स्वातंत्र्याची जबाबदारी - दर्पण

Tuesday, January 27, 2015

स्वातंत्र्याची जबाबदारी

अपरिपक्व अवस्थेत फार मोठी जबाबदारी मिळाली की त्यातून फार काही विधायक,आदर्श वर्तन घडताना दिसत नाही. आपल्या देशातील नागरिकांचे एकूण वर्तन व राष्ट्रीय चरित्र पाहिले की याची प्रकर्षाने जाणीव होते. भारताच्या स्वातंत्र्याचेही असेच झाले आहेत. स्वातंत्र्याचे मोल समजले नाहीकी, बेजबाबदारपणाचे वारू चौफेर उधळू लागतात. स्वातंत्र्याला विवेकाचे अधिष्ठान नसेल तर त्याचे रुपांतर विकृती मध्ये होते. अशा अविवेकी स्वातंत्र्याने समाजाचे मोठेच नुकसान होत आले आहे आणि सध्याही होत आहे. घटनेने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य प्रदान केले आहेहे मान्य केले तरी बेभान होऊन व्यक्तीस्वातंत्र्य प्रदर्शित करण्याने समाजहिताचे वाटोळे करण्यात कोणता शहाणपणा आहे?     
वास्तविक स्वातंत्र्यासोबत एक जबाबदारी पण येते.सामाजिक भान येते. आम्ही वाट्टेल ते, आम्हाला आवडेल त्या पध्दतीने करू शकतो आम्हाला कोणीच अडवू शकत नाही कारण आम्ही स्वतंत्र आहोत ’. असला माज स्वातंत्र्याचे अपचन झालेल्या व्यक्तींच्याच ओठी असू शकतो. स्वातंत्र्याचे असे अपचन होणे समाजहितासाठी निसंशय हानिकारक आहे.

खरा प्रश्न आहे तो प्रगल्भ नागरिकत्वाचा. व्यक्तिगत बाबी सार्वजनिक ठिकाणचे वर्तन यांच्या बाबतीत आपली समज उत्तरोत्तर बालिश वर्तनाकडे होत आहे. सार्वजनिक ठिकाणी नियम पाळण्यासारखी अगदी साधी गोष्ट अनेकांना कमीपणाचे लक्षण वाटते.           

स्वातंत्र्य आहे म्हणजे काहीही करण्यास मोकळे ही मानसिकता समाजहितास अत्यंत हानिकारक आहे.स्वातंत्र्य हे स्वत:च्या वैचारिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी आहे. स्वातंत्र्य असण्याने व्यक्तिगत आचरणास बंधने नसतीलही, परंतु याचा अर्थ असा नक्कीच नव्हे की सामाजिक संकेत पायदळी तुडवावेत. समाजात वावरताना आपलले आचरण सामाजिक संकेताना अनुरूप असले पाहिजे याची काळजी  घेणे प्रगल्भ नागरिकत्वाचे लक्षण आहे.

स्वातंत्र्य व त्यासोबत असलेली जबाबदारी लक्षात घेऊन बेभान न होता विवेकयुक्त सामाजिक आचरण करणे गरजेचे आहे. याकरिता सर्वात मोठी जबाबदारी येते ती पालकांवर. आपला पाल्याचे वर्तनातून त्याच्या सवयीआवडी यांची स्पष्ट कल्पना पालकांना सहजतेने येते. आपल्या पाल्यावर जाणीवपूर्वक संस्कार करणे पालकांसाठी फार कठीण कार्य नाही. प्रगल्भ नागरिक घडवणारी दुसरे केंद्र अर्थातच शाळा हे आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचा खरा विकास होतो. त्यांच्या भावभावनांचे क्षेत्र व्यापक होण्याचे हे सर्वात महत्वाचे ठिकाण आहे. परंतु सध्याची आपली शिक्षण पध्दती पाहता त्यामधून असा प्रकारचा नागरिक तयार होणे फारच दुष्प्राप्य घटना वाटते. वास्तविक शिक्षण पध्दती ही मनुष्य निर्माणाची व्यवस्था बनायला हवी. ज्यामधून तयार होणारे विद्यार्थी हे प्रथम या देशाचे प्रगल्भ नागरिक बनतील.   याकरिता शिक्षण पध्दतीत प्रभावी बदल घडवले गेले पाहिजेत. स्वातन्त्र्याचे मोलत्याचा नेमका अर्थ समजून दिला गेला पाहिजे. स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी गांभीर्यपूर्वक शिकवली गेली पाहिजे. असे झाले तर येणारे पिढी ही सर्वार्थाने प्रगल्भ असेल.

सार्वजनिक जीवनात वावरत असताना मला एखाद्याचे विचार पटत नाहीत म्हणून व्यक्तिगत पातळीवर त्याचा पराकोटीचा तिरस्कार,द्वेष करणे अथवा जमलेच तर बाहुबलाच्या जोरावर त्याचा विरोध करणे या बाबी चुकीच्या आहेत. माझी व्यक्तिगत भावना,एखादे कार्य मला प्रिय आहेम्हणून इतरांना त्रास झाला अथवा त्यांच्या भावना दुखावल्या तरी मी ते करतच राहील’ अशी समज म्हणजे बेभान स्वातंत्र्य आहे. वास्तविक मला मिळालेले स्वातंत्र्य हे माझ्या व्यक्तिगत सामाजिक व आर्थिक विकासासाठी असलेली संधी आहे. हे ध्येय साध्य करत असताना मी कोणाचेही शोषण करता कामा नये. नैतिकतेने आचरण करून,प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडून स्वत:चा सामाजिक व आर्थिक विकास करावा व शक्य झाल्यास कर्तव्याच्या,जबाबदारीच्या  भावनेने समाजोपयोगी कार्यात आपले योगदान द्यावे अशी मनोधारणा प्रगल्भ नागरिकत्वाचे लक्षण आहे. जीवन जगण्याची ही कला शिकलेले नागरिक हा भारत देश बलसागर होण्याचा पाया असेल. थोडक्यात असे म्हणता येईल की सारासार विवेक हा व्यक्तीच्या आचरणाचा पाया असला पाहिजे. अशी शिकवण अंगी बाणवून स्वत:चे राष्ट्रीय चरित्र विकसित करणे आवश्यक आहे.
या देशाचा प्रगल्भ नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला घडणा-या घटना,प्रसंग तसेच संशयास्पद हालचालीवर आपले लक्ष असले पाहिजे. कर्तव्यदक्ष व सजग नागरिकानी तत्परता दाखवली तर या देशात कुठलीही समाजविघातक घटना घडू शकणार नाही. राष्ट्रहितापेक्षा कुठलेही तत्व वरचढ असू नये. आपले राष्ट्रीय चरित्र स्वच्छ,पारदर्शी,मजबूत असले पाहिजे. आपल्या दैनदिन जीवनात ही शिकवण प्रत्येक नागरिकाने अंगी बाणवली पाहिजे. शिक्षक व पालक यांनी जबाबदारी घेऊन कर्तव्य पार पाडले तर ख-या अर्थाने भारत विकसित राष्ट्र बनण्याचे स्वप्न पाहू शकेल. 

No comments: