सामाजिक बदलासाठी युवामित्र - दर्पण

Sunday, January 18, 2015

सामाजिक बदलासाठी युवामित्र

लोककल्याणाच्या हेतूने शासनस्तरावर होणारे निर्णय व योजना यांचे अमलबजावनीच्या पातळीवरील   अपयश हे एकूणच सुशासनाच्या मार्गातील मोठाच अडसर आहे. स्थानिक पातळीवर अमलबजावनी प्रभावीपणे होत नाही याचे कारण लाभार्थ्यांना योजनांची,निर्णयाची तपशीलवार माहिती नसणे हे आहे. हीच परिस्थिती युवकांच्या बाबतीतही आहे. केंद्रीय युवक कल्याण मंत्रालय व राज्य शासनाच्या खात्यामार्फत युवकांसाठी विविध योजना राबवल्या जातात.युवकांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य व अन्य प्रकारचे आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत. परंतु याबाबतची पुरेशी माहिती नसल्याने बहुतेक जन या योजनांपासून वंचित राहतात. दुसरीकडे काही युवक समाजातील प्रत्येक विधायक कार्याशी जोडलेले असतात. निरपेक्षपणे त्यांचे सामाजिक कार्य चालू असते. असे अनेकधडपडे’ स्वयंप्रेरणेने कार्यरत असतात. निरनिराळे उपक्रम आयोजित करणेविविध उपक्रमांमध्ये कार्यकर्त्याची भूमिका बजावणे यासारखे कार्य युवा कार्यकर्ते स्वत:हून करत असतात.अशा युवकांच्या उर्जेला एका निश्चित प्रवाहात व एका दिशेने प्रवाहित केले गेले तर निश्चितच त्यांच्या प्रयत्नातून एक सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने युवकांसाठी नुकतीच एक योजना जाहीर केली. राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर विवेकानंद युवा मित्र’ नेमले जाणार आहेत. त्याना मानधन ही दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून धडपडे युवक/युवती यांना विधायक कार्याची एक दिशा मिळेल व त्यासोबतच युवकांना विविध योजना व शासन निर्णयांची माहिती मिळू शकेल.  

दुर्दैवाने समाजात आज सज्जनपणाची व्याख्याच बदलली आहे. आजकालचा सज्जन म्हणजे ज्याला पोटाची व्यवस्था करण्याशिवाय कुठल्याही सामाजिक कार्यात सहभाग सुध्दा नसतो. एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी होणे तर सोडाच साधे सहभाग नोंदवणे सुध्दा नकोसे वाटते. मुख्य म्हणजे पोटाची व्यवस्था झाल्यानंतरही या प्रवृत्तीचे नागरिक स्वत:ला घरापुरतेच मर्यादित ठेवतात. अगदीच काही झाले तर कट्ट्यावर च्या गप्पा रंगतात व त्यांचा शेवट चहाने होतो. अर्थात असे मुळीच नव्हे की,समाजातील प्रत्येक नागरिकाने स्वत:ला पूर्णवेळ समाजसेवेत झोकून द्यावे. तर आपल्या शक्तीनुसार स्वत:चे जगणे अर्थपूर्ण होईल यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरात सामाजिक प्रश्नांच्या बाबत चर्चा होऊन काही विधायक उपक्रम करता येईल असे किमान प्रयत्न झाले तरी जगण्याला अर्थ प्राप्त होऊ शकेल. राष्ट्राचे,समाजाचे ऋण फेडण्यासाठी एखाद्या समाजोपयोगी उपक्रमात,कार्यात स्वत:चा सहभाग नोंदवला तर भविष्यात उत्पन्न होणारे अनेक प्रश्न आजच नष्ट होऊ शकतील. समाजमन कलुषित होत असेल तर त्यासाठी  जेवढे जबाबदार पूर्ण क्षमतेने सक्रीय असलेले दुर्जन आहेत त्याच्या काही अंशी किंबहुना तेवढेच जाबाबादार स्वत:ला सज्जन म्हणवणारे परंतु निष्क्रीय असलेले नागरिक आहेत. या वातावरणाला बदलण्याचे सामर्थ्य केवळ युवापिढीत आहे. समाजात जे काही वाईट व्यक्ती,प्रवृत्ती आहेत त्यांना जाहीरपणे वाईट म्हणता येत नसेल कदाचित परंतु जे काही चांगले आहे ते मात्र आपण मोठ्या आवाजात मांडू शकतो. समाजविघातक असलेली रेष मोडायची असेल तर त्याकरिता समाजोपयोगी रेष मोठी काढावी लागेल. सर्वांच्या विकासातच माझा विकास दडलेला आहे ही भावना समाजमनात रुजवणे आवश्यक आहे. काळोख दूर करायचा असेल तर चाचपडून उपयोग होणार नाही. याकरिता एक प्रकाशाचा किरण आवश्यक आहे. हे काम युवक अधिक प्रभावीपणे करू शकतात,या मुळे युवामित्र ही संकल्पना अत्यंत अभिनंदनास्पद आहे.              

युवकांच्या हिताचे उपक्रम आयोजित करणे व एकूणच सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेणे, विधायक उपक्रम आयोजित करणे या युवामित्रांकडून अपेक्षित आहे. युवकांच्या बाबतीत प्रामुख्याने व्यसनाधीनता हा प्रश्न आहे. या बाबतीत कठोर कायदे तर आवश्यक आहेतच याच्याशिवाय युवकांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. अनेकदा कायद्यांपेक्षा मित्रत्वाचे बोलणे मोठा बदल घडवून आणू शकते. युवकांच्या बाबतीत असणारे शासनाचे ध्येय-धोरणे व योजना याबाबतीत सविस्तर माहिती प्राप्त करून आपल्या कार्यक्षेत्रातील युवकांना त्यासंबंधी अवगत केल्यास अनेक युवकांना त्याचा लाभ होऊ शकतो. स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहित करण्याकरीता कौशल्यावर आधारित प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली गेली पाहिजेत. युवामित्राने युवकांशी संपर्क साधण्याकरीता प्रत्येक आठवड्यात, महिन्यात नियमित बैठका घेतल्या पाहिजेत. केवळ बोजड भाषणे न करता त्यांना बोलते केले पाहिजे. आदर्श व्यक्तींचे चरित्र त्यांच्या समोर मांडले पाहिजे जमल्यास अशा व्यक्तीमत्वांशी भेटीचा,संवादाचा कार्यक्रम आयोजित केला गेला पाहिजे. श्रमप्रतिष्ठेचा संस्कार रुजवला पाहिजे. अशा तऱ्हेने बदलाची सुरुवात युवामित्राच्या माध्यमातून होऊ शकेल. या युवामित्राना हा अनुभव समृध्द करणारा,सामाजिक संवेदना, जाणीवा रुंद करणारा  ठरेल यात शंका नाही.  

No comments: