विवाह सहजीवनाचा आनंद की अपरिहार्यता ? - दर्पण

Monday, June 3, 2013

विवाह सहजीवनाचा आनंद की अपरिहार्यता ?


प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची बाब म्हणजे विवाह.आपल्या आयुष्यातील सुख दु:खाच्या प्रसंगी आपल्यासोबत असणारा आधार आपल्याला मिळतो.याअर्थाने  विवाह हा टर्निग पोइण्टच.इतिहासात डोकावले तर गृहस्थाश्रम हा उदात्त हेतूने सर्जनशील समाजनिर्मिती करणारा टप्पा. उत्तम सहजीवन हाच वैवाहिक आयुष्याचा मुख्य हेतु मानला जातो. पौराणिक दाखले किंवा अगदी साने गुरुजी यांच्या शामची आई या संस्कार ग्रंथातील कुटंबांचा विचार केला तर तत्कालीन समाजजीवनात वैवाहिक जीवनातील सहजीवन किती प्रगल्भ होते याचा प्रत्यय येतो. वैवाहिक सहजीवन निकोप,प्रगल्भ असेल तर कुटुंबातील सर्वाचे आयुष्य एखाद्या हिरव्या ऋतू तील वृक्षाप्रमाणे बहरून जाते. विवाहप्रसंगी विविध परंपरातून परस्पर विश्वास, सहकार्य यांचेच वचन वधूवर यांच्याकडून घेतले जाते. थोडक्यात आदर्श समाजरचनेचा पाया हा कुटंबातील सहजीवनात रचला जातो. हे आठवण्याचे कारण म्हणजे सध्याच्या परिस्थितीत हा पाया हळुहळु निखळत जात आहे. असे म्हणण्याचे धाडस होते कारण सतत वाढत चाललेली तणावग्रस्तता, घटस्फोटाचे वाढलेले प्रमाण, वृध्दांच्या समस्या इ. 
एखादा मुद्दा किती ताणावा अथवा आपला हट्ट खरोखर किती वास्तविक आहे ? आपल्या अपेक्षा ही गरज आहे की निव्वळ सुखसोई ? याचे निरपेक्षपणे मुल्यमापन यशस्वी सहजीवनासाठी अत्यंत गरजेचे आहे. जे वैवाहिक सहजीवन आनंददायी वाटायला हवे तेच नकोसे वाटते याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या अपेक्षा.    परस्परांनी आपल्या साथीदाराची जमेची बाजू आणि कमतरता लक्षात घेऊनच अपेक्षा केल्या तर सहजीवनातील तणाव मोठ्या प्रमाणावर कमी होईल.आधुनिक समाजरचनेत आपल्या व्यावहारिक लालसेपोटी ओरबाडून घेण्याची प्रवृत्ती वाढत जात आहे. आपले आदर्श बदलत चालले आहेत. चांगले असण्यापेक्षा दिसण्याला महत्व येत आहे. भावना जपण्या ऐवजी स्टेट्स जपला जात आहे. परिणामी अवास्तव अपेक्षेपायी ताणतणाव निर्माण होतो आणि मग वैवाहिक सहजीवन बिघडत जाते.  
वैवाहीक सहजीवनातील  प्रगल्भता हरवत चालली आहे. याचे प्रथमदर्शनी कारण वैयक्तिक महत्वाकांक्षा तथा करियर हेच दिसते.अर्थात याचा अर्थ करियर चा विचारच करायचा नाही असा अजिबात नाही. आपला साथीदार अथवा कुटुंबातील इतर यांच्या भाव-भावनांना चिरडून टाकून करियरला प्राधान्य देणे जरा खटकते. मग कुटुंब  आणि करियर यांचा सुवर्णमध्य साधायचा असेल तर थोडा त्याग करावाच लागेल. प्रश्न हा आहे कि हा त्याग  करायला आपण तयार होतो का ? माझे ते सर्व महत्वाचे आणि इतरांचे कमी महत्वाचे हि भावना सहजीवनाला प्रदुषित करते.आपले सर्व खटाटोप आपल्या माणसांना साठीच आहेत हे विसरता कामा नये. त्यांना दुखावून आपण कदाचित चार पैसे, प्रतिष्ठा मिळवूही पण त्याने आपले समाधान कधीच होणार नाही. ज्यांना समाधान वाटत असेल ते स्वता:ची फसवणूक करून घेत आहेत हे मात्र नक्की. आधुनिक वैवाहिक सहजीवनात आपण आणि आपले या ऐवजी मला आणि माझे या दोन शब्दांना विशेष स्थान आहे. यातूनच मग आपल्याला कुटुंबातील सदस्याच्या  समस्या आपल्या वाटत नाहीत. कारण मला काय त्याचे ही भावना दृढ झालेली असते. बर् याच वेळेस केवळ आस्थेवाईकपणे बोलण्याने समस्या अलगद सुटून जाते किंवा त्या व्यक्तीचे खचून गेलेले मन उभारी घेते. वैवाहिक सहजीवनात सुसंवादाने किमान अर्ध्यातरी समस्या निश्चित दूर होतात पण कित्येक ठिकाणी मीच का प्रथम बोलू ? हा प्रश्न घटस्फोट घडवून आणतो. आपली चूक नसताना ही केवळ तणाव कमी व्हावा यासाठी माफी मागणे ही प्रगल्भता आज दिसत वैवाहिक सहजीवन त्याग, समर्पण,सुसंवाद यांची जबाबदारी दोघांवर आहे हे त्यांनी मान्य करावयास हवे. अन्यथा घुसमट, तणाव यांनी सहजीवनास तडे जातात. वैवाहिक सहजीवन यासाठी आवश्यक आहे कारण आपल्या पाल्यांच्या आयुष्याचा यातून विकास होतो. ते अनुकरणप्रिय असल्याने शिकत जातात. आपल्या इतिहासातील तसेच पौराणिक प्रसंगातून याचा आदर्श घेऊन त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करणे आवश्यक आहे. वैवाहिक सहजीवनाने संपुर्ण कुटुंबाचाच उत्कर्ष होतो. याकरिता वैवाहिक सहजीवन यशस्वी होण्यासाठी दोन्ही बाजूंनी  विश्वास, सहकार्य, सुसंवाद आवश्यक आहे. अन्यथा विवाह हा टर्निंग पोइण्ट ऐवजी अपरिहार्यता होईल. 
               
                

No comments: