गुरुजी मिळतील का ? - दर्पण

Friday, January 27, 2012

गुरुजी मिळतील का ?

असे म्हणतात कि, शिक्षकाच्या एका पायात विकास तर दुसऱ्या पायात विनाश असतो. म्हणजेच एका शिक्षकाने ठरवले तर राष्ट्रनिर्माण होऊ शकते आणि शिक्षक बिघडला तर विनाश होण्यासही काही वेळ लागत नाही.सध्या तरी शिक्षक,प्राध्यापक वर्ग वेगाने आपला दुसरा पाय पुढे टाकत आहे. याचा दाखला देणारी घटना नुकतीच औरंगाबाद शहरात घडली.दोन शिक्षकात हाणामारी होऊन त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला.हि एकच घटना नाही तर महाविद्यालय परिसरात मारहाण, प्राथमिक शाळेत लैंगिक शोषण अशा अनेक घटनांनी राज्यातील शिक्षण क्षेत्र हादरवून जात आहे.

समाज कुठल्या दिशेने जात आहे, हे कळण्यासाठी हि उदाहरणे पुरेशी आहेत. हि परिस्थिती बघून शिक्षकीपेशा हा व्यवसाय नसून एक व्रत आहे असे म्हणणे भाबडेपणाचेच ठरेल. कधीकाळी तो होता.साने गुरुजी आता फक्त जयंती ,पुण्यतिथी पुरतेच उरलेत याचा हा सक्षम पुरावा आहे. डी .एड. होऊन संस्थाचालकाला लाखात पैसे देऊन शिक्षकाची नौकरी मिळाल्यावर याहून दुसरे होणार तरी काय ? देशाच्या तसेच समाजाच्या जडण उभारणीत शिक्षकाचे योगदान किती अमूल्य आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. आणि तरीही शिक्षक निर्माण होण्याची प्रक्रियाच किती कुचकामी आहे हेच यानिमित्ताने आपल्या लक्षात येईल.
शिक्षणाचा बाजार करणारे शिक्षण सम्राट हे सुद्धा या जबाबदारीतून सुटू शकत नाहीत पण मुख्य प्रश्न आहे तो शासकीय धोरणांचा. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनीही आपण आदर्श शिक्षक तयार करू शकत नसू तर हे आपले खूपच मोठे अपयश नाही का ? आदर्श शिक्षक होण्यासाठी संस्कारक्षम विद्यार्थी हवेत. इथे तर हजारो रुपये डोनेशन देऊन प्रवेश दिला जातो. या धंदेवाईक शाळा काय संस्कार करणार? फक्त घोकंपट्टी करणारे विद्यार्थीच निर्माण होतील आणि "जीवनात यशस्वी होणे म्हणजे पैसाच कमावणे आणि त्यासाठी वाट्टेल ते करणे " हेच बघतील आणि शिकतील सुद्धा. कारण तिथे आलेले शिक्षक यशाची हीच व्याख्या घेउन त्यांना शिकवणारे असतात. संस्कार होण्याचा दुसरा मार्ग म्हणजे घर, तिथे मम्मी -पप्पा ला वेळ नाही, आजी आजोबा वृद्धाश्रमात आणि मग टी.व्ही......अशा दुष्टचक्रात संस्कारक्षम विद्यार्थी निर्माण होण्याची कल्पना म्हणजे वाळवंटात बसून श्रावणसरीची कविता करण्यासारखे आहे. 
शासनाने शैक्षणिक धोरण ठरवताना शिक्षक हा केंद्रबिंदू मानून त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काही ठोस पाऊले उचलायला हवीत. जेणेकरून देशाचे भविष्य असणारे हे विद्यार्थी अधिक संस्कारक्षम होतील.शिक्षणाचा बाजार थांबवायला हवा. कोणालाही पैसा, सामाजिक स्तर यापैकी कोणत्याही कारणाने शिक्षण,उच्च शिक्षण नाकारले जाऊ नये. या पद्धतीने काही बदल झाले तर आणि तरच २०२० मधील विकसित भारताचे स्वप्न आपण बघू शकू, अन्यथा औरंगाबाद मधील घटना वारंवार घडत राहतील आणि गुरुजी मिळतील का ? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येईल.

No comments: