नतदृष्टांचे रडगाणे - दर्पण

Monday, December 15, 2014

नतदृष्टांचे रडगाणे


घर की मुर्गी दाल बराबरअशी एक म्हण प्रचलित आहे. एखादे ऐतिहासिक महत्व असलेले साहित्य, स्थान आपल्या जवळ असेल तर  तर त्याचे महत्व आपल्या दृष्टीने अडगळीचेच असते. विशेषकरून व्यक्तींच्या बाबतीत तर तो व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याशिवाय त्याचे मुल्य कळतच नाही. त्यानंतर त्या व्यक्तीचे पुतळे उभे करण्यात मात्र आपल्याला प्रचंड उत्साह असतो. अनेकवेळा तर महत्व कळूनही जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा त्या व्यक्ती, साहित्य, स्थाने यांचे श्रेष्ठत्व विदेशात मान्य केले जाते तेव्हा आपण त्याच्या श्रेष्ठत्वाला मान्यता देतो किंबहुना त्यांच्या श्रेष्ठत्वाबद्दल आतापर्यंत असलेली आपली हरकत मागे घेतो. अशा ही नतदृष्टपणाची कीड  भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सुध्दा प्रभावी होती. तत्कालीन पुढारी इंग्रजाची मर्जी सांभाळण्यासाठी स्वदेश, स्वसंस्कृती, स्वदेशाभिमान, येथील सामान्य जनता यांची जमेल त्या वेळेस मानहानी करायचे. असल्या नतदृष्टांनी तात्कालिक फायद्यासाठी स्वत:च्या बुद्धीला गहाण ठेवून राष्ट्रभावनेचे अतोनात नुकसान केले.दुर्दैवाने अशांची वंशावळ आजही आपल्या पूर्वजांचा वारसा चालवत आहे. रवीन्द्रनाथानी असल्या घाणेरड्या वृत्तीवर हाते कलमेनावाचा निबंध लिहून कडाडून टीका केली होती. अनेकजण विचारवंत उपाधी मिळवण्यासाठी अक्षरशः घायकुतीला आलेले असतात. यासाठी त्यांना तातडीने पुरस्कार,मानसन्मान मिळवायचा असतो. म्हणून स्वदेशाभिमान खुंटीला टांगून स्वदेश,स्वभाषा, स्वसंस्कृती यांच्यावर टीका करायची व आपले उपद्रवमूल्य वाढवून घ्यायचे या मार्गाचा अवलंब ते करतात. यामुळे त्यांची विद्वत्ता (?) सिद्ध होईल या भाबड्या आशावादाने त्यांना घेरलेले असते. प्रसिद्धी झोताचे अधाशी असणारे महाभाग अशाना गाठतात व त्यामुळे दोघांचेही हेतू साध्य होतात. परंतु असल्या अनिष्ट चालीरीतींनी राष्ट्रभावनेचे अतोनात नुकसान होते. ही मंडळी आपल्या सोयीनुसार पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता यांच्या व्याख्या बनवतात व आपल्या मनसुब्यांना विरोध करणा-यांना मागासलेले अथवा धर्मांध ठरवतात.
भारताच्या आध्यात्मिक परंपरेत अनेक ग्रंथांनी वैश्विक बुद्धिवंतांच्या पातळीवर मान्यता, मानसन्मान मिळवला आहे. यात श्रीमदभगवदगीताया अलौकिक ग्रंथांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महात्मा गांधी, विनोबा भावे,लोकमान्य टिळक या व अशा अनेक जगन्मान्य विभूतींच्या जीवनाची तात्विक बैठक गीतेवर आधारलेली आहे. संत ज्ञानदेवानी गीतेतील ज्ञानाचा अनुपम रस सामान्य जणांना मिळावा याकरिता संस्कृत श्लोकाचे भाषांतर प्राकृत भाषेत केले. ही ज्ञानेश्वरी आजही करोडो वारक-यांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. अशा या भूषण असलेल्या ग्रंथाला केवळ हिंदू धर्माचा असल्याकारणाने दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक या ग्रंथात जीवनविद्येचे शिक्षण आहे. हा लढा सत्तेसाठी नसून सत्कर्म व कुकर्म यांच्यामधील आहे. नीती व अनीती यांच्या युद्धात प्रसंगी आपल्या नातेवाईकांशी लढावे लागले तरी त्यास न डगमगता समर्थपणे सामोरे जाण्याची शिकवण गीतेत आहे. गीतेचा संदेश हा गलितगात्र झालेल्या समाजपुरुषास कर्मयोगी होण्यास प्रेरणा देतो. दैनदिन जीवनात आपण नैतिक मुल्ये आचरणात आणावी यासाठीचा हा संदेश आहे. गीता समजुन घेणारा आणि त्याप्रमाणे आचरण करणारा कुठलाही व्यक्ती सृजनशील बनतो.समाजात  मनुष्यनिर्माण घडवणारी नितांतसुंदर अशी ही उर्जा शक्ती आहे. अर्थात यावर जरूर चिकित्सा करावी, विविध पैलू पडताळून बघावेत,परंतु प्रश्न आहे तो प्रामाणिक सत्यशोधनाचे प्रयत्न करण्याचा. बहुतेकजण  पूर्वग्रहदुषित होऊन मांडणी करतात त्यामुळे त्यांच्या हाती फार काही लागत नाही. गीता हा ग्रंथ कोणत्याही मान्यतेवर अवलंबून नाही. त्यामुळे राष्ट्रीय ग्रंथाची मान्यता मिळाल्याने गीता या ग्रंथाला अधिक प्रसिद्धी मिळेल अथवा जगभर मान्यता मिळेल असे अजिबात नाही. प्रश्न आहे तो या ग्रंथाला हिंदू धर्मीय आहे म्हणून दुय्यम ठरवण्याच्या नतदृष्ट्पणाचा.
मध्यंतरी योगविद्येच्या बाबतीतही असाच सूर उमटत होता. शाळेत योगासने, प्राणायाम शिकवणे म्हणजे शिक्षणाचे भगवेकरण करणे असा प्रचार संधिसाधू धर्मनिरपेक्षतावाद्याकडून केला गेला. वास्तविक गीता हा ग्रंथ मन निरोगी करत असेल तर योगविद्या मनगट मजबूत करते. या देशातील महान आचार्य परंपरा योगशास्त्राची जनक आहे. या अर्थाने खरेतर देशातील प्रत्येकाने योगविद्येचा अभिमान बाळगून त्याचा अभ्यास केला पाहिजे. जगभरात या योगशास्त्राचे महत्व सर्वाना समजू लागले आहे. याचा पुरावा म्हणजे नुकतेच आपल्या मा.पंतप्रधानांनी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवसम्हणून जाहीर करावा अशी सूचना संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सभेत केली. त्याला जगातील जवळपास १७२ देशांनी पाठींबा दिला. यावरून योगशास्त्राची महती आपल्या लक्षात येऊ शकेल. देशविदेशातील करोडो लोक योगशास्त्र शिकण्यासाठी भारतात येत असतात. आपली आध्यात्मिक शास्त्रे, तत्वज्ञान, योगविद्या येथील महापुरुष हे आपले ज्ञानाचे, सांस्कृतिकतेचे ऐश्वर्य आहेत. या देशात जन्म घेणारा प्रत्येकजण याचा वारसदार आहे. परंतु या अभिमानास्पद असलेल्या बाबींवर एखादा शिक्का मारून त्याची मानहानी करणे नतदृष्ट्पानाचे आचरण आहे. यांच्या रडगाण्याने त्याना काडीचेही समाधान मिळणार नाही. त्याना सुचवावेसे वाटते, जर आपण स्वदेश, स्वभाषा, स्व-संस्कृती यांचा सन्मान केला तरच इतर लोक आपल्याला सन्मानाची वागणूक देतील. स्वत:च्याच कुटुंबातील सदस्यांचा अपमान करणारा,सांगणारा जगात कुठेही सन्मान मिळवू शकत नाही. गीता राष्ट्रीय ग्रंथ होईल अथवा होणारही नाही परंतू आपल्या तात्कालिक स्वार्थापोटी  राष्ट्राभिमानाला हानी पोहोचेल असे वर्तन करू नये. याचा अर्थ असा नक्कीच नव्हे की, स्वत:ची बुद्धी न चालवता बाबा वाक्यं प्रमाणमया प्रमाणे आंधळेपणाने सर्व काही मान्य करावे. याउलट प्रत्येक बाबी बुद्धीच्या पातळीवर तपासून बघाव्यात.मात्र यासाठी आवश्यकता आहे ती प्रामाणिक प्रयत्न करण्याची. याचे परिपूर्ण उदाहरण म्हणजे जगभरात आपल्या मातृभूमीला, स्व-संस्कृती ला सन्मान प्राप्त करून देणा-या स्वामी विवेकानंदाचे. ज्यांनी सखोल अभ्यास, चिंतनाच्या बळावर येथील आध्यत्त्मिक शास्त्रात प्राविण्य मिळवले व मनुष्यत्वाचा संपूर्ण विकास कशात आहे हे स्पष्ट केले. सर्व सामान्यांना या मार्गावर चालण्यासाठी दिशा दाखवली. शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते की, नतदृष्ट्पणाचे रडगाणे बंद करावे व स्वदेशाभिमान जागृत ठेवून राष्ट्रभावना मजबूत करावी. 

No comments: