रत्नांची आरास - दर्पण

Sunday, December 28, 2014

रत्नांची आरास

नुकताच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व काशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न जाहीर झाला. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव झाला. यानिमित्ताने पुरस्कार व यासंदर्भात समाजाच्या मानसिकतेबद्दल वैचारिक मंथन सुरु झाले.        
आपल्या कार्याचे कुणीतरी कौतुक करावे ही भावना असणे अगदीच नैसर्गिक आहे. कौतुक झाले  तर कार्य करण्यासाठी एक वेगळीच उर्जा मिळते. समाजाकडून आपल्या कार्याची दाखल घेऊन त्यावर व्यक्त केलेली कृतज्ञताच त्या पुरस्कारात असते. पुरस्काराची, कौतुकाची आवश्यकता निसंशय असतेच. मात्र पुरस्कारामध्ये अडकून पडल्यास अथवा या टप्प्याला कृतार्थता समजण्यात आली तर केलेल्या कार्याचे मुल्य कमी होऊ शकते. अथवा असेही म्हणता येईल की, पुरस्कार मिळवण्याच्या अपेक्षेने केलेले कार्य समाजात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणू शकत नाही.
आजही समाजात असे अनेक कर्मयोगी आहेत की ज्यांनी आपल्या कर्मयोगाला जीवनध्येय बनवले. हे कर्मयोगी एखाद्याच्या निंदेने थांबले नाहीत अथवा स्तुतीने हुरळून गेले नाहीत. ‘पुरस्कार, सामाजिक सन्मान हे कर्मयोगाच्या मार्गावरचे क्षणभर विसावे आहेत ’ अशी स्वत:ची मजबूत मनोधारणा असलेली व्यक्तिमत्वे कुठल्याही पुरस्काराच्या पलिकडे गेलेले असतात. पुरस्कार मिळालेल्या अशा कित्येक व्यक्तिमत्वानी स्वत:ला मिळणा-या पुरस्काराची रक्कमही सामाजिक कार्याला दिल्याची अनके उदाहरणे आहेत. विशेषत्वाने नमूद केले पाहिजे की, देशासाठी तुरुंगवास भोगलेले, स्वातंत्र्य संग्रामात उडी घेऊन स्वतःच्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवणा-या अनेक स्वातंत्र्यसैनिकानी स्वातंत्र्यानंतर मिळणा-या सोयी-सवलती नाकारल्या. स्वातंत्र्यसैनिक असल्याचे कुठेही मिरवले नाही अथवा स्वत:च्या त्यागाची किंमत देशाकडून वसूल केली नाही. अशांना पुरस्कार देणे हे खरेतर समाजाच्या दृष्टीने ऋण फेडणारे कर्तव्यच आहे. कृतज्ञतेच्या भावनेने वेळोवेळी समाजाकडून अशा प्रकारचे पुरस्कार, मानसन्मान दिले जातात ही निश्चितच सुखावणारी घटना आहे.
पुरस्काराच्या कहाणीचा हा पूर्वार्ध जेवढा सुखद आहे तेवढाच उत्तरार्ध वेदनादायक आहे. राज्यात ज्या प्रकारे सहकारसम्राट, शिक्षणसम्राट आहेत तशाच पध्दतीने आता पुरस्कारसम्राट नावाची जमातसुध्दा उदयास येत आहे. ही लोक अक्षरश: पैसे घेऊन गोळ्या बिस्कीट वाटल्यासारखी पुरस्कारांचे वाटप करते. यामुळे देणारी संस्था व घेणारा व्यक्ती असा दोघांचाही दळभद्री स्वार्थ साधतो. असल्या पुरस्कारांची नावे सुध्दा फारच गमतीशीर असतात. उदा. समाजरत्न, समाजभूषण, ज्येष्ठ नागरिक असेल तर ‘जीवनगौरव’ वगैरे. पुरस्कार देण्यात गैर काहीच नाही परंतु प्रश्न आहे तो आर्थिक देवाण-घेवाण करून पुरस्कार देणा-या व मिळवण्याच्या या वृत्तीबद्दल.                                           
शासनाच्या वतीने प्रतिवर्षी अनेक गुणवंताना पुरस्कार दिले जातात. यात शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, खेळाडू असे सर्व जण  असतात. यातील  शिक्षकांबद्दल विशेष चिंतन करावेसे वाटते याचे कारण, शिक्षकाच्या आदर्श आचरणावर अनेक पिढ्या निर्माण होतात तसेच चुकीच्या अनैतिक,अप्रामाणिक आचरणाने अनेक पिढ्या बिघडतात सुध्दा. याकरिता शिक्षकांच्या आदर्श पुरस्कार मिळवण्याच्या एकूणच पध्दती बद्दल सखोल चिंतन करावेसे वाटते. यामुळे कदाचित काही जणांच्या भावना दुखावतीलही परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन सत्य सांगताना काही समाजघटकांत रोष निर्माण होणे साहजिकच आहे. त्याची चिंता नको. आदर्श (?) म्हणवून घेणा-या शिक्षकांना पुरस्कार मिळावा म्हणून स्वत: एक प्रस्ताव (विनवणी) दाखल करावा लागतो. यामध्ये त्यांनी विविध ठिकाणी केलेले कार्य व त्यांचे छायाचित्र यांचा समावेश असतो. असा प्रस्ताव शासनदरबारी पाठवल्यानंतर त्यातून ‘पात्र’ आदर्श शिक्षकांची निवड होते. अशा विनवण्यांमध्ये खरेतर त्यांनी पार पाडलेले कर्तव्यच असते. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणा-याला पुरस्कार देणे समर्थनीय आहे,परंतु तो मिळावा यासाठीची धडपड हेतूबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करते. पुरस्कार हा खरेतर त्या व्यक्तीने केलेल्या त्यागाबद्दल द्यायला हवा. निरपेक्षपणे व प्रसंगी हालअपेष्टा सहन करून केलेले कार्य महानतेला व पर्यायाने पुरस्कारास पात्र ठरावे.    
असे शासन प्रमाणित आदर्श शिक्षक व त्याकरिता दावा करणारे यांची संख्या बघितली तर शिक्षण क्षेत्रातील नेहमीच गाजणारा गुणवत्तेचा प्रश्न कायमचा सुटून जाईल. याचा अर्थ फार मोठी शैक्षणिक क्रांती येईल असा नक्कीच नाही तर, स्वत:स आदर्श समजणा-या व शासनाकडून तसे प्रमाणपत्र मिळवू इच्छीना-या या शिक्षक महोदयांच्या कार्यक्षेत्रात  किमान काही उल्लेखनीय बदल घडू शकतात.
मुळात स्वत:स आदर्श समजणा-या कुठल्याही व्यक्तीस आदर्श म्हणवून घेण्याची आवश्यकता का वाटावी? आपल्या आदर्श कामास कोणाचे प्रमाणपत्र मिळवण्याचे पंगुत्व कशासाठी ?
खरेतर व्यक्तीचे कार्य बोलते. त्यासाठी कुठलाही प्रस्ताव अथवा विनवणी यांची गरज नसते. आपल्या कामातून, व्यक्तिगत आचरणातून इतरांना प्रेरणा मिळावी व या प्रेरणेने त्यांच्या आयुष्यात काही बदल व्हावा असे ज्यांना वाटते ते खरे आदर्श आहेत. आपल्या कार्याने इतरांच्या हृदयात मिळालेले आदराचे स्थान हे कुठल्याही व्यावहारिक पुरस्कारापेक्षा मोठे आहे. म्हणूनच स्वामी विवेकानंद सारखा योध्दा संन्याशी साधनेच्या बळावर अवघे विश्व आपल्या प्रतिभेच्या प्रकाशाने उजळून टाकतो. असा प्रेरणादायी कर्मयोग आपण आचरावा की ज्याला कुठल्याही पुरस्कार, मानसन्मानाने मोहून टाकू नये.     आपल्या धेयापथावर चालत असताना पुरस्काराच्या एका क्षणिक विसाव्यात अडकून न पडल्यास नराचा नारायण होणार यात शंका नाही. भारतरत्न मिळालेल्या व्यक्तिमत्वांच्या कार्यातून हाच महत्वाचा संदेश मिळतो.    

No comments: