श्रीगणेशाचे कार्यकर्त्याना पत्र
प्रतिवर्षी माझ्या आगमनाची
आतुरतेने प्रतीक्षा करणारया तमाम कार्यकर्त्यानो …।
अत्यंत आपुलकीने दरवर्षी तुम्ही चातकाप्रमाणे माझ्या आगमनाची
प्रतिक्षा करता. उत्साहात स्वागत करता. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला दिलेले
सार्वजनिक स्वरूप मलाही अत्यंत भावले. तुमच्या हृदयात तर मला कायमचे स्थान आहे, परंतु या दहा दिवसांच्या काळात मला तुम्हा
कार्यकर्त्यांचे सुख, दु: ख जाणून घेता येते. पूजा- अर्चना
करताना तुमचा भाव बघून मी भारावून जातो. यामुळेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुमचा
निरोप घेताना माझेही डोळे पाणावतात. त्या सोनेरी दिवसांच्या आठवणीने आजही माझे मन आनंदाच्या जलधारेत ओलेचिंब होते.
त्या वेळी
या उत्सवात युवकांना राष्ट्र प्रेमाचे धडे दिले जात. वेगवेगळ्या
सांस्कृतिक कार्यक्रमामधून नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात होते.
वैचारिक मंथन होऊन नवनव्या विषयांवर प्रबोधन व्हायचे, उत्साहाला दिशा मिळे. यामुळे
वातावरणा तील कण- न- कण अपूर्व उत्साहाने भरून जात. तुम्हा कार्यकर्त्यात एक वेगळेच आत्मीय अनुबंध
निर्माण व्हायचे. आरतीच्या निमित्ताने परिसरातील लहानथोर एकत्र जमून एका विलक्षण
मांगल्याचा, पवित्रतेचा अनुभव
घेत होते. यावेळी मलाही त्यांच्यात मिसळुन जावेसे वाटत.समाजाच्या जडण घडणीत माझ्या
आगमनाचा उत्सव एक महत्वाचा भाग झाल्याने
मला एक विलक्षण समाधान मिळे.
मित्रानो, हे सोनेरी दिवस आठवावे लागत आहेत, कारण सध्याच्या उत्सवाचे स्वरूप . हा सृजनाचा उत्सव ज्या विचित्र
पद्धतीने साजरा होत आहे, ते पाहून मला अत्यंत यातना होत आहे. लोककल्याणासाठी, राष्ट्रउत्थानासाठी सज्जनांचे संघटन हे प्रमुख ध्येय असलेला हा उत्सव अविवेकी उत्साहाकडे प्रवाहित
होत आहे. माझा उत्सव साजरा करण्यासाठी तुमच्या मेहनतीने व स्वेच्छेने जमा केलेला निधी माझ्यासाठी लाख मोलाचा आहे. बळजबरीने
रक्कम गोळा करून केलेली रोषनाई, झगमगाट बघून मला काडीचाही आनंद होत नाही. जमा झालेल्या निधीचा
विनियोग बघून तर मला आणखीनच अवघडल्यासारखे
होते. तुम्ही मला कर्णकर्कश आवाजात आधुनिक संगीत ऐकवता. अनेकवेळा तर त्याचे बोल
ऐकून मला तत्क्षणी मंडपातून निघून जावेसे
वाटते. वातावारणात भक्तिमय भाव निर्माण करण्यासाठी संगीताचा उपयोग व्हायला हवा, परंतु या कर्णकर्कश
आवाजाचा परिसरातील अनेकांना त्रास होतो. व
अर्थातच त्यामुळे मला खूपच मनस्ताप होतो.
अनेक ठिकाणी तर माझी एकदा प्रतिष्ठापना केली की त्यानंतर फारसे
कोणाचे लक्ष नसते. जणू काही माझी स्थापना
ही केवळ अनंत चतुर्दशीच्या दिवशी ५० ते ६० हजारांचे वाद्य, डी. जे.च्या तालावर बेधुंद होऊन
अंगविक्षेप करण्यासाठीच झाली आहे. अनेक ठिकाणी पत्त्यांचे डाव मांडले जातात.
मिरवणुकीच्या दिवशी नशा केली जाते. अशा वेळी माझ्या संतापाचा कडेलोट होतो व
तत्क्षणी तुमच्या या उपद्व्यापांचा बंदोबस्त करावा असे वाटते. परंतु तुम्ही सर्व
माझीच लेकरे असल्याने मी दुर्लक्ष करतो.
माझ्या मित्रानो, गेली अनेक वर्षे मी हे सहन करत आलोय परंतु आता मात्र या सर्व
गोष्टींचा मला वीट आला आहे. तुमची भावना जरी चांगली असली तरी उत्सव साजरा करण्याची
पध्दत अत्यंत किळसवाणी झाली आहे.
वास्तविक, युवकांच्या संघटनेतील ताकद ओळखून समाजात समाज प्रबोधन, राष्ट्रभक्ती रुजविण्याचे उदात्त ध्येय डोळ्यासमोर ठेवून
लोकमान्यानी हा उत्सव सुरु केला होता. हे
ध्येय साध्य करण्यासाठी प्रामणिकतेने प्रयत्न होत आहेत अशी मंडळे उत्तरोत्तर कमी
होत चालली आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याची ही खरी वेळ आहे.
प्रत्येक मंडळामध्ये संघटन शक्तीचे बळ आहे, परंतु या उर्जेचा वापर विधायक मार्गासाठी होणे अत्यंत आवश्यक आहे.
हे खरे नवनिर्माण आहे.
प्रत्येक मंडळाने युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करणारे उपक्रम हाती घेतले पाहिजेत.
वेगवेगळया विषयातील तज्ञ निमंत्रित करून सामाजिक समस्या जाणून घेण्याची गरज आहे.
उपायांची चर्चा होऊन वैचारिक मंथन व्हायला हवे. निरपेक्षवृत्तीने समाजकार्य करणारया व्यक्ती व त्यांचे कार्य
यांची माहिती करून घेणारे उपक्रम हाती घेतले पाहिजेत. जमल्यास अशा व्यक्ती व
संस्था यांच्या कार्याला काही मदत करता येईल का
? असाही प्रयत्न झाला पाहिजे. रक्तदान
शिबिरे तसेच परिसरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणारे श्रमदान शिबिरे आयोजित
करून तुम्ही ख-या अर्थाने मला प्रसन्न करू शकाल. एखाद्या गुणवंत परंतु सक्षम
आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणास मुकलेल्या विद्यार्थ्याला काही मदत करता आली तर हा उत्सव सृजनाची साधना
बनून जाईल.
या पध्दतीने उत्सव साजरा झाला तर
तुम्हाला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी माझे हात आसुसलेले असतील. तुमच्या
हाताना नवनिर्मितीचा सुगंध येवो. ज्यामुळे आपल्या सर्वांचे जगणे समृध्द होऊ लागेल.
माझे हे पत्र मिळाल्यावर तुम्ही नक्कीच परिस्थिती बदलासाठी प्रयत्न कराल हा मला
विश्वास आहे.
तुमचाच
बाप्पा