ध्यास नवनिर्मितीचा - दर्पण

Wednesday, July 23, 2014

ध्यास नवनिर्मितीचा

सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये नवनिर्मिती हा एक समान गुणधर्म आढळतो. नवनिर्माणाकडे असलेली  ओढ याची साक्ष देते. जगण्याचा लढा  देत, अनंत अडचणींचा सामना करत जगणे फ़ुलवणे ही नवनिर्मितीची अविकसित शक्तीच होय. अर्थात  केवळ जगणे म्हणजेच काही नवनिर्मिती नव्हे, तर आपल्या अस्तित्वाला एक वेगळा अर्थ निर्माण करणे. स्वत :च्या कोशात न रमता इतरांच्या आयुष्यातील दुख वेदना कमी करण्यासाठी निमित्त होणे. ज्यांनी अशाप्रकारे आपल्या  नवनिर्मिती च्या शक्तीचा म्हणजेच सृजन शक्तीचा विकास केला आहे त्यांची आयुष्य इतरांसाठी आधार ठरली, सामान्यांच्या जगण्याला  कलाटणी देणारी ठरली किंबहुना ठरत आहेत. आपल्या भोवतीच्या प्रचंड नकारात्मक वातावरणात त्यांनी  सकारात्मक बदल घडवले. दुर्दम्य आशावाद, प्रबळ इच्छाशक्ती व प्रयत्नातील सातत्य ही या सृजन शक्तीची बलस्थाने. या तीनही गुणांचा समुच्चय एकाच ठिकाणी दुर्मिळ्तेने पाहायला मिळतो. म्हणजे समाजात चांगल्या घटना घडाव्या असे सगळ्यानांच वाटते, परंतु त्यासाठी फार थोडे लोक प्रयत्न करतात. एखाद्याने प्रयत्न करण्यास सुरुवात केली तरी मार्गातील अडथळ्याना तोंड देत प्रयत्न सोडुन दिले जातात. परंतु मोजकेच व्यक्तिमत्वे प्रबळ इच्छाशक्ती च्यां जोरावर संकटांचा धैर्याने सामना करत सृजनाचा नवा अध्याय निर्माण करतात.
कुठल्याही संवेदनाक्षम मनाला व्यथित व अस्वस्थ करेल अशी समाजाची सध्याची परिस्थिती आहे.  काही प्रसंगी सृजनाचे तर सोडाच, व्यक्तीच्या माणूसपणा च्या अस्तित्वावरच शंका  यावी इथपर्यंत परिस्थिती बिघडली आहे असे भासू लागते. अशा परिस्थितीत सृजनाचे कार्य करनारयाने  कितीही सकारात्मक विचार केला तरी एखाद्या प्रसंगी नैराश्य येणे साहजिकच आहे. दररोजच घडणारे बलात्कार,खून, आर्थिक फसवणूक यासारखे गुन्हे समाजाची वाटचाल मूल्यहीन व अराजकसदृश्य दिशेने जात आहे असेही प्रत्ययास येऊ शकते. विकासाच्या आधुनिक संकल्पना पैसा,प्रतिष्ठा व सोयी सुविधा अशा चित्ताकर्षक घटकांपुरत्या झाल्याने सृजनाचा मार्ग रुक्ष, निरुपयोगी वाटु लागण्याचे क्षणही येतील.परंतु समाजहिताची तळमळ व ध्येयाप्रती असलेली प्रामाणिकता सृजनाचा दीप विझू देणार नाही.

अशी सृजनशक्ती विकसित झालेले नागरिक देशाच्या उज्ज्वल भवितव्याचे आधारस्तंभ आहेत. याकरिता प्रत्येकाने स्वतामधील असलेली  सृजनशक्ती विकसित करून समाजहितासाठी,राष्ट्र बांधणीसाठी स्वताचे योगदान देणे ही देशाची सर्वात मोठी गरज आहे. आपल्या मधील प्रत्येकाला केव्हा तरी असे वाटलेलेच असते की समाज व राष्ट्रहितासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. परंतु या भावनेला  आपण न्याय देत नाही. हा आतला आवाज आपण ऐकत नाही. त्याची कारणे वेगवेगळी शकतील परंतु हा आवाज जर आपण ऐकला व काही निश्चित दिशा ठरवून सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच परिस्थितीत बदलाची सुरुवात होऊ शकेल व आपल्या अस्तित्वाला एक नवा अर्थ प्राप्त होऊ शकेल.आपल्या असण्याने एखाद्याच्या वेदना, दुख कमी होत असले तर  यापेक्षा वेगळी सृजनशक्ती ती काय  असू शकेल ?

समाजातील बुध्दिवंत वर्गाने जाणीवपूर्वक समाजासाठी आक्षेपार्ह असणारया घटकाविरुध्द बोलले पाहिजे व विधायक गोष्टींचा पुरस्कार केला पाहिजे. या वर्गाचे शांत बसणे, निष्क्रिय राहणे समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे. सामान्य नागरिक प्रगल्भ व्हायचा असेल तर त्याची वैचारिक बैठक मजबूत होणे गरजेचे असते म्हणून प्रबोधनपर्वाचे पालकत्व या वर्गाकडे नैसर्गिकतेने येते.
इथला सामान्य नागरिक प्रगल्भ झाला तरच समाजाचा, राष्ट्राचा खरा विकास होऊ शकेल. समाजातील व्यक्तींची मने बधिर व संवेदनाशून्य होणे हे सामाजिक आरोग्य बिघडल्याचे लक्षण आहे. संवेदनाक्षम मन असलेला व्यक्ती स्वत:ला सुख मिळवण्यासाठी इतराना दुख देत नाही, व त्याहीपुढे जाउन स्वत:च्या सुखाचा त्याग करून इतरांची दुखे दूर करण्याचा प्रयत्न करू लागतो. मने संवेदनाक्षम होण्यासाठी समाजात मोठया प्रमाणावर प्रबोधनाची गरज आहे. परस्परांत संवाद होण्याची नितांत आवश्यकता आहे. याकरिता समाजातील बुद्धिवंत वर्गाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी स्वत:  एक उत्कृष्ट संयोजक होणे गरजेचे आहे.  'विधायक कार्य व्हावेया व्यक्तिगत पातळीवर असलेल्या इच्छेला सामुहिक स्वरूप देऊन प्रत्यक्ष कार्यात त्याचे रुपांतर झाले पाहिजे.
आपले पुढाकाराचे एक पाउल इतराना प्रेरक ठरून त्यानाही सृजन शक्ती विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देउ शकते. कारण केवळ उदरनिर्वाहासाठी जगणे ही आपली भारतीय संस्कृती नाही, तर ' शिवभावे जीवसेवा ' हा आपल्या संस्कृतीचा मूलमंत्र आहे.ज्यायोगे स्वत:चे आयुष्यात दिव्यता निर्माण होऊ शकेल. ज्याक्षणी आपले हात समाजातील  जणांचे, शोषितांचे दुख दूर करण्यासाठी प्रवृत्त होतील तो क्षण आपल्यामधल्या सृजन शक्तीच्या विकासाचा आरंभ बिंदू व इतिहासाचे एक नवे पान लिहिण्याची सुरुवात असेल यात शंका नाही. 
 

 (हा लेख, रविवार दि. १९/०७/२०१४ रोजी दैनिक पुण्यनगरी च्या मराठवाडा आवृत्तीत प्रसिध्द झालेला आहे.)      

No comments: