इथे ओशाळला मृत्यु - दर्पण

Sunday, December 21, 2014

इथे ओशाळला मृत्यु

मागील आठवडयात तालिबानी नरपिशाच्चानी पेशावर मधील निरपराध विद्यार्थ्यांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण जग हादरले. मृत्युनेही क्षणभर ओशाळावे अशा या घटनेचा   सर्व स्तरातून कठोर शब्दात निषेध व्यक्त केला गेला. भारतात सर्व शाळांमधून श्रद्धांजली अर्पण केली गेली. यासारखीच एक घटना ऑस्ट्रेलिया मध्ये घडली. काही दहशतवाद्यांनी एका कफे मध्ये नागरिकांना बंधक बनवले होते.सिरीया मध्येही घुसफुस चालूच आहे.एकूणच जगभरात सर्वत्र दहशतवाद्यांनी थैमान माजवले आहे. बाकीच्या देशांच्या तुलनेत पाकिस्तान मधील घटना अत्यंत क्रूर होती. परंतु यातूनही पाकिस्तान सरकार काही धडा घेईल असे वाटत नाही. मुळातच पाकिस्तानमध्ये शासन व प्रशासनाचे काय हाल आहेत हे सर्व जगाला ठावूक आहे. लष्करशहा कोणत्या क्षणी पंतप्रधानाना पाय उतार करेल याचा अंदाज खुद्द पंतप्रधानांनाही नसेल. पाकिस्तान चा इतिहास याची साक्ष देतो आहे. तसेच इस्लामी धार्मिक मुलतत्ववादी लोक हा तेथील सर्वात प्रभावी  दबावगट आहे. त्यांचा शासन, प्रशासन व लष्कर यांच्यावर असलेला पगडा हा तेथील सामाजिक सामंजस्याला सर्वात मोठा धोका ठरत आहे. याचा परिपाक म्हणून तालिबान सारखे नरपिशाच्च तेथे स्वत:चे बस्तान बसवतात, उघडपणे रक्ताची होळी खेळतात. दुखाची बाब म्हणजे हे सारे धर्माच्या नावावर होत आहे व या चुकीच्या मार्गाबद्दल कोणीही ब्र सुध्दा उच्चारत नाही. एखाद्या निरपराध जीवाची निघृणपणे हत्या करणे कुठल्या धर्मात समर्थनीय असू शकते. आणि असलेच तर त्याला धर्म म्हणावे का ?  पेशावर मधील ज्या शाळेत हा नरसंहार झाला त्या कोवळ्या,निष्पाप जीवांना मारून कोणता देव प्रसन्न होईल ?
पाकिस्तानने आतंकवाद्यांना नुसते पोसलेच नाही तर त्यांना गोंजारले. आता याच लाडक्या अपत्याने आपल्या पालकावरच हल्ला चढवला आहे. अर्थात अशी हिम्मत ते करू शकले याचे कारण पाकिस्तानातील शासन,प्रशासनाच्या मर्यादांची त्यांना संपूर्ण माहिती असणार यात शंका नाही. त्यामुळे पाकिस्तानी नेत्यांनी व्यक्त केलेल्या निषेधाला काहीच अर्थ नाही. ही पाकिस्तानी जनतेची शुद्ध धूळफेक आहे. पाकिस्तानात तालिबानी भस्मासुराने आपले हात पाय इतक्या मोठ्या प्रमाणात पसरले आहेत की त्यांच्या समोर पाकिस्तानी शासन हतबल झाल्याचे चित्र आहे. याचे कारण म्हणजे तेथील इस्लामी धार्मिक मुलतत्ववादी दबावगट. अर्थात यामुळेच अराजकाच्या सीमेवर पोचलेला पाकिस्तान स्वतःहूनच कोलमडून पडेल. यात खरी चिंतेची बाब आहे ती     भारताला व एकूणच दक्षिण आशियाला. पाकिस्तानने नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवण्याऐवजी भारतासोबत शस्त्रास्त्र स्पर्धेला नेहमीच प्राधान्य दिले. यात अण्वस्त्रांचाही समावेश आहे. तालिबानी नरपिशाच्च स्वत:च्या धर्माच्या , देशाच्या  निरपराध बालकांना सोडत नाही तिथे अन्य लोकांची काय कथा. अशा विध्वंसकारी मानसिकतेच्या राक्षसांच्या हाती जर तेथील अण्वस्त्रे लागली तर संपूर्ण दक्षिण आशियात भयंकर मोठा विनाश होऊ शकतो.            
धर्म तत्वे ही व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नती साठी असतात.स्वत:मधील काम, क्रोध, मोह, लोभ, ईर्ष्या, अहंकार यासारख्या आत्मशत्रूच्या विनाशासाठी असलेले हे युद्ध आहे, हे आपण जाणतो. परंतु तालिबान व इसिस सारख्या लोकांमुळे जगभरात इस्लामधर्म उत्तरोत्तर बदनाम होत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे अशा गोष्टीना इस्लाम मध्ये थारा नाही असे जाहीरपणे इस्लाममधील धर्मगुरू सांगत नाहीत. ज्याप्रमाणे रामपाल व तत्सम ढोंगी लोकांचा अधर्म प्रखरतेने मांडला जातो.(याच सदरातून रामपाल वर कठोर शब्दात टीका करण्यात आली आहे.) त्याप्रमाणे इस्लाम धर्मातील तत्ज्ञानी इस्लामधर्मातील अशा अमानवीय लोकांचा अधर्म जाहीरपणे मांडला पाहिजे. यामुळे सर्वसामान्य जनतेत सकारात्मक संदेश जाईल. बुद्धिवंतांचे मौन हे गुन्हेगारांच्या शस्त्रांपेक्षाही अधिक घातक असते. वेळीच असे केले गेले नाही तर स्वत:च्या क्षुद्र स्वार्थापायी नेहमीच धर्माला वेठीस टांगणारे अधर्मी आपल्या कुकर्माला धर्माच्या चौकटीत बसवण्यासाठी धर्मतत्वाला पादत्राणे बनवतील.परिणामी अनेक नागरिक विशेषकरून तरुण असल्या हिंस्त्र कृत्यांना धर्माचा अनुनय समजतील व यामुळे दहशतवाद्यांचे मनसुबे अधिकाधिक सफल होत जातील. अशाने धर्माची हार होते व अधर्माचा विजय होतो.
कल्याण मधील युवकांनी इसिस मध्ये दाखल होणे.केरळ मध्ये इसिस चा ध्वज फडकावणे व इसिस च्या ट्वीटर खाते बेंगलोर मधील युवकाने चालवणे हा अधर्माचाच विजय आहे. असेच होत राहिले तर दहशतवाद्यांच्या कुकर्मामुळे इस्लाम धर्मातील सामान्य नागरीकाकडे जनतेने संशयाने पाहिले तर त्यांना दोष देता येणार नाही . अशावेळी इस्लाम धर्मातील धर्मतत्ज्ञांची जबाबदारी अधिक वाढते. त्यांनी अत्यंत जबाबदारीने ख-या धर्मतत्वाचा जागर केला पाहिजे. असे केले तर आध्यात्मिक उन्नती करणारी धर्मतत्वे लपवून संधिसाधू, स्वार्थी लोक स्वत:च्या सोयीनुसार धर्मतत्वांचा उपयोग विनाशासाठी करण्यास धजावणार नाहीत. व समाजातील बुध्दीवंताचा पराजय होणार नाही. याकरिता मोठ्या प्रमाणावर सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. यासाठी किमान आतातरी पुढे येऊन त्यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे. ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. असे घडले तरच भविष्यात धर्माच्या नावावर नरपिशाच्चांकडून माणुसकीची हत्या होणार नाही. 

No comments: