वारी : स्वान्त सुखाची आनंदयात्रा - दर्पण

Saturday, July 6, 2013

वारी : स्वान्त सुखाची आनंदयात्रा

जय जय विठ्ठल रुखमाई म्हणत पखवाजावर थाप पडली की मन आपोआप त्या मधुर भजनाकडे आकर्षिले जाते. आपल्याही नकळत भूतकाळातल्या त्रासदायक आठवणीच्या गाठी आणि भविष्यातील चिंतेने म्लान झालेला चेहरा एका विलक्षण तेजाने उजळुन निघतो. असे हे मंगलमय वातावरण दिसले की आषाढी एकादशी आली असे निश्चित्पणे जाणावे. वारकरी आणि पंढरीची वारी हे जणू महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचा श्वासच. गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्का, डोक्यावर टोपी आणि खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका अश्या बाह्य आभूषणाने शोभिवंत झालेला वारकरी जीवनाचा एका अदभूत वाटेवर मार्गक्रमण करत असतो.या सर्व बाह्य आभूषणा पलिकडे एक  अंतस्थ चैतन्य कृतार्थतेचा,अनुपम समाधानाचा अनुभव घेत असते. ते चैतन्य आपल्या सनातन आधाराला भेटण्यासाठी वर्षभर आसुसलेले असते. राम कृष्ण हरी हा मंत्र जपत असताना त्या परम चैतन्याचे नित्य स्मरण करत असते. अध्यात्म हे  केवळ प्रत्यक्ष आचरणाचा विषय आहे हि शिकवण संतानी रचलेल्या अभंगातून शिकून तो जगत असतो.त्याचा भक्तियोग
जे जे भेटे भूत ते ते जाणिजे भगवंत
हाच भक्तियोग निश्चित जाण माझा
याप्रमाणे असतो. आपल्या क्षणोक्षणी  दांभिकता,फसवणूक यांच्या वादळाशी सामना करत असताना पांडुरंगावर निस्सिम विश्वास टाकून आपल्या  प्रामाणिकपणाची ज्योत तेवत ठेवतो. कित्येकदा मन बधिर व्हावे असे अनुभव आप्त स्वकियांच्या तर्हेवाईक वागण्याने येतात, प्रपंचाचे चटके बसत असतात तरीही विठ्ठलावर असणारा विश्वास जराही कमी होत नाही. मनातील संवेदनशीलता नष्ट होत नाही. वारकरी प्रारब्धभोग म्हणून त्याकडे पाहतो आणि फक्त सहन करतो . व्यावहारिक अनुभवांनी त्याच्या मनात कुठलेही विक्षेप निर्माण होता नाहीत.कर्म करत राहाणे माझे काम आहे बाकी आपला सारा भार तो विठ्ठलावर सोपवून स्वस्थ असतो. म्हणून वारकरी हा खरोखर कर्मयोगीच.
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणताना
आपले व्यावहारीक कर्तव्य हीच ईश्वराची सेवा आहे अशी त्याची पक्की समजूत असते. त्यामुळे तो आपल्या कर्तव्यात कधी चुकत नाही. असा हा वारकरी आणि भागवत धर्म  अत्यंत साध्या सोप्या पध्दतीने सामान्य जनांना भक्तीचा  मार्ग दाखवत आहे . या भागवत धर्माचा पाया रचणारे संतश्रेठ ज्ञानेश्वर माऊली आणि तीन   भावंडे यांनी समाजाच्या उपेक्षा, अतोनात हाल, सहन केली. या दिव्य बालकांचे मागणेही दिव्यच. पसायदानातील मागणे हे जगाच्या कल्याणासाठी. भागवत धर्माची पताका अवघ्या भुमंडळात डौलाने फडकत आहे कारण संतानी आपल्या आचरणातून शिकवण दिली. तसेच गहन असलेले शास्त्रज्ञान अभंगाच्या माध्यमातून सहज सोप्या भाषेत उपलब्ध समाजाच्या शेवटच्या स्तरातील जीवाला करून दिले. मनुष्यत्वाचा  संपूर्ण विकास भागवत धर्माच्या या शिकवणुकीने झालेला आढळतो. समर्पित भावना हा वाराकार्यातील वारकरयामध्ये असणारा  स्थायी गुण. विशेष उल्लेख याच्यासाठी कि हि समर्पित भावना कुठल्याही व्यावहारिक फायद्यासाठी नाही. तर केवळ  आंतरिक समाधानासाठी. पैसा कमवण्यापलिकडे  काही काही काही विलक्षण असे जगणे आहे. आणि त्याचाच  अनुभव या वारीतील  प्रत्येक जन घेतो. राम कृष्ण हरी जपत, विठ्ठल-विठ्ठल म्हणत उडी मारताना मन पुन्हा तरुण होते.
     सहजीवन हा  वारीचा सर्वात  महत्वाचा गुणधर्म. आज कित्येक जण  काम करताना टीमचा सदस्य होता न आल्याने नैराश्यग्रस्त होतात. वातावरणाशी जुळवून न घेता आल्याने काम उरकणे हीच भावना असते. वारीत मात्र प्रत्येक जण आपल्या सहकारयाशी अत्यंत प्रेमाने व्यवहार करताना दिसतात. 'माउली '  अशी हाक मारतात.  'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ' या रीतीने सर्व वातावरण उत्साहमय असते.
     वारकरी संप्रदायात समानता ठायी ठायी दिसून  येते. गरीब-श्रीमंत, उच्च नीच, पुरुष -महिला असा कुठलाही भेद दिसत नाही. म्हणूनच तर समाजाने वाळीत टाकलेली अनाथ चार भावंडे या संप्रदायाचा आधार झाली, संत तुकारामांचे अभंग लाखो लोकांच्याही वाणीत नित्य येऊ लागतात, नाथ महाराजांच्या चरित्रातून सारे भेदभाव अव्यावहारिक असल्याचा संदेश  मिळ्तो . संत चोखामेळा, संत सावता, संत जनाबाई यांनी दाखवलेल्या भक्तिपंथाचा  मार्ग अनुसरून लाखो वारकरी परमार्थ साधत आहेत. कदाचित यामुळेच वारकरयाला कोणीही बोलावणे पाठवत नाही की निमंत्रण देत नाही तरीही आंतरिक ओढीने पाय पंढरपूर कडे चालत  जातात.वाणी राम कृष्ण हरी जपत जाते. डोळे विठ्ठल दर्शनासाठी आसुसलेले असतात.
        सामान्य जणांना अत्यंत  सहज सोप्या साधनांनी जीवनाची कृतार्थता प्राप्त करून देणारा हा वारकरी संप्रदाय खरोखरच विलक्षण आहे आणि वारी ही तर महाराष्ट्राचे वैभव बनली आहे. जीवा-शिवाच्या भेटीच्या  या  सोहळ्यात या आनंद यात्रेत प्रत्येकाला स्वतःच्या आतील पांडूरंगाचे दर्शन घडावे हीच विठ्ठलाकडे प्रार्थना.  

(हा लेख दैनिक लोकमत च्या मंथन पुरवणीत प्रसिद्ध झालेला आहे.  )                                                                       

No comments: