मराठवाड्याचा (मुक्ती) संग्राम आजही चालूच - दर्पण

Tuesday, September 16, 2014

मराठवाड्याचा (मुक्ती) संग्राम आजही चालूच


१७२४ ते १९४८ असा मोठा काळ निजामशाहीत काढल्यानंतर स्वातंत्र्य उपभोगणारा मराठवाडा हा कुपोशितच राहिला. रझाकारांची फौज सशस्त्र अत्याचार करत होती. अशा परिस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली  अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम आपल्या शौर्याने पावन केला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून  मराठवाडा मुक्त झाल्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्यांनी या प्रदेशाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे होते. मराठवाडा शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत अत्यंत मागासलेला होता. शिक्षणाची सुविधा प्रामुख्याने हैद्राबाद येथे होतीपरिणामी अनेक पिढ्या निरक्षर राहिल्या याचा परिणाम म्हणून लोकशिक्षण इथे रुजलेच नाही. जीवनशैलीच्या नवनवीन संकल्पना, ज्ञान प्रागतिक विचारांची रुजवण झालीच नाही. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत नरहर कुरुंदकर,बी. रघुनाथ यांनी साहित्यसाधनेचा दीप तेवत ठेवला.
   मराठवाड्यातील संताचे कार्य सामान्य व्यक्तीला आध्यात्मिक मार्गात दीपस्तंभप्रमाणे आहे. त्यांच्या ज्ञान प्रतिभेने आध्यात्मिक जगात नवे आदर्श स्थापित केले. पैठणचे शांतीब्रम्ह संत एकनाथ यांनी आपल्या भक्तिमार्गाने एकनाथी भागवत, भारुड अशी समृध्द साहित्याची खाण जनसामान्यासाठी खुली करून दिली. गुरुग्रंथसाहिब या पवित्र ग्रंथात ज्यांच्या वचनांचा अंतर्भाव आहे असे संत नामदेव हिंगोली जिल्ह्यातील नर्सी या गावचे. दासबोधाची रचना करून व्यवस्थापन कौशल्य राष्ट्रधर्म शिकवणारे समर्थ रामदास यांचे जन्मगाव जालना जिल्यातील जांब हे आहे. वारकरी संप्रदायात अत्यंत आदरणीय अशा संत जनाबाई गंगाखेड या परभणी जिल्ह्यातील गावच्या रहिवासी. शिख बांधवांसाठी अत्यंत पवित्र असलेले हजूर साहिब नांदेड मराठवाड्यातील महत्वाचे शहर. एकूणच मराठवाड्यातील जनमानस आध्यात्मिक वातावरणाने भारलेले राहिले आहे.
मराठवाड्याला राजकीय नेतृत्वाने  देशाचे नेतृत्व केले. शंकरराव चव्हाण, प्रमोदजी महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथजी मुंडे अशा दिग्गजांनी देशपातळीवर  आपले नेतृत्व सिद्ध केले. राज्याचे मुख्यमंत्रीपद ही भूषवले.  
या पार्श्वभुमीवर सध्याच्या स्थितीचा विचार करता विकासाबद्दल फारसे आशादायक चित्र आहे असे म्हणता येत नाही. रेल्वे सारख्या दळवळनाच्या महत्वाच्या  मुद्यावर अनेक वर्षे संघर्ष करूनही फारसे काही हाती लागत नाही. नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता मिळतात. रेल्वे अर्थसंकल्पात मान्यता मिळालेल्या विकासकामाना वर्षानुवर्षे निधी मिळत नाही. जायकवाडी प्रकल्पात पाणी मिळवण्यासाठी राजकीय नेतृत्वाची उदासीनता सामान्य जनतेत अस्वस्थता  वाढवणारी आहे. मराठवाडा जनता विकास परिषद ही मराठवाडयाच्या जनतेचे प्रतिनिधित्व करते. मराठवाड्यातील  विविध प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी परिषद विविध उपक्रम, आंदोलनाचे आयोजन करत असते.
 मराठवाडा जनता विकास परिषद ही मराठवाडयाच्या जनतेचे प्रतिनिधित्व करते. मराठवाड्यातील  विविध प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी परिषद विविध उपक्रम, आंदोलनाचे आयोजन करत असतेत्यांनी आयोजित केलेल्यालोकप्रतिनिधींच्या बैठकांना अत्यल्प प्रतिसाद मिळतो. विधिमंडळातही मराठवाड्याचा आवाज क्षीणच असतो. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा जणू पाचवीलाच पुजलेला. याचे कारण जनतेमध्ये असलेली उदासीनता. विद्यापीठ नामांतरानंतर जनआंदोलन म्हणावे असे प्रसंग मराठवाड्याच्या नशिबी आलेच नाहीत. प्रश्न हा पडतो की, आपल्या दररोजच्या आयुष्यात भेडसावणारे प्रश्नाबाबतीतही आपण नागरिक म्हणून इतके मूक साक्षी कसे काय झालो आहोत? इतकी सहनशीलता आली कुठून? आपल्या लोकप्रतिधिना विकासकामाबाबत आपण साधे विचारतही नाही. भ्रष्टाचाराची तक्रार करणे आपल्याला ब्याद वाटते. नागरिकांची अशी स्थिती असल्यावर लोकप्रतिनिधीना दोष देण्यात काहीच अर्थ नाहीनागरिक क्रियाशील झाले तरच राजकीय नेतृत्व त्याप्रमाणे घडेल. नागरिक सजग नाहीत म्हणून सहकार चळवळ बुडाली. कारखाने,बँका अवसायनात निघाल्यालोकप्रतिनिधी जनतेला उत्तरदायी आहेत ही जाणीव  निर्माण करणे जनतेची जबाबदारी आहे. अशा पध्दतीने लोक शिक्षण होणे गरजेचे आहे. यामुळे विकासाची सामुहिक इच्छाशक्ती निर्माण होऊ शकेल. मराठवाडा मुक्ती संग्राम साजरा असताना नागरिकानी स्वातंत्र्य सैनिकांच्या  शौर्याचे,त्यागाचे प्रसंगाचे स्मरण करून आपल्या विकासासंबंधी काही उपाययोजना कराव्यात. समविचारी, सृजनशील नागरिकांना एका ध्येयाने प्रेरित व्हावे लागेल. विकासाचे स्वप्न पाहण्यासाठी आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारावी लागेल. ‘ : क्रियावान : पण्डित ‘  या वचनाप्रमाणे वैधानिक मार्गाने आंदोलन उभे करण्यासाठी वैचारिक नेतृत्व स्वीकारून क्रियाशील व्हावे लागेल. आपल्या कडे संतांचे आशीर्वाद आहेत, स्वातंत्र्य सैनिकांचे शौर्य आहे. विवेकाचा, ज्ञान प्रतीभेचा वारसा आहे. अशा समृध्द परंपरेचे आपण वारसदार आहोत. त्यामुळे आपण संकल्प करून ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करावे. मराठवाड्याच्या  संग्राम हा इथल्या नागरिकांच्या उदासिनतेशी आहेती उदासीनता दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले तरच -याअर्थाने आपला मुक्ती संग्राम साजरा होऊ शकेल.

No comments: