प्रत्येक जण धावत असतो.पैसा, मान सन्मान, सत्ता, प्रसिद्धी मिळवल्यानंतरहि कशाची तरी कमतरता जाणवते.कारण जायचे कुठे आहे? आणि ते ध्येय स्वत:स निश्चितपणे जाणून, तपासून घेतले आहे का ?अशा प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच येण्याची शक्यता आहे. हि कमतरता नेमकी काय आहे हे कळण्यासाठी किंवा मानवजन्माची सार्थकता कशात आहे हे समजण्यासाठी स्वामीजींचे स्मरण आवश्यक ठरते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात दिव्यता येण्यासाठी कार्यरत असले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असणारी प्रेरणा, स्फूर्ती स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातून निर्माण होऊ शकते.
विवेकानंदांच्या चरित्रातील सर्वात प्रेरक आहे ते त्यांचे सत्यशोधनासाठी असलेले प्रामाणिक प्रयत्न, त्याच्यासाठी आवश्यक त्याग , तळमळ,समर्पण आणि एकदा ते सापडल्यावर आपल्यासारखा लाभ इतरांनाही व्हावा हि इच्छा. स्वामीजींनी कोणतेही तत्व, प्रमाण स्वीकारताना ते बौद्धिक पातळीवर घासून पडताळून घेतले. विवेकवादाची हि खरी साधना म्हणावयास हवी.
सध्याच्या काळात अनेकजण 'विचारवंत' या उपाधीला प्राप्त करून घेण्यासाठी बिनदिक्कतपणे तत्व, विचार नाकारतात. तत्व खरे कि खोटे याचा प्रामाणिक सत्यशोधनात हि मंडळी जात नाहीत. आणि एखादे वेळेस स्वत:ला पटून देखील केवळ 'प्रतिमा' जपण्यासाठी सत्य न स्वीकारता बौद्धीक अनाचार माजवतात. विवेकानंदांचे स्मरण याकरिता आवश्यक आहे त्यांच्या सारखा एक नास्तिक व्यक्ती पुढे कालीमातेचा परमभक्त बनतो आणि वेदांताचे तत्वज्ञान अवघ्या विश्वाला शिकवू लागतो. नास्तिक नरेंद्र ते संन्यासी विवेकानंद हा प्रवास अत्यंत विलक्षण असाच आहे.
दुसरे असे कि, ज्याप्रमाणे अनेक जण मोक्षप्राप्तीसाठी हिमालयात जाऊन वर्षानुवर्षे एकांत वासात साधना करतात. परंतु स्वामी विवेकानंदांचे वेगळेपण असे कि त्यांनी 'शिवभावे जीवसेवा ' हे ब्रीद आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित केले. आपल्याला झालेला मुक्तीलाभ विश्वातील सर्व प्राणीमात्रांना व्हावा यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. सामान्य जनाची दैन्यावस्था पाहून त्यांचे अंतकरण व्याकूळ होत असत. म्हणून त्यांनी त्यांच्या दु:ख निवारणासाठी, त्यांना जमेल ते साहाय्य करण्यासाठी स्वत:स झोकून दिले. स्वामीजी केवळ पोथी पंडित नव्हते तर क्रियाशील होते.त्यांचा असा दृढ विश्वास होता कि 'जर लोकांचे बाले करण्याची तुमची खरोखर इच्छा असेल तर सर्व विश्व जरी तुमच्या विरुद्ध उभे राहिले तरी ते तुम्हास अपाय करू शकणार नाही. तूम्ही जर निष्ठावान आणि खरोखर निस्वार्थी असाल तर तुमच्यातील त्या परमेश्वरी शक्तीपुढे त्या विरोधाचा धुव्वा उडेल '
अशा प्रकारे त्यांनी मरगळलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या सामान्य जनास जगण्याची स्फूर्ती दिली. भारताच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून दिले. स्वामीजींच्या प्रेरणेने कित्येकांनी आपले आयुष्य भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण केले. हि खचितच सोपी गोष्ट नव्हे. त्यांनी स्वत:च्या चरित्रातून इतरांना प्रेरणा दिली. यामुळे हा युवा संन्याशी लोकांचा हा संघ भारतमातेच्या सेवेसाठी अवघा भारत पादाक्रांत करत होता. प्रत्येक जीवात्म्याला सांगत होता कि ' तू अमृताचा पुत्र आहेस.आपले जीवन दिव्य बनवण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे.' स्वामीजींनी कुठलेही व्यक्तिस्तोम माजवले नाही कि कर्मकांडाचा बागुलबुवा केला नाही.त्यांनी जाणले होते कि धर्म हा भारताच्या सांस्कृतिक जीवनाचा पाया आहे. परंतु त्याची अवस्था जीर्ण झाली आहे. म्हणून त्यांनी धार्मिक होणे म्हणजे नेमके काय ? हे सांगितले ते म्हणतात ' धर्माविषयी नुसत्या लांबलचक बाता मारूनच धर्म आचरण होत नसते;असे जीवन दाखवा बघू कि ज्यात त्याग, आध्यात्मिकता तितिक्षा आणि अनंत प्रेम मूर्त झाले आहे. हे सारे गुण असतील तरच तुम्ही धार्मिक व्यक्ती झालात. 'भारतासारख्या देशात धार्मिकतेची हि व्याख्या प्रत्येकाने स्वत:च्या अंगी बाणली तर निश्चितच एका सृजनशील समाजाची निर्मिती होण्यास वेळ लागणार नाही.
विवेकानंदांना देशातील युवकांकडून खूप अपेक्षा होत्या त्यांन वाटे कि ज्याचे देशावर प्रेम आहे, ज्याचे स्वत:च्या धर्मावर प्रेम आहे त्याने सर्वसाधारण लोकांना दुरापास्त झालेल्या शास्त्रातील ज्ञान प्रदान करावे कारण हेच खरे वारसदार आहेत.स्वामीजींनी आपल्या आयुष्यात भरपूर प्रवास केला. प्रवासात त्यांनी देशातील विविधता अनुभवली. अनेकांना हि विविधता कार्यातील अडथळा वाटते. परंतु विवेकानंद म्हणत ' विचार पद्धतीतील विभिन्नता राहील तोपर्यंतच आपण अस्तित्वात राहू. मात्र विभिन्नता आहे म्हणजे परस्पर कलह, एकमेकात भांडणे असली पाहिजेत असे मात्र मुळीच नाही. माझा मार्ग माझ्यापक्षी ठीक आहे तुमच्यापक्षी नाही. याला इष्ट असे म्हणतात आणि प्रत्येकाचे इष्ट वेगवेगळे असू शकते. ' विवेकानंदांचे स्मरण यासाठी आवश्यक आहे. भारतासारख्या पावलोपावली विविधता असलेल्या देशात इतका प्रगल्भ विचार रुजू लागला तर आपण खर् या अर्थाने सामाजिक सदभाव निर्माण करू शकू.
आयुष्याच्या परिपूर्णते विषयी स्वामीजी आत्म्याचे सर्वज्ञत्व अथवा पूर्णत्व होण्यात असल्याचे विषद करतात. यासाठी वासनांना जिंकल्या खेरीज हे शक्य नसल्याचे ठामपणे सांगतात.भारताच्या वर्तमान परिस्थितीत स्वामीजींचे विचारधन अत्यंत प्रभावी वाटते. केवळ देशवासीय नव्हे तर विदेशातही आपल्या अद्वितीय प्रतिभेने वेदांताची खरी शिकवण स्वामीजींनी अवघ्या विश्वाला शिकविली.
भारतमातेच्या उत्थानासाठी तरुणांना कार्यप्रवण करणारे विवेकानंद खरेखुरे विवेकवादी आहेत. ईश्वर प्राप्ती म्हणजे केवळ पोथी पंडित पणा नव्हे कर्मकांड हि नव्हे तर प्रत्येक जीवात्म्याचे दु:ख करण्यासाठी त्याला जमेल ते सहाय्य करणे होय. अशी वास्तववादी आध्यात्मिकता विवेकानंदानी प्रत्यक्ष आचरणात आणून एक आदर्श निर्माण केला. प्रसंगी आपल्या कुटुंबियांची आर्थिक ससेहोलपट सहन केली पण भारतमातेच्या सेवेचे व्रत सोडले नाही. याकरिता या महान भारतमातेच्या पुत्राचे स्मरण आहे. भारतमातेचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी विचारांची नवसंजीवनी याच्यात आहे. आपणही प्रेरणा घेऊन भारतमातेच्या सेवेत आपले योगदान देऊया. शिवभावे जीवसेवा करूया.