वसा विवेकानंदांचा - दर्पण

Tuesday, January 13, 2015

वसा विवेकानंदांचा


भारतभूमी ही वीरप्रसवा आहे. आजपर्यंत या भूमीत अनेक वीरांनी जन्म घेतला.केवळ भारतालाच नव्हे तर समस्त जगाला आपल्या ज्ञान प्रतिभेनेअतुल्य कर्तृत्वाने आकर्षित केले. समाजजीवनाचा अभिन्न भाग असलेल्या कला,साहित्य,क्रीडा,समाजकार्य,धात्म,व्यापार-उद्योग   अशा सर्वच क्षेत्रातील सर्वोच्च ठिकाणी स्थान प्राप्त केले. अशा भारतभूमीत पश्चिम बंगाल मध्ये जन्म घेतलेल्या एका नरेंद्र नावाच्या मुलाने भारत भूमीला पावन केले. किशोरवयात असतानाच स्वत:मधील अचाट बुद्धीमत्तेचे,एकाग्रतेचे दर्शन अनेक घटनांमधून दाखवले होते. कुतूहल,जिज्ञासा यामुळे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी जाणून घेण्याची प्रचंड तळमळ नरेंद्राला रामकृष्ण परमहंस या महान व्यक्तीकडे घेऊन गेली. नरेंद्राचा स्वामी विवेकानंद होण्याचा प्रवास या ठिकाणाहून सुरु होतो. ईश्वर आहे का असल्यास मला दाखवा असा रोखठोक सवाल करणारा शिष्योत्तम नरेंद्र व त्याच त्वरेने ‘ हो ईश्वर आहे,मी पाहिला आहे व तुलाही दाखवीनअसे ठाम उत्तर देणारे सदगुरू रामकृष्ण परमहंस यांच्यातील गुरु शिष्यांचे नाते गुरु-शिष्य’ नात्यांचे सर्वोत्तम आदर्श आहेत. स्वत: प्राप्त केलेले ज्ञान व त्याची अनुभूती आपल्या शिष्याला मिळावी ही तळमळ असलेला गुरु व गुरुचरणी सेवा-समर्पण भावाने ज्ञानसाधना करणारा शिष्य असला की तत्काळ करिती आपणासारीखा’ असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही.

विवेकानंदानी प्रत्येक मत आत्मसात करण्यापूर्वी त्याला पडताळून घेतले. त्याविषयी प्रामाणिक प्रयत्न केले. कुठेही अंधानुकरण केले नाही. तसेच पूर्वग्रहदुषित होऊन स्वत:ची मते बनवली नाहीत. ज्ञान-भक्ती-कर्म यांच्या समन्वयातून आचरण करतसमाजोपयोगी संदेश दिला. आध्यात्मिक शास्त्रेवेदांत यांच्यातील दिव्य ज्ञानाची अनुभूती प्राप्त केली व नंतरच इतरांना मार्गदर्शन केले.            
आध्यात्मिक मार्गातील साधनेची इतिकर्तव्यता जनसामान्यांचे,उपेक्षितांचे दुख दूर करण्यात आहे याची जाणीव झालेल्या विवेकानंदानी भारत भूमीच्या उत्थानासाठी अखंड प्रवास केला. यादरम्यान त्यांनी जनसामान्यांचे दु:ख समजून घेतले. त्यांच्या दु:ख मुक्तीसाठी विवेकानंदानी सेवाकार्याच्या माध्यमातून वेदांतातील संदेश सांगितला. यासाठी त्यांनी स्वत:च्या भौतिक सुख-सोयीआकांक्षा यांचा त्याग करून संन्यास स्वीकारला. दीन झालेल्या सामान्यजनात त्यानी चेतनेचे स्फुल्लिंग निर्माण केले. यामुळे स्वत:च्या विकासाविषयी त्या जनतेत आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांच्यातील दैन्य दूर झाले. निष्क्रियतेच्या ठिकाणी कार्यप्रवणता येऊ लागली. आजही त्यांच्या विचारातील चैतन्यात अनेकांचे आयुष्य बदलवून टाकण्याची किमया आहे.विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित होऊन सुरु असलेले सेवाकार्य बघितले कीत्यांच्या विचारातील सामर्थ्याची कल्पना येते. असा हा प्रेरणेचा चैतन्य स्तंभ भारतातील युवापिढीचा आदर्श असला पाहिजे. कुठल्याही महान कार्य घडायचे असेल तर त्यामागील प्रेरणा तेवढीच मजबूत असायला हवी. विवेकानंद यांचे जीवन चरित्र व त्यांचे स्फूर्तीदायी विचार यामध्ये अखंड प्रेरणास्त्रोत आहे. चारित्र्याची पवित्रता व निरपेक्ष कर्मयोग यांनी मानवी जीवनामध्ये दिव्यता निर्माण करता येऊ शकते हे विवेकानंदांच्या जीवनचरित्रा वरून स्पष्टपणे दिसून येते.
भारतातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. नवनिर्माण करणारी उर्जा आहे. आवश्यकता आहे ती फक्त विवेकानंदांची प्रेरणा  त्यांच्यामध्ये रुजवण्याची. आजचा युवक थोडासा भांबावलेला आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात सर्वत्र स्पर्धेचे वातावरण असल्याने त्यात आपला निभाव कसा लागणार या भविष्याच्या चिंतेने त्याचे मनोविश्व काहीसे सैरभैर झाले आहे. अशावेळी विवेकानंदांचे विचार त्यांना जीवनध्येय शोधून देऊ शकतात.
आपल्याकडील शिक्षणव्यवस्था मुळातच कौशल्यावर आधारित नाही व एकूणच विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्वाची जडण घडण होईल याची शाश्वती नसल्याने कौशल्य नसलेला विद्यार्थी स्पर्धेच्या युगात रोजगार मिळवण्यात अनेकवेळा अपयशी ठरत आहे. यासाठी आजचा विद्यार्थी केंद्रित माणून शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या विद्यार्थ्यामध्ये विकसित भारताचा प्रगल्भ नागरिक होण्याच्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले गेले पाहिजे. थोडक्यात असे म्हणता येईल की, आपली शिक्षणव्यवस्था ही मनुष्यानिर्मानाची व्यवस्था झाली पाहिजे. या आधारावर भारत नक्कीच महासत्ता बनू शकेल.
या देशातील तरुणाई आपले कर्तृत्व सिद्ध करतच आहे. काही तरुण व्यसनाकडे वळली म्हणून संपूर्ण तरुण पिढी बेजबाबदार आहे असे समजण्याचे कारण नाही. दुष्काळ असतानाही आपल्या शेतात राबणारा तरुण असो अथवा आजारी पालकांसाठी जीवापाड मेहनत घेणारा तरुण या देशाचे आशास्थान आहेत. आजही सैन्य,पोलीस,प्रशासन या आव्हानात्मक ठिकाणी स्वत:च्या मनगटातील ताकद दाखवण्यास आजची तरुणाई उत्सुक आहे.
भारतमातेच्या उत्थानासाठी ही तरुणाई समर्पित भावनेने स्वत:चे कर्तव्य प्रामाणिकपणे,पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा संकल्प करेल तेव्हा विश्वातील कोणतीही शक्ती त्याना या कार्यापासून रोखू शकणार नाही. विवेकानंदानी आपल्याला हा वसा दिला आहे. आपण सर्वानी त्यांच्या जयंतीदिनी संकल्प सिद्ध कार्यप्रवण झालो तर त्यांच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार नाही. आध्यात्मिक पायावर भौतिक प्रगती साधून संपूर्ण मानवतेला एका आदर्श आचरण पध्दती ची ओळख करून देणे हे आपले ध्येय असले पाहिजे. या ध्येयपथावर विजय निश्चितच आपला आहे यात शंका नाही.      

No comments: