वास्तवातील ' हीरो' - दर्पण

Sunday, July 27, 2014

वास्तवातील ' हीरो'

मुंबईतील लोटस बिझनेस पार्क या इमारतीला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर हे शहीद झाले.अशा घटनांमधून आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातील दोष प्रकर्षाने सामोरे येतात. त्यातही आपत्तीपूर्व दक्षता घेण्याबद्दल आपण अक्षम्य दुर्लक्ष करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्यानंतर, ती कोसळल्यानंतर सुरक्षेचे परीक्षण केलेच नसल्याचे पुढे येते. परिणामी नितीन यांच्या सारख्या जवानांना आपला जीव गमवावा लागतो. भूतकाळातील कोणत्याही दुर्घटनेपासून धडा न घेतल्याने व्यवस्थेतील दोष आहे तसेच आहेत व याचे अजून किती बळी जाणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. या दुर्घटनेनंतर नितीन यांच्या कुटुंबियाना शासना तर्फे मदत जाहीर केली गेली, परंतु शासकीय दिरंगाई चे ग्रहण अशा अतिसंवेदनशील घटनांमध्येही दुर्दैवाने लागलेलेच आहे. देशासाठी,समाजासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारया शहीद कुटुंबियांची अवस्था काही प्रमाणात अशीच आहे. मुख्य प्रश्न म्हणजे शासकीय स्तरावर  कोणालाही खेद ना खंत.
अशा परिस्थितीत चित्रपट अभिनेते राकेश रोशन यांनी तत्परतेने या कुटुंबाला १५ लाख रुपयाची  मदत केली. चित्रपट उद्योगातील अनेक कलाकार सामाजिक बांधिलकी जपत अशी मदत करतात. परंतु अलीकडे चित्रपट उद्योग व त्यातील कलाकार पेज ३ कल्चर, पब, पार्ट्या, धिंगाणा अशा प्रकारासाठी चर्चेत असतात. यामुळे या देशातील सामान्य जनतेविषयी भावनिकरित्या परकेपण असल्याचे जाणवते.   अगोदरच भारतीय समाजात टोकाची आर्थिक विषमता आहे.संपतीचे असमान वाटप सामाजिक विषमतेच्या मुळाशी आहे. अर्थात संपत्ती जमवणारे दोषी आहेत असे नक्कीच नाही. परंतु आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाविषयी असलेले त्यांचे परकेपण वेदनादायक तर आहेच शिवाय सामाजिक असमतोल निर्माण होऊन विविध प्रश्नाना कारणीभूत ठरणारे आहे. याकरिता समाजातील अतिश्रीमंत वर्गाने आर्थिक विषमतेच्या दरीतील अंतर कमी करण्यास पुढाकार घेणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य आहे. याकरिता चित्रपट अभिनेते राकेश रोशन यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक वाटते. चित्रपट उद्योगातील अनेक कलाकारानी अशी सामाजिक बांधिलकी जपल्याचे उदाहरणे आहेत. याचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. याचे कारण असे की , चित्रपट उद्योगात आजघडीला कोट्यावधींची उलाढाल होते. ज्याप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी (CSR) कोर्पोरेट सोशल रिस्पोन्सिबीलिटी सारखे उपक्रम राबवणे बंधनकारक आहे, त्याप्रमाणे चित्रपट उद्योगातील कलाकारानी स्वत:हून अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत . प्रत्येकाने एखाद्या सामाजिक प्रकल्पाचे पालकत्व स्वीकारून त्याना आर्थिक मदत होण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चितच आदर्शवत कार्य निर्माण होऊ शकते. प्रत्येक ठिकाणी शासन पोहोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्या ठिकाणी शासन पोहोचू शकत नाही तेथे स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून विविध प्रकल्प चालवले जाऊ शकतात.

राज्यात तसेच देशाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्याची गरजा आहे. जसे की, मेळघाटातील कुपोषण, अस्थायी कामगारांच्या, मजुरांच्या पाल्यांचे शिक्षण, सार्वजनिक आरोग्य अशा विविध क्षेत्रात स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून शासकीय कामकाजाच्या तुलनेत अत्यंत प्रभावी कार्य होऊ शकते. याचे महत्वाचे कारण असे की, स्वयंसेवी क्षेत्रात कार्य करणारया संस्था, कार्यकर्ते हे समर्पित भावनेने कार्य करतात व त्यामुळे त्यांच्यात उत्तरादायीत्वाची भावना असते. शासकीय पातळीवर असे काम होण्याची अपेक्षा करणे केवळ स्वप्न रंजनच होय. त्यामुळे ज्या संस्था, संघटना अशा प्रकारचे लोककल्याणाचे कार्य करत आहेत त्यांना आर्थिक हातभार मिळाला तर त्यांचे कार्य अधिक सक्षमपणे होऊ शकते. चित्रपट उद्योग हा केवळ मनोरंजनासाठी व नफा कमावण्यासाठी नसून प्रबोधन हे त्याचे ध्येय आहे याचे विस्मरण होता कामा नये. अन्यथा हेच माध्यम समाजात अश्लीलता , बीभत्स प्रसंग यांच्या प्रसाराचे माध्यम बनून समाजातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचे कारण होत चालल्याचे अत्यंत दुर्दैवी चित्र निर्माण होईल. किमान चित्रपटाच्या माध्यमातून गुन्हेगारांना प्रेरणा तरी मिळू नये याची खबरदारी या क्षेत्रातील कलाकारानी घ्यायला हवी. समाजातील विविध प्रश्न, समस्या यावर जनजागृती करून सदवर्तनाकडे जनतेस प्रवृत्त करणे हा विचार चित्रपट उद्योगाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. खरेतर अशा विचाराने प्रेरित होऊन चित्रपट निर्मित होतात परंतु, त्यातील कलाकारानी वैयक्तिक आयुष्यात सामाजिक बांधिलकी जपल्याचे क्वचितच कानावर पडते. आपल्या लोकप्रियतेचा फायदा एखाद्या सामाजिक प्रकल्पासाठी होण्यासाठी कलाकारानी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. तरच चित्रपटातील अभिनेते वास्तविक जीवनात खरया अर्थाने हिरोहोतील. 

(रविवार, दि.२७/०७/२०१४ रोजी दै.पुण्यनगरी(औरंगाबाद आवृत्ती) मध्ये दर्पण सदरात प्रकाशित लेख )  

No comments: