच्या ध्येय धोरणावर टीका केली. त्याच पक्षाच्या नेत्यावर स्तुतीसुमने उधळायची. हा व्यभिचार नाही का ? आणि तोही फक्त व्यावहारिक फायद्यासाठी. खरच खुर्चीची आसक्ती एवढी कि त्याच्यासाठी इतक्या खालच्या स्तरावर लाळघोटेपणा करायचा.खरच देशाचे नेतृत्व यांच्या हातात. हे लोक देशाचा काय विकास करणार.राजकारण म्हणजे गटारच आहे याचा वारंवार प्रत्यय येतोय. आपल्या हातात फक्त हा बिन पैशाचा तमाशा बघत राहणे हेच .देशाचे याहून मोठे दुर्दैव ते काय असू शकते.


No comments: