अस्वस्थ वर्तमान



सन्मार्गाने पैसा कमावत असताना आपले सामाजिक,राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे. आयुष्यात काही जीवनमूल्यांचा स्वीकार करून कठीण परिस्थितीतही आपल्या मूल्यांशी तडजोड न करणे. प्रसंगी की नुकसान सोसावे लागले तरी हसतमुखाने त्याचा स्वीकार करणे अशी नैतिकतेची संकल्पना मानली जाते. ही धारणा आपल्या संपूर्ण आयुष्याचा पाया बनवून सर्वार्थाने परिपूर्ण जीवन जगणारे व्यक्तिमत्वे आजही सर्वत्र पूज्य मानली जातात. अश्या व्यक्तिमत्वांनी आपल्या आचरणाने  आदर्श निर्माण केले. त्यांनी स्वत:च्या सार्वजनिक जीवनात आपल्या नैतिकतेला कुठेही धक्का लागू दिला नाही.
परंतु सध्या सार्वजनिक जीवनात होत असलेली नैतिकतेची घसरण पाहून अतिशय निराशादायक व अस्वस्थ करणारे वर्तमान दिसत आहे. नैतिकता ही एक तर ओझे वाटते किंवा बंधन तरी, परिणामी हा विषय केवळ इतिहासातील दस्तावेज होतो की काय अशी भीती वाटावी या प्रकारची परिस्थिती सर्वत्र आढळून येत आहे. वास्तविक नैतिकता हा प्रत्यक्ष आचरणाचा विषय असून तो प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याला परिपूर्ण बनवणारा म्हणजेच खऱ्या अर्थाने माणूस घडवणारा आहे.
जगातील महान व्यक्तिमत्वे केवळ नैतिकतेच्या आधारावर वंदनीय व अजरामर झाली. कारण या महापुरुषांनी आपल्या आयुष्यात प्रगती, विकास यांच्या व्याख्या  खूपच व्यापक होत्या. आजच्या काळात या संकल्पना फक्त भौतिक प्रगती म्हणजेच पैसा, प्रसिद्धी, सोयीसुविधा यातच गुरफटून गेल्या आहेत. दुर्दैवाने प्रगतीची परिमाणे केवळ महिण्याचे वेतन, ट्विन बंगलो,अलिशान चारचाकी हीच झाली आहेत. याचा अर्थ असा निश्चितच नाही की दरिद्री जीवन जगावे परंतु प्रश्न हा आहे की आयुष्याचे ध्येयच हे असेल तर याला प्रगती म्हणावे का ? आणि दुसरा प्रश्न हे मिळवण्याचा मार्ग कुठला ? नैतिकतेची घसरण होण्याची सुरुवात या बिंदूपासून होते. सोयीसुविधा मिळवण्यासाठी पैसा आणि त्यासाठी वाट्टेल त्या मार्गाने जाण्याची तयारी ही मानसिकता नैतिकतेला नष्ट करते. नैतिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तीला पैशाच्या हव्यासापायी इतरांची गरज ही जास्तीचा पैसा कमवण्याची संधी वाटते. परिणामी भ्रष्टाचार, फसवणूक,खोटेपणा हा त्यांच्या जीवनाचा नित्यक्रम बनतो. समाजाचे विविध क्षेत्रात नेतृत्व करणारे तसेच वैद्यकीय सेवा देणारे यांनी नैतिकता पाळली नाही तर त्याचा परिणाम समाजात मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण करण्यात होतो. जसे की, स्त्री-भृणहत्या व यासारखे इतरही अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात.  
प्रगतीच्या तकलादू कल्पना समाजमनावर ठसाविण्याचे काम वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून होत आहे. विशेषत: वित्रपट आणि जाहिराती. दुसरया बाजूला घरातील संस्कारांचे विद्यापीठ म्हणजेच आई- बाबा व पाल्य यांचा संवाद दुर्मिळ स्वरूपाचा झाला आहे. संवाद म्हणजे केवळ दैनंदिन बोलणे नव्हे तर आयुष्याच्या प्रवासातील ध्येय निश्चित करणारी विचारांची देवाण-घेवाण. आजी-आजोबांना तर आपण केव्हाच निवृत्त केले आहे. शिक्षक हे एक अत्यंत महत्वाचे प्रभावित करणारे व्यक्तिमत्व. परंतु येथेही फार काही उत्साहवर्धक चित्र नाही. साने गुरुजी यांचे स्मरण केवळ जयंती-पुण्यतिथी पुरते. विद्यार्थी घडवण्यासाठी   आवश्यक असलेली तळमळ केवळ नैतीकतेमुळेच येऊ शकते, जी आता दुरापास्त झाली आहे.
 अशा परिस्थितीत संस्कार रुजविणार तरी कोण ? मग अनायासे टी.व्ही हे माध्यम आणि त्यातून अवास्तव, अनैतिक दृश्यांचा भडीमार करणारी कथानक. याची परिणीती शालेय विद्यार्थ्यांच्या दारूच्या पार्ट्या, महाविद्यालयीन तरुणाच्या रेव्ह पार्ट्या यात होते. यामुळे पाल्य घडण्याऐवजी बिघडतात आणि हीच पिढी प्रगतीच्या तकलादू कल्पना घेऊन बहुमोल आयुष्य अक्षरश: वाया घालवते.
यासाठी प्रत्येकात नैतिकता रुजवायची असेल तर प्रगतीच्या तकलादू संकल्पना बदलल्या गेल्या पाहिजेत, त्यासाठी पालक-पाल्य, शिक्षक-विद्यार्थी यांच्यात संवाद वाढला पाहिजे आणि हे सर्व होण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचा प्रचार- प्रसार मोठ्या प्रमाणावर करावा लागणार आहे. थोडक्यात बदलाची इच्छाशक्ती असेल तर आपण हे नक्की करू शकतो.   
(हा लेख दैनिक सकाळ औरंगाबाद आवृत्तीत चौफेर या पानावर
रविवार, दि.15/09/२०१३  रोजी प्रसिध्द झालेला आहे.  )     

Post a Comment

0 Comments