शिक्षक नावाचे विद्यापीठ - दर्पण

Friday, September 5, 2014

शिक्षक नावाचे विद्यापीठ


समाजामध्ये ज्या व्यक्तींना सर्वात जास्त मान -सन्मान व एका अर्थाने समाजावर ज्यांचा नैतिक दरारा आहे त्यामध्ये शिक्षकांचा क्रमांक सर्वात वरचा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पालकानंतर शिक्षक अशी एक व्यक्ती असते  जीच्याबद्दल आपल्या मनात  कायम  आदराचे स्थान असते. याचे कारण पौगंडावस्थेत असलेल्या आपल्या बेधुंद मनाला आकार देण्याचे सृजनशील कार्य शिक्षक करतात. शिक्षक म्हणजे  हातात  फक्त छडी घेऊन मोठ्याने खेकसणारा खडूस व्यक्ती असेच चित्र अनेकांच्या मनात असते .शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक  धोरणात्मक बदल होत  असताना, गुणवत्ता  की सार्वत्रिकीकरण यासारख्या काही गुंतागुंतीच्या संकल्पनाबाबत सुवर्णमध्य  दिसत नसताना शिक्षकांचे कार्य निश्चितच आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या क्षमतेची खरी कसोटी लागते व त्यामुळे जबाबदारीही  वाढते. शिक्षक-विद्यार्थी संबंधात काहीवेळेस शिस्तीचा  अतिरेक केला जातो , तर काही वेळेस शिस्त नावाची काही गोष्ट आहे याचा ठावठिकाणा ही सापडत नाही. खरेतर शिक्षक हा पालक असतो. त्याने विद्यार्थ्यांच्या भाव विश्वात डोकावले पाहिजे. त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. असे केल्याने विद्यार्थी  ज्या गोष्टीची चर्चा आपल्या पालकांसोबत करू शकत नाहीत त्या शिक्षकांसोबत सहजतेने मांडून आपले मन मोकळे करू शकतात. विद्यार्थ्यांच्या मनातील  अनेक भय-चिंता यांच्या गाठी शिक्षकांच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विद्यार्थ्याचा कल, त्याची आवड    त्याच्यातील क्षमता ओळखून  त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. इतिहासात डोकावून पाहिल्यास असे अनेक कर्मयोगी सापडतील की ज्यांनी शिक्षकी पेशा हा व्रत म्हणून स्वीकारले. वैयक्तिक आयुष्यात निर्लोभी वृत्तीने प्रपंचाचा गाडा चालवला, प्रसंगी अनेक आघात सहन केले परंतु आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड  केली नाही. या सृजनाच्या साधकांनी आपल्या विद्यार्थ्यामध्ये या जीवनमूल्यांचा वस्तुपाठ आपल्या आचरणाने घालून दिला. म्हणून आपण पाहतो कीज्या व्यक्तींनी स्वत:च्या  क्षेत्रात उत्तुंग यश कमावले आहे  त्यांच्या आयुष्यात शिक्षकाचा अत्यंत जबरदस्त प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. काहीनी तर आपल्या शिक्षकाच्या घरी राहून आपले शिक्षण पूर्ण केले. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्यांचे  आचरण करून  समाजासमोर एक आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच  घडवणारे शिल्पकार आहेत. समाज निरोगी राहण्यात, समाजाची संवेदनशीलता  टिकवून ठेवण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक स्वरूपाची आहे. एका अर्थाने शिक्षकाकडे समाजाच्या बौद्धिक क्षेत्राचे नेतृत्व असते. म्हणजे एखादया व्यक्ती, घटना अथवा परंपरा या  विषयी  शिक्षकाचे मत हे दिशादर्शक असते. 
      शिक्षकांप्रती समाजात असलेला अनादर वाढावा अशा अनेक घटना घडत  असल्या तरी सुध्दा आजही अनेक ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचे राष्ट्रकार्य करणारे शिक्षक कार्यरत आहेत. त्यांची संख्या कमी असेलही, पण म्हणून शिक्षकांविषयी नकारात्मक सूर आळवन्यापेक्षा शिक्षकी पेशा मधील क्षमतांचा जागर होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षक हा अनेक पिढ्यांना घडवत असतो. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, नीतिमूल्ये यांची शिकवण तो रुजवू शकतो. आपल्या सहज संवादाच्या माध्यमातून सामाजिक जाणिवा व श्रम शक्ती विषयी प्रतिष्ठा  निर्माण करण्यात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. खरेतर, विद्यार्थ्याशी संवादाचा सेतू बांधून त्यांच्या निरागस भाव विश्वाशी जोडले गेल्यास अनेक कोमेजणा-या कळ्याना नवसंजीवनी मिळू शकेल.
      शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून संस्कारांचे एक विद्यापीठ असते याचे उदाहरण म्हणजे 'शामची आई' या अजरामर ग्रंथाचे लेखक साने गुरुजी. शिक्षक हा कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे साने गुरुजी.मातृ हृदयी असणा-या साने गुरुजींच्या मनात राष्ट्र व सामाजिक संवेदना केवळ बोलन्यापुरता नव्हत्या तर प्रत्यक्ष आचरणाने त्यांनी समाजात जीवन मुल्यांची पुनर्स्थापना केली. यातून  समाज निर्मिती च्या कार्यात शिक्षकांच्या अफ़ाट क्षमतांचे  दर्शन होते.  आजही ग्रामीण भागातील अनेक गावात  शिक्षकांच्या माध्यमातून विकासाची सामुहिक इच्छाशक्ती  निर्माण झालेली दिसून येईल. ज्यामुळे  गावाचा, परिसराचा  कायापालट होऊन विकासाची गंगा प्रवाहित झाल्याचे दिसून येईल. विशेषकरून व्यसनमुक्ती, वृक्षारोपण यासारखे सामुहिक विकासाला दिशा देणा-या मुद्यांची अंमलबजावणी  शिक्षकांच्या पुढाकाराने प्रत्यक्ष स्वरूपात  झाल्याचे दिसून येईल. विद्यार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक घडवणे व अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व एका अर्थाने मनुष्य निर्माणाचे  कार्य करून शिक्षक हा ख-या अर्थाने सृजनाचा साधक होऊ शकतो.
     विकासाची अंत:प्रेरणा व आपल्या कार्या विषयी समर्पण वृती शिक्षकाला एका वेगळ्या उंचीवर नेउन ठेवते. या उंचीवर असल्याने एक जबाबदारी येते. शिक्षकामध्ये असलेल्या या नितीमुल्यांच्या भक्कम आधारावर समाजातील संवेदना उभी आहे. सामाजिक जाणिवा टिकून आहेत. समाजातील वैचारिक प्रगल्भपणा विकास पावत आहे. एकूणच समाजाची जडणघडण होत आहे. असे हे शिक्षकपण स्वीकारलेल्या या व्रतस्थानी स्वत:मधील कर्मयोगी जागवावा, समाजाचे बौद्धिक नेतृत्व स्वीकारावे व खर-या अर्थाने संस्कारांचे विद्यापीठ व्हावे  याकरिता  हा जागर.  शिक्षक दिनाच्या निमित्ताने अशाच काही कर्मयोग्यांचे कार्य स्मरण होणे गरजेचे आहे.ज्यामुळे  प्रेरणा निर्माण होऊन सृजनाची ही प्रक्रिया अधिकाधिक गतिमान होऊ  शकेल

No comments: