अधर्माचा धार्मिक देखावा - दर्पण

Monday, November 24, 2014

अधर्माचा धार्मिक देखावा

  
अनादिकाळापासून मानवसमुह धर्मभावनेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने जोडला गेलेला आहे. समाजमनावर धर्मसत्तेचा मोठा प्रभाव होता किबहुना आजही आहे. नैतिक -अनैतिक संकल्पना, सृष्टीची  उत्पत्ती, कार्यकारण भाव, कर्म त्याचा परिणाम या सर्वांची चर्चा,ज्ञान तत्वांच्या द्वारे धर्माच्या माध्यमातून समाजमनावर मांडली जाते.व्यक्तीची जाणीव विस्तारली जावी, त्याला आपल्या अस्तित्वाचे कारण उमजावे व जीवनध्येय साध्य करण्याचा मार्ग सापडला जावा ज्यामुळे त्याचे आचरण आदर्श होऊ शकेल याकरिता धर्माचे निमित्त आहे. साधारणपणे असे म्हणता येईल की, धर्म म्हणजे आदर्श आचारसंहिता अथवा अशी तत्वे ज्यामध्ये सर्व जीवांचे कल्याण सामावले आहे. परंतु भारतीय समाजमनावर प्रबळ असलेल्या धार्मिक भावनेचा अनेक जण दुरुपयोग करताना दिसत आहेत. सध्या हरियाणातील रामपाल ही  व्यक्ती चर्चेत आहे. आपल्याला अटक होऊ नये यासाठी आपल्या शस्त्रधारी समर्थकांच्या गराड्यात सुरक्षित राहणारा संत असूच शकत नाहीत. हा रामपाल स्वत:ला कबीरांचा अनुयायी म्हणवतो. वास्तविक ज्याने कबीरांच्या दोह्यांचे किमान एकदा जरी वाचन केले असेल त्याला रामपाल या व्यक्तीचे थोतांड लगेच कळून येईल. रामपाल हा हिंदू धर्माचा अनुयायी अथवा धर्मगुरू नाही. या व्यक्तीने कबीरांच्या नावावर स्वत:चा असा वेगळा पंथ निर्माण केलेला आहे. स्तुतीपाठकांचे कोंडाळे जमवून व्यक्तिस्तोम माजवणे या हेतूने उभा केलेला देखावा होता. गुन्हेगारांनी जेवढे समाजाचे नुकसान नसेल केले त्यापेक्षा कैकपटीने जास्त नुकसान असल्या महाभागांनी केले आहे. नियती यथावकाश त्यांना त्यांच्या कर्माचे फळ देईलच.

करता था तब करी रहा, अब क्यो पछिताए
बोवे पेड बबुल के आम कहां ते खाए

संत कबीरांनी असे आपल्या दोह्यात सांगितलेच आहे, 
   
परंतु खरा प्रश्न आहे तो स्तुतीपाठकांचा. खरेतर धर्मतत्व नेमके कोणते आहे? खरा साधू कोणास म्हणावे याविषयी अत्यंत स्पष्ट विवेचन संत साहित्यात आहे. अत्यंत थोडक्यात सांगायचे तर ‘ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती’  असा ज्यांच्या स्वभाव आहे. ज्याना व्यक्तिस्तोम मान्य नाही. अशा विभूती आपल्या संतत्वाचे प्रदर्शन करत नाहीत. आयुष्याची सार्थकता त्यांच्या सहवासाने कळून येते. स्वामी विवेकानंद व त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचा संवाद, त्यांचे चरित्र यांचा अभ्यास प्रत्येक जिज्ञासूने केला पाहिजे.
धर्मतत्वांचे वास्तविक आकलन झालेल्या महापुरुषांनी धर्म तत्वांचा सोपा अर्थ जनसामान्याना स्पष्ट करून सांगितला. यासाठी त्यांनी भौतिक सुखोपभोगाचा त्याग करून धर्मतत्वे आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणली. त्यांच्या हृदयात सामान्याविषयी अपार करूणा असल्याने त्यांनी भोळ्या भाबड्या भाविकांना परमार्थाचे सूत्र उलगडून दाखवले.  संत तुकारामांच्या भाषेत सांगायचे तर ‘बुडते हे जन न देखवे डोळा ’ या भावनेने त्यांनी अनेकांचे आयुष्य आध्यात्मिकतेने भारावून टाकले. संत हे केवळ लोककल्याणाकरता जगत असतात. पद, प्रतिष्ठा, मान-सन्मान, पैसा, स्तुती, बडेजाव यांच्यामध्ये त्याना काडीमात्र रस नसतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात दिव्यता प्राप्त व्हावी हीच त्यांची तळमळ असते. अनेक वेळा समाजाचाच्या कल्याणाचा विचार करण्या-याला समाजाकडून उपेक्षा, त्रास सहन करावा लागतो. परंतु आपल्या ध्येयमार्गावरून ते जराही विचलित होत नाहीत. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडाना समाजाकडून,तत्कालीन धर्म मार्तंडाकडून अतोनात छळ, मानसिक क्लेष सहन करावा लागला. परंतु शेकडो वर्षांपासून मराठी माणसाच्या मनोराज्यावर अधिराज्य करणा-या आपल्या ज्ञानेश्वरी या दिव्य ग्रंथात त्यांनी एकाही ठिकाणी याचा साधा उल्लेखही केला नाही, उलट जगनियंत्याला ‘जो जे वांछील तो ते लाहो’ अशीच प्रार्थना केली. समाजात आजही अनेक ठिकाणी अशा संत प्रवृतीचे व्यक्तिमत्वे आपल्या कर्मयोगाचे प्रामाणिकपणे पालन करतच आहेत. प्रसिद्धी, पुरस्कार आदी बाबींपासून ते कोसो दूर आहेत.
संतत्व हे ये-या गबाळ्याचे काम नाही किंवा एखादी पदवीही नाही. संतत्व ही वृत्ती आहे. ही वृती आपल्या व्यक्तीमत्वात रुजण्यासाठी झिजावे लागते. स्तुतीपाठकांच्या गराड्यात रममाण असणारे स्वत:चीच फसवणूक करत असतात.अनेकांच्या आयुष्याशी खेळत असतात.  समाजातील व्यक्ती अशा व्यक्तीस्तोमाला आहारी जातात याचे कारण त्यांच्या मानसिकतेत आहे. अनेकांना  कमी कष्टात जास्तीत जास्त सुखसोयी-लाभ मिळण्याची अपेक्षा असते. म्हणजे अभ्यास न करता पास व्हावे अशी अपेक्षा करणारा विद्यार्थी, कष्ट न करता गुप्तधन मिळून श्रीमंत होऊ इच्छिणारा आळशी व्यक्ती व विशेष करून आपल्या कर्तव्याला चुकवून यशस्वी होण्याची अपेक्षा करणारा प्रत्येकजण असल्या महाभागांचे सावज. वास्तविक हे अगदीच सहजपणे समजण्यासारखे आहे की कष्ट न करता, प्रयत्न न करता फलाची अपेक्षा ठेवणे शुद्ध भाबडेपणाचे तर आहेच शिवाय स्वत:ची फसवणूक करण्यासारखे आहे. अध्यात्माच्या अभ्यासाने, आचरणाने व्यक्ती कार्यप्रवण होतो, प्रयत्नशील होतो. श्रीमदभगवदगीता याचा सर्वोत्तम पुरावा आहे. नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून न्यायासाठी प्रसंगी आप्तस्वकीयांशी  युद्ध करावे लागले तरी त्यास आनंदाने सामोरे जाण्याची शिकवण श्रीमदभगवदगीतेमध्ये आहे. ही शिकवण लक्षात घेऊन आपण कर्तव्यप्रवण बनावे, आध्यात्मिक बनावे. आळश्याला कुठलीही देवता कधीच प्रसन्न होणार नाही हे अगदी खात्रीने समजावे.  एखादा मार्ग स्वीकारताना अथवा व्यक्तीच्या विचारांचा अनुनय करताना पारखून घ्यावे. संतत्व ओळखण्याची पात्रता स्वत:मध्ये निर्माण करावी. तरच स्वत:चे व समाजाचे हीत आहे. अन्यथा यापुढेही अधार्मिक तत्वे धर्माचा पोशाख घालून आपला देखावा सादर करतच राहतील. 

No comments: