प्रवाह चैतन्याचा.. - दर्पण

Sunday, July 20, 2014

प्रवाह चैतन्याचा..

महाराष्ट्र हा शब्द उच्चारला, की डोळ्यांसमोर गणेशोत्सव व पंढरपूरच्या वारीचे चित्र उभे राहते. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे अभिन्न अंग आहे व त्याचे मुख्य सूत्र वारी हे आहे.   सीगल या समुद्रपक्ष्याची कथा आपल्यापैकी  बहुतेकांना ज्ञात असेल. हा समुद्रपक्षी केवळ अन्नाच्या शोधार्थ न भटकता उंच भरारी घेण्याची कला अत्यंत कष्टाने शिकतो व त्या अगम्य प्रदेशात विहार करतो; परंतु इतर समुद्रपक्ष्यांना ही कला यावी याकरता तो परत आपल्या मूळ ठिकाणी येतो व त्यांना ही कला शिकवू लागतो. अर्थातच, त्याला त्याला प्रवाहाच्या विरुद्ध जावे लागते; परंतु अत्यंत निष्ठेने तो हे काम करत राहतो. वारकरी संप्रदायात  होऊन गेलेले संत हे खर्‍या अर्थाने सीगलच आहेत. ज्यांनी यातना सहन करून सामान्य जनांच्या जीवनात दिव्यत्व येण्यासाठी आयुष्य वेचले. या संतांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती करून एका विलक्षण जगाची ओळख त्यांना करून दिली व प्रपंचात राहून आयुष्याचे र्मम समजून घेण्यासाठी  जीवन जगण्याची कला शिकवली.      
व्यक्तीचे आयुष्य समाधानी-सुखी होण्यासाठी ते प्रवाही असले पाहिजे; परंतु आपल्या सुखाच्या- समाधानाच्या संकल्पना बदलल्या गेल्याने हा प्रवाह अनेक ठिकाणी थांबतो व त्याचे रूपांतर डबक्यात होते आणि अर्थातच या डबक्यातून दुर्गंधी निर्माण होत. अशा व्यक्ती स्वत:ला व इतरांनाही नकोशा होत जातात. नैराश्य व मानसिक ताणतणाव आयुष्याच्या प्रवाहाचे डबके करतो. या पार्श्‍वभूमीवर वारीमध्ये असे कोणते आकर्षण आहे, की ज्यामुळे इतक्या मोठय़ा प्रमाणावर लोकसमूह त्याकडे आकृष्ट होतो? सांसारिक विवंचना त्रस्त करत असतानाही अशी कोणती उमेद आहे, जी सामान्य जनाला वारीकडे खेचून नेते? या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला असे आढळून येईल, की वारी ही केवळ एक परंपरा नसून, तो एक चैतन्याचा प्रवाह आहे.  त्याच्यात मनसोक्त डुंबणार्‍याचे आयुष्य प्रवाही होते. वारीत सामील झालेल्या व्यक्तीला दिव्य आयुष्याची प्रचिती येते व त्या व्यक्तीचे अंतरंग समृद्ध होते.  मागणे स्वत:पुरते न राहता व्यापक होते. निरपेक्षतेने कर्म  केल्याने अंतरंग समृद्ध होते, हे आपण जाणतो; परंतु निरपेक्ष देणे सध्याच्या व्यावहारिक जगात फारच क्वचित स्वरूपात दिसते आहे. अतिशयोक्ती वाटू नये; परंतु अनेक ठिकाणी तर चांगल्या कामाचे कौतुक करताना, कृतज्ञता व्यक्त करतानासुद्धा माणसे संकुचित मनोवृत्ती ठेवतात. हल्ली सेवा करणे म्हणजे वृत्तपत्रात प्रसिद्धी अथवा मानसन्मान, असे हिशोब मांडले जातात; पण वारीमधून निरपेक्ष सेवा करण्याची शिकवण मिळते. 
व्यक्तीमध्ये असलेले माणूसपण उत्तरोत्तर कमी होत जाणे ही समाजाची सर्वांत मोठी हानी आहे. त्यामुळेच महिलांवरील अत्याचार व आर्थिक शोषण वाढले आहे. ही हानी झाली नसती, तर स्वत:च्या सुखासाठी इतरांना त्रास झाला, तरी त्याची तमा न बाळगण्याची व बघ्याची वृत्ती वाढली नसती. वारीमध्ये माणूसपण जपले जाते. वैष्णव जन तो तेणे कहिये, पीड पराई जाणे रे या उक्तीचे प्रत्यक्ष आचरण वारीमध्ये पाहावयास मिळते. वारी व्यक्तीला मी व माझे या विवरातून बाहेर काढते. अनेक सांसारिक दु:खे असूनही वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान असते. याचे गमक वारकरी संप्रदायाच्या ऊर्जा स्रोतामध्ये आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस अशा या वारकरी संप्रदायातील संत मंडळींनी आपल्या आचरणाने जो आदर्श निर्माण केला आहे, तो आजही अनेकांना दिव्यत्वाची प्रचिती देत आहे. सध्या संत या संकल्पनेचाही बाजार भरलेला दिसतो आहे. वास्तविक संत म्हणजे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. हा कळवळा कोणाचा? तर सामान्य जनांचा. जे प्रापंचिक विवंचनेत दु:खी, कष्टी होत आहेत, ज्यांना मनुष्यजन्माचे सार्थक कशामध्ये आहे, याची जाणीव नाही, त्यांचा. संत तुकाराम म्हणतात, की बुडते हे जन न देखावे डोळा. मग आयुष्य सार्थकी होण्यासाठी काय पाहिजे, याचे निरुपण संतांनी त्यांच्या ग्रंथांतून केले आहे. त्यांनी दाखावलेला भक्तीचा मार्ग हिच खरी वारकरी संप्रदायाची संपत्ती आहे.    
आपले सद्भाग्य, की अजून आपल्याकडे चमत्कार दाखवा आणि संतपद मिळवा अशी योजना निर्माण झाली नाही. अन्यथा, संतत्वाचे महत्त्वाकांक्षी आणि त्यांचे स्तुतिपाठक यांनी अध्यात्माच्या क्षेत्रात दहशतवाद माजवला असता.  संतत्व म्हणजे एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मकदृष्टीने बदल घडवता येण्याची क्षमता. अर्थातच, ही क्षमता तपश्‍चर्येतून येते. ही तपश्‍चर्या म्हणजे समाजहित करताना अनुभवास येणारे विविध अप्रिय प्रसंग. अपमान, अपेक्षाभंग अशा अनेक प्रसंगांत मानसिक स्थितीची सत्त्वपरीक्षा बघणार्‍या कसोट्यांमधून यशस्वी रीतीने बाहेर पडणे. ही प्रक्रिया व्यक्तीमध्ये अंतर्गत क्षमता विकसित करते व त्यानंतरच एखाद्या व्यक्तीच्या अंतरंगात आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता निर्माण होते. संत चरित्राच्या विविध दृष्टांतातून ही बाब प्रकर्षाने आपल्या निदर्शनास येते. या कसोटीवर अनेक संत परंपरा वारकरी संप्रदायात दृष्टिपथास येतात. संत ज्ञानदेव व भावंडे, संत  एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत दामाजीपंत असे परोपकारी, वारकरी संप्रदायाचे आदर्श आहेत. 
जी मूल्ये आपण सहजतेने  शिकतो, ती आपल्या व्यक्तिमत्त्वात भक्कमपणे रुजतात. याउलट जबरदस्तीने शिकवलेले आपण विसरून जातो. आपल्या अंतरंगावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. वारीमध्ये नैतिक मूल्यांची शिकवण सहजतेने आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये रुजते. समाजात   वावरताना व्यक्तीने व्यक्तीशी कशा पद्धतीने वागले पाहिजे, याची आदर्श  शिकवण आपल्याला वारीतून मिळते. प्रत्येकाने आपले आयुष्य प्रवाही ठेण्यासाठी काही मूल्ये बाळगून, कुठलीही तडजोड न करता आचरणात आणली पाहिजेत, तरच अव्यक्त स्वरूपातील पांडुरंगाची भेट होऊ शकेल. वारी आपल्या व्यक्तिमत्त्वाला वेगळाच आकार देते, त्यामुळे आपण कुठल्याही प्रसंगात न डगमगता परिस्थितीला सर्मथपणे तोंड देण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते. म्हणून वारीचा हा प्रवाह चैतन्याचा आहे, ज्यामध्ये प्रत्येकाचे आयुष्य प्रवाही करण्याची क्षमता आहे. म्हणूनच वारीचा हा चैतन्यरूपी प्रवाह अव्याहतपणे चालूच आहे. 

(हा लेख बुधवार, दि. ९ जुलै २०१४ रोजी दैनिक लोकमत मध्ये संपादकीय पानावर प्रसिध्द झालेला आहे.)   

No comments: