देव पाहायासी गेलो - दर्पण

Sunday, February 23, 2014

देव पाहायासी गेलोमानव विचार करू शकतो त्याच्यात जिज्ञासा, चिकित्सक वृत्ती आहे, बरे-वाईट ठरवण्याची,निवडण्याची आणि त्याप्रमाणे आचरण करण्याची क्षमता आहे. आणि याच्याही पुढे जाउन असे म्हणता येईल की, मनुष्यत्वाचा संपूर्ण विकास करण्याची अफाट शक्यता आहे. स्वत:ला पूर्णपणे जाणून घेण्याच्या या प्रवासात,या प्रयत्नात आपले मानवजन्माचे अंतिम उद्दिष्ट्य असले पाहिजे. यामुळेच आपल्या शास्त्र ग्रंथाची ची सुरुवात कोहम ? म्हणजेच मी कोण आहे ? या प्रश्नाने होते. आणि ही शोधयात्रा ‘सोहम’ म्हणजेच तो मीच आहे . या उत्तराच्या केवळ माहित करून घेण्याने नव्हे तर अनुभव करून घेण्याने संपते. आपली वैचारिक,तात्विक अथवा प्रत्यक्ष जगण्यातील समृद्धी या शोधयात्रेतील वेगवेगळ्या प्रयत्नातून आलेली दिसते. वेगवेगळी मते,त्यांची वेगवेगळ्या पध्दतीने केलेली मांडणी व तसेच विरोधी मत त्याचे तात्विक खंडण करून स्वत:च्या नव्या अनुभवाने केलेली पुनर्मांडणी आपली ऐतिहासिक बौद्धिक परंपरा आहे. अनेक आचार्यांनी मांडलेले सिद्धांत,तत्वे मार्ग हे सर्व या कोहम ते सोहम या शोधायात्रेचाच अभिन्न भाग म्हणावे लागतील. थोडक्यात काय तर सगुण देव, निर्गुण ब्रह्म यांचा शोध घेण्याचे अखंड प्रयत्न अंतिमत: मनुष्यत्वाचा संपूर्ण विकास करणारी शोधयात्रा होय. याकरिता आपल्याला असे म्हणता येईल की, अखंड प्रामाणिक प्रयत्न हे या शोधायात्रेचे मुलभूत सूत्र आहे. सामान्य व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार आपल्याला योग्य तो मार्ग निवडत या शोधयात्रेत सहभागी होतात. आपण शोध घ्यावा व आपल्या अनुभवावर आधारित निष्कर्ष मांडावेत अशी सामान्यपणे अपेक्षा असते. परंतु कित्येक जन ज्याना जाणून घ्यायची जिज्ञासा इतरांपेक्षा अधिक प्रमाणात असते (किंवा तसे ते दाखवतात) ते मंडळी अनेकवेळा खूप मोठा निष्कर्ष अगदीच किरकोळ स्वरूपात मांडणी करतात. जसे की, देव नाही ही सनातन चर्चा अथवा  निष्कर्ष अगदी स्वस्त झाला आहे.ज्याने आपल्या आयुष्यात पदोपदी दु:ख भोगले आहे, अनंत अडचणीचा सामना करत केवळ जिवंत राहण्यासाठी संघर्ष केला आहे त्याचे असे मत झाले असेल तर एकवेळ ते स्वीकारण्यासारखे आहे. परंतु खरे पाहता असे सामान्यजन त्याच्या देवावर अत्यंत गाढ श्रद्धा ठेऊन आयुष्य व्यतीत करत असतात. व असे श्रद्धावान व्यक्ती दिसले तरी किंवा त्यांच्या कडे निर्बुद्ध जीव अश्या नजरेने बघत देवाचे अस्तित्व नाकारतात. काहीजण तर देव नाही असे म्हणतात कारण काय तर ‘देव दुष्काळ दूर करू शकत नाही. देव ज्याला भूक लागली आहे त्याला अन्न  देऊ शकत नाही.’ असली उथळ विधाने करतात. काहीजण भीतीपोटी देवाची निर्मिती केली म्हणतात.तर वैयक्तिक स्वार्थापोटी देवाची निर्मिती केली गेली असे सांगतात.       
साधारणपणे कोणीही व्यक्ती ज्याला प्राथमिक विज्ञान माहीत आहे तो हे मान्य करेल की कुठलीही साधारण घटना घडण्यासाठी एक निश्चित स्वरूपाची प्रक्रिया-पध्दत आहे. एका विशिष्ट पद्धतीने क्रिया घडल्यानंतर काही परिणाम दिसायला लागतात. घटना घडली कशी ? हेच विज्ञान सांगते ना ? मग जर संपूर्ण विश्वाच्या निर्मितीचे कारण, कर्ता शोधायचा असेल, त्याच्या अस्तीत्वा वरती काही निष्कर्ष मांडायचे असतील तर त्यासाठी काही निश्चित प्रक्रिया असणार नाही का ? ती अर्थातच वेगवेगळ्या पध्दतीने असू शकेल. परंतु ही प्रक्रिया सांगितली तर तथाकथित बुद्धिवादी तिला एकतर कालबाह्य ठरवतात  किंवा सरळ तिला निरुपयोगी जाहीर करतात. समजा असे सांगितले की, ज्ञान प्राप्तीसाठी गुरुंची, मार्गदर्शकाची आवश्यकता असते. तर असे करण्यात कित्येक जणांना बौद्धिक शरणागती वाटते. आपल्याला जे माहित आहे अथवा आपले अनुभव विश्व जेवढे आहे तेच खरे बाकी सर्व खोटे आहे. परंतु इथे एक प्रश्न असा की जर माझा अनुभव खरा आहे हे ठीक, पण इतरांचा अनुभव अपूर्ण असू शकेल पण खरा नाही असे कशाच्या आधारावर म्हणता येईल ? आपल्याला सोयीस्कर तेवढे निवडल्याने अंतिम ध्येय कसे गाठता येईल.प्रश्न आहे तो आपले अनुभव विश्व वाढवायचे की फक्त आपल्याला नावडते इतरांचे अनुभव विश्व नाकारायचे.       
आपले अध्यात्मिक ग्रंथ ‘कोहम ते सोहम’ या शोधयात्रेचा महत्वाचा दस्त एवज आहेत. तत्व ज्ञानातील वैश्विक स्तरावरील प्रमाण असलेली अनेक तत्वे,सिद्धांत त्यात समाविष्ट आहेत. त्यांचा अभ्यास सुध्दा न करता किंवा केलाच तर त्यातील तात्पर्य शोधण्याऐवजी केवळ घटनांवर   आधारित विश्लेषण करून त्याचा उपयोग स्वत:चे मत थोपवण्यासाठी केला जातो व याचा बडेजाव मिरवण्यात परिपूर्णता मानून घेणारे अनेक आहेत.जिज्ञासा असेल आणि खरोखरच जर त्यादृष्टीने अनुभवी व आपली ज्याला पारखून घेतले आहे अश्या व्यक्तीवर पूर्ण श्रध्दा ठेवून प्रयत्न केल्यास नरेंद्राचा स्वामी विवेकानंद होतो हे आपण सगळे जाणतो.  
देव आहे किंवा नाही हे स्वत: प्रयत्न करून, पडताळून अनुभवाअंती मांडणी करावी. बाकी श्रद्धा आणि विश्वास हा आपल्यात असतोच फक्त तो देव शोधण्याच्या बाबतीत अथवा सोहम च्या अनुभूती कडे जाताना आपण सापडत नाही इतकेच. थोडक्यात देव पाहायासी गेलो तरच देव होऊ ना  

No comments: