दुष्काळ संवेदनेचा - दर्पण

Monday, April 15, 2013

दुष्काळ संवेदनेचा


आजपर्यंत दुष्काळ हा फक्त अन्न-धान्याच्या बाबतीत पडत होता. परंतू राज्यातील सद्यस्थितीचे अवलोकन केले असता दुष्काळाने अन्नधान्याच्या सोबत मानवी संवेदनेवर सुध्दा आपला प्रभाव टाकण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट दिसेल. एकवेळ आपण निसर्गाच्या अवकृपेचा सामना धैर्याने करू किंबहुना आजपर्यंत अनेकवेळा आपण ते केलेही आहे.परंतू मानवाच्या संवेदनाच जिथे ओसाड पडत असतील तर हे निश्चितच झोप उडवणारे आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पुरावे शेकडोनी देत येतील पण  ज्या व्यक्तींकडे प्रश्न सोडवण्याचे अधिकार आहेत, क्षमता आहे किमान त्यांनी तरी प्रामाणिकपणे आपली संवेदना संपू देऊ नये .
राज्यात विशेषकरून मराठवाड्यात दुष्काळ नेमेचि येता झाला आहे. इतकी वर्ष झाली या समस्येला तरी अजूनही त्यावर कायमस्वरूपी उपाय निघत नाही. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, दुष्काळ हा आता संवेदनेचा पडला आहे. कारण संवेदना जिवंत असती तर पुढारी,अधिकारी यांनी सिंचनात भ्रष्टाचार केला नसता. संवेदना जागृत असती तर कर्जमाफीच्या पैश्यात घोटाळा झालाच नसता. आपल्या लोभापायी, ओरबाडून घेण्याच्या प्रवृतीपायी शेतकरी आत्महत्या करतो आहे,हजारो कुटंबे उध्वस्त होत आहेत या विचाराने  भ्रष्टाचार करणारा हात कदाचित थांबला असता. पण संवेदना, नैतिक मुल्ये यासारखे शब्द त्यांनी आपल्या आसपासही ठेवले नाहीत. एखाद्या कसायाला सुध्दा लाजवेल इतके संवेदनाशुन्य होतायत ही लोक . 
सामान्य जनतेचे दुर्दैव  हेच की ज्यांना संवेदना नाही ते सत्ता अधिकार पदावर आहेत आणि ज्यांना संवेदना आहेत ते हतबल आहेत. पाण्यासारखे मुलभूत  प्रश्न सोडविण्यासाठी सिंचन, पाण्याचे नियोजन व याव्यतिरिक्त अनेक उपाय आहेत, या क्षेत्रातील अत्यंत तज्ञ मंडळी आहेत मग अडचण काय आहे ? तर फक्त इच्छाशक्ती आणि संवेदनेचा अभाव . प्रश्न सोडवायचा निश्चयच  केला  तर सत्ताधार्यांना कुठलीच कामे अशक्य नाहीत. 
राजकीय पुढारयांच्या आशीर्वादाशिवाय कुठलाही सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करुच शकत नाही. कुठलाही गुंड राजकीय नेत्यांच्या पाठिंब्याशिवाय गुंडगिरी करुच शकत नाही. यासाठी राजकीय नेतृत्व प्रगल्भ, प्रामाणिक नैतिक मुल्ये जपणारे असायला हवे ज्याची आज वानवा आहे.  
 वास्तविक नुसते संवेदनाक्षम असणे ही तर मुलभूत गरज आहे. संवेदनाक्षम असून अडचणींवर मात करता येणे ही परिपुर्ण  नेतृत्वाची खरी कसोटी म्हणता येईल . परंतू परिस्थिती नेमकी याच्या विपरीत दिसते आहे. काही नेते हतबल दिसतात तर काही फार काही गंभीर दिसत नाहीत. संवेदना जागृत असेल, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असे अजिबात नाही. परंतू नेतृत्वात उत्तरोत्तर होत जाणारया  हतबलतेमुळे सामान्य जनता मात्र  अक्षरश : होरपळते आहे. त्यांच्या तोंडचा घास, पाणी हिसकावून घेतले जात आहे. याचा परिणाम म्हणून जर त्यांचा सबंध लोकशाहीवरचा विश्वासच उडाला तर त्यांना दोष देता येणार नाही.
यासाठी आता आवश्यकता आहे ती सामान्य जनतेने, विशेषत : समाजाचे बौद्धिक नेतृत्व करनारयानी थोडे सक्रिय होऊन स्वत: आपल्या शक्यतेनुसार जनहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे तसेच  समविचारी लोकांना संघटित करून लोकशाही मार्गाने राज्यकर्त्यांकडे पाठपुरावा करणे अत्यंत आवश्यक आहे. मला असे वाटते की हेच आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या प्रयत्नात यश नाही आले तरी चालेल परंतू आपण आपले कर्तव्य पार पाडल्याचे समाधान आपल्याला नक्कीच कृतकृत्य करेल. सर्वात महत्वाचे म्हणजे येणाऱ्या पिढीला आपणा एक आदर्श निर्माण करून देऊ शकू . ज्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. आणि सध्याचा संवेदनांचा दुष्काळ निश्चीतच संपून जाईल.          
   
           

No comments: