शुभ संकल्पांचा उत्सव - दर्पण

Tuesday, October 28, 2014

शुभ संकल्पांचा उत्सव


 
भारतीय संस्कृती वैभवशाली होण्यात सन उत्सवांचा मोठा वाटा आहे. उत्सवाच्या निमित्ताने मानवाचे  केवळ मानवाशीच नव्हे तर निसर्गप्राणी या सर्व घटकांशी आपले भावनिक नाते  दृढ करता येतात. नात्यांना  उजाळा मिळतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात विविध समस्यांना तोंड  लागते. गरजा पुर्ण करण्याच्या धडपडीत  अनेकवेळा आयुष्य हे एखाद्या मशीन सारखे यांत्रिक होते. यामुळे अर्थातच रोजच्या जगण्यातील आनंद संपून गेल्याने जगणे कंटाळवाणे वाटू लागते. शिणलेल्या अशा जीवाला उत्सवांच्या माध्यमातून नवी उर्जा मिळते. पदोपदी होत असलेला अपेक्षाभंगस्वप्नांच्या साकारता येत नसल्याने होणारी घुसमट क्षणभर विसरली जाते. दीपावली असाच एक चैतन्याचा उत्सव आहे. सर्वत्र पसरलेला अंधकार दूर करणारा  हा  उत्सव आहे. 
आयुष्यात विविध स्वरूपात असलेला ठाण मांडून बसलेला हा अंधकार व्यक्तीला त्रस्त करतो. विसंवाद हे या अंधकाराचेच एक स्वरूप. आपले सहकारी,आप्तेष्ट  यांच्याशी विविध कारणांनी विसंवाद निर्माण होतो. स्वाभिमान व दुराभिमान यातील रेषा स्पष्टपणे न उमजल्याने विसंवादाची ठिणगी पडते. अनेकवेळा क्षुल्लक कारण विसंवादाच्या मुळाशी असते. या अंधकाराने आपल्याला त्रास होत आहे याची जाणीव असूनही अधिकार,संपत्ती च्या  वृथा अभिमानापायी व्यक्ती हा अंधकार दूर करण्याचे प्रयत्न करत नाही. 
विविध मार्गांनी सुख मिळवण्याची नव्हे तर  ओरबाडण्याची वृत्ती ही सुद्धा अंधकाराचेच रूप आहे.स्वत:ची  गरज व हाव यांची नेमकी जाणीव नसल्याने आयुष्यात असा अंधकार पसरतो. गरज संपून हाव निर्माण झाली अशांती व मानसिक अस्वस्थता आपल्या मनोविश्वावर ताबा मिळवते. ज्यामुळे अशी व्यक्ती समाजातही आपला  प्रादुर्भाव पसरवत जाते. ओरबाडण्याची ही वृत्ती विविध सामाजिक अपराधांना जन्म देते. या अंधकारामुळे आपल्या डोळ्याना नैतिक  -अनैतिक असा काहीच फरक जाणवत नाही. परिणामी आयुष्याची वाटचाल एका दिशाहीनतेकडे मार्गस्थ होते.   
आपल्या भावभावनांचे क्षेत्र व्यापक होणे हे खरे प्रगतीचे लक्षण आहे. परंतु सध्या व्यक्तीच्या  भावभावना या उत्तरोत्तर संकुचित होत चाललेल्या आहेत. मी व माझे कुटुंब या  रेषा इतक्या जाड झाल्या आहेत की त्यापलीकडील जगाशी आपला काही संबध आहे ही जाणीव नष्ट होत चालली आहे. त्या रेषेपलीकडील जगाच्या दु:खाची धग आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचतच नाही. अंत:कारण बधीर होणे हे अंधकार पसरल्याचेच लक्षण आहे. ज्यामुळे इतराना दुख देऊन स्वतःला  सुख मिळवण्यात  काहीच गैर वाटत नाही. एका अर्थाने माणुसकीलाच आव्हान देणारा हा अंधकार समाजजीवनात वेगाने पसरत आहे. 
या विविध रूपातून अंधकार व्यक्तीला आयुष्यात दिव्यतेचा अनुभव घेऊ देत नाही. दीपावली या प्रकाशाच्या उत्सवाच्या निमित्ताने हा अंधकार दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. 

विसंवाद दूर करण्यासाठी स्वत:हून एक पाउल पुढे टाकले पाहिजे अथवा सकारात्मक प्रतिसाद तरी दिला पाहिजे. चांगल्या प्रयत्नाचे,कामाचे कौतुक करण्यात   सुद्धा अनेकजण कचरतात. खरे पाहता कौतुक करण्यानेकृतज्ञता व्यक्त करण्याने हृदयात एक विलक्षण आनंद निर्माण होत असतोआपल्या मनाच्या कक्षा रुंदावत असतात. सुसंवादाने बोलणारा आणि ऐकणारा दोघेही सुखावतात तर विसंवादाने दोघेही दुखावतात. जगणे सहज होण्यासाठी सुसंवादा सारखा सोपा मार्ग दुसरा कोणताही नसेल. परिश्रमाने संपत्ती निर्माण करून गरजांची पूर्तता केल्यास मानसिक स्थैर्य निर्माण होते. अन्यथा एकानंतर एक याप्रमाणे सोयी सुविधा वाढवण्याची हाव लागली तर सोयी सुविधांच्या आनंदवनातही मानसिक स्थैर्य लाभणार नाही. याकरिता गरजांची निश्चित सीमारेषा आखून त्यांची पूर्तता केल्यास एका अपूर्व समाधानाने आयुष्यातील क्षण-न -क्षण भरून जाईल. याचा अर्थ निष्क्रिय बनावे असा मुळीच नाहीतर काही जीवनमूल्याना प्रामाणिकपणे अनुसरून   आपला व्यवहार असावा. आपला जीवनप्रवास एका ध्येयाकडे जाणारा असावा. 
व्यक्तीच्या संवेदना जीवंत असतील  तरच ती व्यक्ती माणुस म्हणण्याच्या योग्यतेची आहे. ज्याक्षणी संवेदना मरून जातील त्याक्षणी  माणुसपणाचाच अंत होत असतो.'हे विश्वची माझे घर ' अशी उदात्त संकल्पना आपल्या संतानी मांडली. ज्ञानदेवानी संपूर्ण विश्वातील प्राणीमात्रासाठी पसायदान मागितले. संवेदनाक्षम व्यक्तिमत्व निर्माण होण्यासाठी जगातील दु:ख. वेदना समजून घ्यावा लागतीलत्यांचे जगणे आपल्या आकलनाच्या टप्प्यात आणावे लागेल. यासाठी दीपावली सारखा प्रकाशाचा उत्सव आपण जवळच्या एखाद्या अनाथालयातवृध्दाश्रमात जाउन त्यांच्यासोबत साजरा केल्यास आपल्याला त्यांचे जगणे उमगू लागेल. आपण जाणतो की विचारातूनच व्यक्तिमत्वात परिपक्वता येते याकरिता वाचनसंस्कृतीचा विकास होणे गरजेचे आहे. दीपावली च्या निमित्ताने आपण किमान एखादा तरी ग्रंथवाचावा व तसेच भेट देण्यासाठी जाणीवपूर्वक ग्रंथ द्यावेत. 
दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे. अंधकार दूर करणारा आहे. आपण यानिमिताने आपल्या शक्तीनुरूप एखादा शुभसंकल्प करावा. ज्यामध्ये समाजहित असेल असा कोणताही शुभसंकल्प अंधकाराच्या नायनाट करण्याची खरी सुरवात असेल. शुभसंकल्पाचा एखादा दीप आपल्या अंतकरणात प्रज्वलित केल्यास ख-या अर्थाने चंदेरी तेजाची न्यारी दुनिया आपल्या अनुभवास येऊ शकेल. आपली वाटचाल माणुसपणाच्या परिपूर्णतेकडे नेणा-या दिव्यमार्गावर वेगाने होऊ लागेल. या मार्गाचे आपण पांथस्थ व्हावे ही शुभेच्छा. 

No comments: