प्रेम नावाची समृध्द अडगळ - दर्पण

Sunday, November 9, 2014

प्रेम नावाची समृध्द अडगळ

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या ओळीतून प्रेम या व्यापक संकल्पनेची, पवित्र भावनेची व एका हळुवार नात्याची खोली स्पष्ट होते. प्रेम म्हणजे निरपेक्ष देणे. हे नाते बांधिलकी, विश्वासावर वर टिकते. प्रेमाचे नाते निर्माण झाल्यावर तेथे हव्यास नसतो तर समर्पण असते. जगण्याचे क्षण हे यज्ञातील समिधेसमान असते. प्रेमाचे नाते म्हणजे जगण्यातील खरे मर्म समजते. एखाद्या व्यक्तीविषयी, तत्वाविषयी अथवा देशाविषयी प्रेम निर्माण झाल्यावर एक भावानिक बंध निर्माण होतात, बंधने नाही. प्रेम म्हणजे आपल्या प्रेमास्पदाविषयीचा नितांत आदर सहजपणे निर्माण होतो.
परंतु दुर्दैवाने प्रेमाच्या व्याख्या काळानुरूप बदलल्या गेल्या आहेत. सध्याचे प्रेम म्हणजे केवळ शरीर सुखापुरतेच संकुचित झाले आहे. त्यातून मग एकतर्फी प्रेम व त्यामुळे तरुणींवर होणारे अत्याचार या बाबी अत्यंत दुर्दैवी आहेत. जन्मोंजन्मी साथ देण्याची शपथा घेणारे प्रेमवीर सध्या  ब्रेक अप, लिव्ह इन यांसारख्या शब्दात अधिक रमले आहेत. मृगजळासमान क्षणिक आकर्षणाकडे बेधुंद होऊन धावत जातात सिमकार्डसारखे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बदलले जातात. यात खरे प्रेम कमी व देखावा जास्त असल्याने असले प्रेमनाट्य जास्त काळ टिकत नाही. हिंदी- मराठी चित्रपटातील नायक व नायिका यांच्या प्रेमकथांनी प्रेरित होऊन त्यांचे अनुकरण करण्याकडे जास्त कल असतो.       म्हणजे आपल्या डोक्यावरील केशरचनेपासून ते कपडे व बोलण्यापर्यंत सर्व काही कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठीच असते. स्वत:च्या व्यक्तिमत्वाला साजेसे व स्वत:स अनुरूप असणारे वागणे-बोलणे फारच कमी प्रमाणात आढळून येते. अशा जगण्याने आयुष्यात कृत्रिमता येते. स्वत:शीच सारखी फसवणूक केल्याने एक अस्वस्थता कायम असते. आपल्या संपर्कात येणा-या प्रत्येकाने आपली सतत स्तुती करावी अशी भावना प्रबळ होणे हे कृतीम जगण्याचे लक्षण आहे. अशा त-हेने ‘इम्प्रेस’ करून तयार झालेले नाते हे प्रेम नक्कीच नव्हे. असला देखावा कधी ना कधी कोसळणारच. परंतु बेभान स्वातंत्र्याच्या धुंदीने मनाचा ताबा घेतला की विवेकाचे अस्तित्व नाहीसे होते. या विकृतीचा दुष्परिणाम समाजावर होतो. ‘पब्लिक डिसप्ले ऑफ अफेक्शन’ ही अशाच विकृत वृक्षाची फळे देशाच्या अनेक भागात पसरत आहेत. असल्या विकृतीत प्रेमीयुगुले जाहीरपणे  शारीरिक लगट करतात. कोची येथे नुकतेच ‘पब्लिक डिसप्ले ऑफ अफेक्शन’ ची विकृती करण्यासाठी ‘कीस ऑफ लव्ह सारखा कार्यक्रम जाहीरपणे आयोजित करण्यात आला होता. नागरिकांच्या विरोधामुळे कार्यक्रम यशस्वी झाला नाही. परंतु या निमित्ताने स्वातंत्र्य व जाबाबादारीच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात. एकतर शरीरसुख म्हणजे प्रेम नव्हे व दुसरे तेही असे उघडपणे करणे म्हणजे स्वातंत्र्याचे अपचन झाल्याचे लक्षण आहे.आम्ही वाट्टेल तेआम्हाला आवडेल त्या पध्दतीने करू शकतो आम्हाला कोणीच अडवू शकत नाही कारण आम्ही स्वतंत्र आहोत ’.असला माज स्वातंत्र्याचे अपचन झालेल्या व्यक्तींच्याच ओठी असू शकतो.  असल्या लाज सोडलेल्या उपटसुंभाना वेळीच समज दिली पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. समाजात कुटुंबात वावरत असताना काही बाबी या अगदीच खासगी असतात याचेही भान सोडलेले स्वातंत्र्य उपभोगण्याच्या लायकीचे नाहीत. पती-पत्नी सुध्दा कुटुंबात वावरत असताना सर्वांसमक्ष शारीरिक लगट करत नाहीत. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने कोणी रस्त्याने नागडा फिरत नाही. ही किमान समज ज्यांच्या बुद्धीच्या परिघाबाहेर जात असेल तर त्यांचे प्रबोधन कायद्यानेच केले पाहिजे. कोणतेही कार्य करत असताना स्थळ-काळ-वेळ यांचा विचार करावा असा संकेत आहे. त्या  अनुकूल असतील तर कार्य  चांगल्या पध्दतीने होऊ शकते असा सारासारविवेक आहे. परंतु विवेकाची बोळवण केलेल्यांकडून अशी अपेक्षा करणेच निरर्थक आहे. स्वातंत्र्याला विवेकाची साथ असणे समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
याचे कारण असे की ‘पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन’  ही मानसिकता स्वातंत्र्य व अविवेकाची पैदास आहे. ही विकृती वाढत गेली तर उद्या महाविद्यालये ही केवळ शारीरिक सुख मिळवण्याचे हक्काचे ठिकाण होऊन जातील. परिणामी तरुणाई व्यसनेअश्लीलता यांच्या आहारी जाऊन विवेकहीन बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वातंत्र्य व त्यासोबत असलेली जबाबदारी लक्षात घेऊन बेभान न होता विवेकयुक्त सामाजिक आचरण झाले पाहिजे.   
प्रेम ही समृद्ध अडगळ होऊ नये  ही शरीरसुखाच्या पलीकडे असणारी नितांतसुंदर अशी भावना आहे. या भावनेला जपावे , त्याचा देखावा करू नये. त्याग व समर्पण या आभूषणानी त्या पवित्र भावनेला सजवावे. तरच ही समृद्ध अडगळ न होता जगण्याची शक्ती बनेल. 

No comments: