एकेकाळी असा समज होता की, ‘ शिक्षित अथवा उच्चशिक्षित व्यक्ती हा प्रगल्भ असतो. जीवन जगण्याची सृजनात्मक दृष्टी त्याच्याकडे असते. समाजातील दु:खवेदना याविषयी तो संवेदनशील असतो व आपल्या विरोधी मताचाही तो तितकाच आदर करतो.’ दुर्दैवाने हा समज हळूहळू खोटा ठरत आहे. म्हणजे शिक्षित अथवा उच्चशिक्षित व्यक्ती समाजातील दु:ख,वेदना याविषयी संवेदनशील असेलच असे म्हणता येत नाही. तसेच स्वत:स न पटणा-या मताविषयी तो चर्चेची दारे खुले ठेवेलच असेही खात्रीने सांगता येत नाही. हा प्रकार म्हणजे २१ व्या शतकातील वैचारिक पातळीवरचे अत्याधुनिक मागासलेपणाचेच लक्षण दर्शवतो. निमित्त आहे मुंबईत होणा-या एका वैज्ञानिक परिषदेचे. इंडियन सायन्स कॉंग्रेस चे १०२ वे अधिवेशन मुंबई येथे ४ जानेवारी पासून सुरु होत आहे.या कार्यक्रमास नामवंत वैज्ञानिकसंशोधक उपस्थित राहणार आहेत. अशा या मंगल प्रसंगी एका चर्चासत्राच्या निमित्ताने हा चर्चेचा धुराळा उडाला आहे. भारताचे  ऐतिहासिक विमान तंत्रज्ञान’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले गेले आहे. हा विषय कैप्टेन आनंद बोदास आणि अमेया जाधव मांडणार आहेत. त्यांच्या संशोधनाचा गाभा असा आहे की, ‘भारतातील ऋषींना विमानाचे  तंत्रज्ञान अवगत होते.’ कदाचित याच ज्ञानाचा आधार घेऊन व त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन  शिवकर बापुजी तळपदे यांनी अभ्यास,संशोधनांती राईट बंधूंच्याही अगोदर म्हणजे १८९५ साली मुंबई येथे विमानाचे प्रात्यक्षिक केल्याचा दावा केला जातो. याविषयीचे  संदर्भ बोदास आणि  जाधव यांच्याकडे असल्याने त्यांनी हा विषय जगासमोर आणण्याचे धाडस केले आहे. अर्थातच याविषयी मते-मतांतरे निश्चितच असू शकतात. संशोधकांच्यावैज्ञानिकांच्या दृष्टीने त्याविषयी अगत्याने चर्चासंवादशंका निरसन केले गेले पाहिजे. संदर्भ पडताळून घेतले पाहिजेत. त्यांची सत्यता तपासली गेली पाहिजे याबद्दल कोणाच्याही मनात दुमत असण्याचे कारण नाही. परंतु हा विषय भारताच्या प्राचीन ऋषी परंपरेशी निगडीत असल्याने अनेकांचा तिळपापड झाला. भारतीय वंशाच्या परंतु विदेशात स्थायिक असलेल्या  एका वैज्ञानिक महाशयानी या चर्चासत्रालाच विरोध दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, ‘या सर्व पुराणकथा असून त्यात तथ्य नाही.’ त्यांच्या विरोधाला प्राचीन भारतीय संस्कृत साहित्याला सरसकट निरुपयोगी ठरवण्याच्या मनोवृत्तीचा दुर्गंध येतो. असे नसते तर त्यांनी चर्चासत्राच्या संशोधकांचे दावे वैज्ञानिक आधारावर तपासून घेऊन त्यानंतरच आपला विरोध दर्शवला असता व अमेरिकेत बसून विज्ञान बुडाले हो ...’ अशी आरोळी ठोकली नसती.  
प्राचीन भारतीय साहित्याला त्यांचा असणारा विरोध समजण्यासारखा आहे. परंतु या चर्चासत्राचा विषय हा काही राजा-राणीपाप-पुण्य अशी साठा उत्तराची कहाणी नसून विमान तंत्रज्ञानावर आधारित आहे. विशेष म्हणजे आयोजकांनी ज्या अर्थी चर्चासत्राचे आयोजन केले त्याअर्थी त्यात किमान काही संशोधनमूल्य असले पाहिजे. यामुळे संपूर्ण चर्चासत्रास विरोध करण्याचे काही कारण नव्हते. कैप्टेन आनंद बोदास आणि अमेया जाधव यांच्या बोलण्यात तथ्य असेल अथवा नसेल तर चर्चे दरम्यान ते कळून येईलच; आपल्या शंकातर्क यांच्या आधाराने त्यांचे म्हणणे खोडून काढता येण्याचे स्वातंत्र्य आहेच ना. परंतु वैचारीकदृष्ट्या मागासलेल्यांना चर्चाच नको आहे.
एकवेळ असेही गृहीत धरले की, प्राचीन संस्कृत साहित्यात आढळणारे विमान तंत्रज्ञान अथवा तत्सम शास्त्रीय मजकूर यात आधुनिक वैज्ञानिक पातळीवर सिद्ध करता येईल असा काही मजकूर नव्हता, तरीसुद्धा ज्या काळात या साहित्याची रचना झाली त्यावरून रचनाकारांची कल्पना शक्ती किती प्रगत होती याची खात्री पटते. त्यांच्या प्रतिभाशक्तीची जाणीव होते. विशेष म्हणजे आजच्या काळाच्या तुलनेत त्या काळी संवाद, दळणवळण यांची अत्यंत तोकडी साधने अस्तित्वात असताना हवेत उड्डाण करुन मानवांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेऊ शकणा-या यंत्राची कल्पना करणे निश्चितच प्रगत बुद्धीमत्तेचे लक्षण आहे. भारतासारख्या देशात अशा प्रकारचा संपन्न वारसा असणे हे खरेतर अभिमानास्पद आहे. याविषयी सखोल चिंतन,संशोधन करून त्यातील तथ्य शोधणे आवश्यक असताना, उलट त्या साहित्यावर पुराणकथेचा शिक्का मारणे यात कोणत्या प्रकारचा आधुनिकपणा आहे. अशा प्रकारचा शिक्का जवळपास सर्वच प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यावर होत आलेला आहे. या साहित्याचे   सरसकट पठण करावे असा मुळीच हेतू नव्हे, परंतु त्यावर साधक-बाधक चर्चा होऊन त्यातील समाजोपयोगी सार घेऊन लोककल्याण साधले गेले पाहिजे. गणित, अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, आयुर्वेद, अवकाशज्ञान यासारख्या शास्त्रांचा उल्लेख,चर्चा निर्विवादपणे प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यात आहेत. त्यांनाही पौराणिक कथेचा शिक्का मारला असता तर कदाचित आज आपण ज्ञानाधारीत विचारप्रवाहात खूप मागे पडलो असतो. याकरिता प्राचीन भारतीय संस्कृत साहित्याचा कोणी अभ्यासक,संशोधक शास्त्रीय,वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. आवश्यकता आहे ती फक्त आपला पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन बदलण्याची व प्रामाणिक प्रयत्नांची. असे केले तर ‘विज्ञान बुडाले हो..’ अशी निरर्थक आरोळी ठोकण्याची वेळ येणार नाही. 

Post a Comment

Previous Post Next Post