विद्यापीठीय बंदीशाळा - दर्पण

Monday, November 17, 2014

विद्यापीठीय बंदीशाळा

भारताला ज्या काही मोजक्या बाबींमुळे संपूर्ण जगात सन्मान मिळतो, त्यातील प्रामुख्याने उल्लेख करावा असे तक्षशिला व नालंदा येथील विद्यापीठे आहेत. ज्या ठिकाणी विद्यार्थ्याना तत्वज्ञान, कला, विद्या यांचे शिक्षण मिळण्याची सुविधा होती. मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा होती. येथील आचार्य हे महान तत्वज्ञ व तसेच प्रकांडपंडित होते. एका अर्थाने विद्यार्थ्याचे जीवन घडविणारी ही संस्कारपीठे होती. भारताच्या महान ज्ञान-विज्ञान परंपरेचा वारसा ज्यांनी  चालवला अशी व्यक्तिमत्वे इथे घडत होती. एकूणच भारताच्या सांस्कृतिक परंपरेची आधारशीला म्हणता येईल अशी ही स्थाने होती.
हा इतिहास आठवण्याचे कारण असे की, नुकतेच उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरुनी फारच गमतीशीर विधान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थीनी  वाचनालयात गेल्या तर तेथे विद्यार्थ्यांची संख्या वाढते. असल्या वाक्याने अपेक्षेप्रमाणे व्हायचा तो गोंधळ झाल्यानंतर स्पष्टीकरण  देताना असे सांगण्यात आले की, जागेच्या अभावी असे वाक्य बोलले गेले. अर्थातच जेवढे हास्यास्पद वाक्य त्यापेक्षा त्याचे स्पष्टीकरण होते.
आपल्या देशात अनेक ठिकाणी प्रचंड विरोधाभास स्पष्टपणे दिसून येतो. एकीकडे आपण मंगळयानाबद्दल उत्सव साजरा करतो ज्या प्रकल्पामध्ये अनेक अभियंता महिला होत्या. मुलीना मोफत शिक्षण असो अथवा इतर योजना असो महिला सबलीकरणाचे नारे चारी दिशांनी घुमू लागतात. त्याचवेळी दुसरीकडे विद्यार्थीनीना ग्रंथालयात प्रवेश नाकारण्यात येतो ते सुध्दा त्यांच्यामुळे विद्यार्थी जास्त येतात म्हणून. असले बौद्धिक दिवाळखोरी करणारे विधान एखाद्या प्रशासकीय अधिका-याने केले असते तर कदाचित त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. परंतु दुर्दैव म्हणजे हे विधान विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरुनी केले आहे.
‘सा विद्या या विमुक्तये’ या संस्कृत वचनातून शिक्षणाबद्दलचा आपला व्यापक दृष्टीकोन दिसून येतो. खरे पाहता विद्यापीठ हे संशोधनाचे आधारस्तंभ आहेत. ज्ञान- विज्ञानाची साधना करण्याचे पवित्र ठिकाने आहेत. जेथे जिज्ञासू विद्यार्थी- विद्यार्थीनी येऊन आपल्या प्रतिभा कौशल्याचा विकास करू शकतील. व्यावहारिक जीवनातील समस्याचे निराकरण करतील असे संशोधन करू शकतील. साहित्याची साधना करून समाजाला वैचारिक दिशा देऊ शकतील. यासाठी ग्रंथ, उपकरणे अशी सर्व साधने उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे सामाजिक कर्तव्य विद्यापीठात पार पाडले गेले पाहिजे. एका अर्थाने मनुष्य निर्माणाची प्रक्रिया गतिमान करण्याचे उच्च ध्येय उराशी बाळगून त्यादृष्टीने मार्गक्रमण केले पाहिजे.
यासाठी अर्थातच एका दूरदर्शी नेतृत्वाची आवश्यकता असते. कुठलीही संस्था, संघटना ही नेतृत्वाच्या वैचारिक प्रगल्भतेच्या व निर्णयक्षमतेच्या कौशल्यावर यश प्राप्त करते. एखाद्या संस्थेला, संघटनेला ठरवलेल्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी विकासाची तळमळ असलेले,  तत्वांशी बांधिलकी असणारे नेतृत्व गरजेचे असते. ही तळमळ असली की आर्थिक ,मनुष्यबळ यांचे व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात करणे अथवा होणे ही फार कठीण नाही. त्यातही शिक्षणासारख्या अतिमहत्वाच्या क्षेत्रात असे नेतृत्व फारच आवश्यक आहे. या ठिकाणी पिढ्या घडत असतात. देशाचे भावी  आधारस्तंभ इथे तयार होत असतात. परंतु काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी नेतृत्वाबाबत फारसे आशादायक चित्र नाही असे अत्यंत खेदाने नमूद करावेसे वाटते.आपल्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर, गुणवत्ता ही अत्यंत उच्च स्तरावरील असली तरी त्याला योग्य दिशेने घडविणारी सक्षम व्यवस्था निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो नाहीत हे वरील उदाहरणाने दिसून येते. जेथे कुलगुरुनाच प्रबोधन करण्याची गरज निर्माण होत असेल ते विद्यार्थ्याना काय दिशा देणार? शिक्षणक्षेत्रातील अनागोंदी ही राष्ट्र विकासाला सर्वात मोठा अडथळा आहे.
मुलींच्या मागे मुले येतात व त्यामुळे मुलीनी येऊ नये असे सांगण्यापेक्षा मुलींच्या मागे फिरणा-या टवाळखोर मुलांना जाब विचारण्याची हिम्मत का   करत नाहीत. ग्रंथालयात नियमित कोण येतो, प्रामाणिकपणे अभ्यास कोण करतो याची पूर्ण माहिती ग्रंथालय कर्मचा-याना असते. त्यामुळे निव्वळ मुलींची छेड काढण्याच्या हेतूने कोणी येत असेल तर त्याला ओळखणे फार कठीणातले काम  आहे असे नक्कीच नाही. तेव्हा अशा लोकाना पायबंद घालण्याऐवजी मुलीना प्रवेश नाकारणे अत्यंत लाजिरवाणे आहे. विशेष म्हणजे आपल्या विधानाच्या संदर्भात कुलगुरुनी जे स्पष्टीकरण दिले आहे ते अत्यंत पोरकट आहे. ‘पुरेशी जागा नाही’ हे कारण असूच शकत नाही. विद्यापीठ अनुदान आयोग नावाची केंद्र शासनाची संस्था  पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी देते हे सर्वज्ञात आहे. इमारत,क्रीडांगणे यांच्या निर्मितीसाठी अगदी तालुकास्तरापर्यंत निधी देण्यात येतो. अलीगड विद्यापीठाने तरी अशी स्पष्टीकरणे देऊ नयेत.
कुलगुरू सारख्या अत्यंत महत्वाच्या पदावरील व्यक्तींनी ज्ञान-विज्ञानाला नव्या आयामांसह विद्यार्थ्यांपर्यंत न्यावे व संशोधनाची प्रमुख केंद्रे असणारी विद्यापीठे पुन्हा एकदा आपल्या गौरवशाली परंपरेला अनुसरून राष्ट्राच्या विकासाला आवश्यक असणारी उर्जाकेंद्रे झाली तर भारत पुन्हा एकदा जगद्गुरू बनेल .  

No comments: