सावर रे मना..... - दर्पण

Sunday, November 30, 2014

सावर रे मना.....


जगण्याचा आनंद घेण्यासाठी ज्याप्रमाणे निरोगी शरीर आवश्यक आहे त्याचप्रमाणे मन ही निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. मनाचे अंतरंग जाणणे अथवा त्याचा थांग लागणे हे  निश्चितच सोपे काम नाही. परंतु एक मात्र नक्की की, व्यक्तीच्या दैनदिन आचरणात मनाच्या  व्यवहाराचे निरीक्षण केले तर असे जाणवेल की आपल्याला अस्वस्थ करणा-या अनेक मानसिक त्रासाचे कारण आपल्या मनाच्या गाभा-यात दडलेले आहे, परंतु  ते निरोगी राहावे यासाठी आपण फारच थोडे प्रयत्न करतो. मनाचा व्यवहार सुरळीत चालावा यासाठी  संत साहित्यात सविस्तर संशोधन-चर्चा करण्यात आली आहे. विशेषकरून आध्यात्मिक प्रगती साठी मनाच्या अनियंत्रित व्यवहारावर अंकुश निर्माण करण्याकरीता प्रयत्न केले जातात. चंचलता,अस्थिरता हा मनाचा नैसर्गिक स्वभावच आहे,परंतु प्रयत्नांनी त्याची चंचलता नियंत्रित होऊ शकते. भूतकाळातील  त्रासदायक अनुभवांचा शोक अनावर झाला की मन तिथेच गुंतून जाते, परंतु यामुळे वर्तमानात भान हरपलेला व्यक्ती एकाग्रतेने आपले काम करू शकत नाही परिणामी जगण्याचा कंटाळा येतो, किंवा भविष्यकाळातील चिंतेने मनाचा ताबा घेतला की सदैव भीती वाटत राहते. या व अशा अनेक मानसिक समस्या आपले जगणे कुरतडून टाकत आहेत. डिप्रेशन, उच्च रक्तदाब यासारख्या   विविध प्रकारच्या आजारांनी अनेकांच्या आयुष्यातून आनंदाला हद्दपार केले आहे. याकरिता मनाच्या आरोग्य संवर्धनासाठी आपल्या दिनचर्येतील काही निश्चित वेळ गांभीर्यपूर्वक राखून ठेवला पाहिजे.संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात ’मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ’, समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक रचून मनालाच बोध केला आहे. प्रत्येक यश अथवा अपयश हे प्रथम मनामध्येच तयार होत असते. मनाच्या उत्तम आरोग्यासाठी आपला स्वत:शीच सुसंवाद असला पाहिजे. आपली दृष्टी ही अंतर्मुख असली पाहिजे. स्वत:चे कठोर, निरपेक्ष परीक्षण करता आले पाहिजे. म्हणजेच आपण सर्वात अगोदर स्वत:ला पूर्णपणे ओळखले पाहिजे. एकदा स्वत:शीच ओळख झाली म्हणजे पुढचा मार्ग सोपा बनत जातो.
आपले जगणे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून पळणा-यांची शर्यतीतला एक स्पर्धक असे असता कामा नये. आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे आहे. यशाची आपली व्याख्या कोणती आहे, ते मिळवण्याचा मार्ग कोणता याची पूर्ण जान ठेवून मार्गक्रमण केल्यास आयुष्य भरकटणार नाही. आपल्या वाट्याला येणारे दु:ख,अपेक्षाभंग यांचे व मान-सन्मान, पद प्रतिष्ठा यांचे पचन करता येणे अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण असे की,  कारण अत्यंत अनुकूल परिस्थिती असताना सामान्यांप्रती असणारा आपला व्यवहार, विशेषकरून भाषा बदलते. तसेच अत्यंत प्रतिकूल परीस्थिती असताना आपण खचून जातो, विमनस्कता निर्माण होते. या दोन्ही प्रसंगी आपण स्थिर राहून परिस्थितीचा सामना करण्यात जगण्याचे सूत्र दडलेले आहे याची जाणीव झाली की, सुखाने पराकोटीचा हर्ष अथवा दुखाने मनस्ताप होत नाही.
दैवदुर्विलास म्हणजे संवादाची अत्याधुनिक माध्यमे उपलब्ध असताना व्यक्ती उत्तरोत्तर एकलकोंडया होत चालल्या आहेत. संवादाचा अभाव हा अनेक मानसिक समस्यांची जननी आहे.
दुखाचा अतिरेक झाला की आत्महत्येचा मार्ग निवडला जातो.आत्महत्या करणा-यांच्या आयुष्यात तो निर्णय घेण्यापूर्वी किमान एकदा कोणाशी तरी संवाद झाला असता तर त्यापैकी अनेकांनी आत्महत्या केल्या नसत्या आपल्या आजूबाजूला असे अनेकजण दिसतील की, त्याना बोलते करण्याची खूप आवश्यकता आहे. सांगली जिल्ह्यात नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली. एका युवकाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी व्हाटस अप वर स्वत:चा फोटो टाकून त्यावर कै. असा उल्लेख केला व खाली भावपूर्ण श्रद्धांजली असा मेसेज ही लिहिला. विशेष म्हणजे हा फोटो त्या युवकाने आपल्या मित्रांना पाठवलाही होता, परंतु सर्वानी त्याकडे दुर्लक्ष केले.खरेतर त्याच्याशी संवाद साधून त्याचे दुख समजून घेणे गरजेचे होते. त्याला सांगणे गरजेचे होते की, अशा आततायी,अविवेकी निर्णयांनी काहीही साध्य होत नाही. आत्महत्या हे अत्यंत कमकुवत मानसिकतेचे लक्षण आहे. समस्यांचा सामना करण्याऐवजी त्याला टाळण्यासाठीचा हा पळपुटेपणा आहे. अनेकवेळेस आपल्या कामाप्रती श्रध्दा व यशाविषयी सबुरी यांची कमतरता जाणवते आहे. सर्वाना झटपट मोठया पदावर जायचे आहे. मात्र अनेकवेळा त्याकरिता आवश्यक असणारी समर्पित भावना,कष्ट घेण्याची तयारी दिसत नाही. खरेतर अशा वेळेस अपेक्षित यश न येणे अथवा शोर्टकट चा मार्ग वापरून मिळालेल्या तापुरत्या यशाने समाधान न मिळणे हे अगदीच नैसर्गिक आहे. परिणामी एकतर आयुष्याची फरपट होते अथवा स्वत:चीच फसवणूक केल्याने मनाच्या अंतरंगात एक अस्वस्थता सदैव घर करून राहते. हे टाळण्यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे स्वत:ला ओळखणे अत्यंत आवश्यक आहे.
स्वतःशी सुसंवाद असावा, आपल्या संपर्कात असणा-या एखाद्याशी संवाद साधून त्याचे दु:ख हलके केल्यास त्याच्या मनावरचे ओझे दूर होतेच शिवाय आपल्यालाही जगण्याचे अनके पैलू समजून घेता येतात. आपले काही शब्द त्याच्या जगण्याचे आधार बनू शकतात. यापेक्षा मोठी समाजसेवा कोणती असू शकते. जगण्याची लढाई समजून घेण्यासाठी किमान एकदा अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे चरित्र वाचावे, त्यावर आधारित चित्रपट पाहावा. मी हे खात्रीने सांगु शकतो की असा संघर्ष जाणून घेतल्यावर कोणीही आत्महत्या करण्याचा मूर्खपणा करणार नाही. गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट अशा दुर्गम भागात आपले जीवन व्यतीत करणा-या वनवासींचे जीवन बघावे. यातून आपल्याला जगण्याची नवी उमेद,प्रेरणा मिळेल. अशा लोकांसाठी आधार बनलेल्या बाबा आमटे,डॉ.अभय बंग यांच्या कार्याचा अभ्यास करावा. जीवनाला अर्थपूर्ण वळण मिळेल. ‘सावर रे मना’ हा मंत्र आपण सर्वानी समजून घेतल्यास अनेक खुडणा-या,कोमेजणा-या  कळ्या फुलू लागतील.  

No comments: