राजे आम्हाला माफ करा …. - दर्पण

Tuesday, February 17, 2015

राजे आम्हाला माफ करा ….
आम्हाला याची पुर्ण खात्री आहे की, हे शब्द आपल्याला आवडणार नाहीत; परंतु तरीही आपल्यासमोर उभे राहिल्या नंतर खोटे  बोलता येत नाही. रायगडावर चढताना प्रत्येक पाउलावर आपल्या अतुल्य शौर्याची,सामर्थ्याची जाणीव होत होती. कानामध्ये वीर रसाची स्फुर्तीगीते ऐकू येत होती. आपल्या शौर्याची जीवंत साक्षीदार असलेली,  आपल्या पदस्पर्शाने पावन झालेली मातीतून एक वेगळाच दिव्य स्पर्श जाणवत होता.डोळ्यासमोर पराक्रमी योध्यांच्या युद्धप्रसंग सहज दिसू लागत होते. कडे कपारीतून 'हर हर महादेव'  ही गगनभेदी गर्जना घुमत होती. मावळ्यांच्या अतुल्य त्यागाचे,निष्ठेचे प्रसंग ऐकून वारंवार  उर भरून येत होता.मनाच्या अशा अवस्थेत राजे तुमच्या सिंहासनासमोर उभे राहिलो अन आपल्याला मुजरा करताना आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. परंतु लगेचच देदीप्यमान भूतकाळातून अस्वस्थ्य करणारे वर्तमानाचे भान आले तत्क्षणी स्वत:चीच लाज वाटली. वर्तमानातील काळोखाने श्वास गुदमरून गेला. आणि अत्यंत अपराधी भावनेने आपल्या समोर नतमस्तक होऊन अश्रूना वाट मोकळी करून दिली.  आवंढा गिळत बोलण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी अडखळत का होईना एकच वाक्य बोलू शकलो 'राजे आम्हाला खरच माफ करा'.

आम्ही स्वराज्याचे वारसदार गलित गात्र झालो आहोत की काय अशी शंका येते. सर्व जाती-जमाती तील मावळ्याना आपण एकत्र केलेत त्याना स्वराज्यासाठी लढण्यास प्रवृत्त केलेत. राजे मराठी रयतेतील जाती-जाती मधील भांडणे बघून काळजाला तीव्र वेदना होतात. आपण आम्हाला स्वाभिमान शिकवला. आमचे नेते मात्र सत्तेच्या मोहापायी वारंवार स्वाभिमान विकताना दिसतात. राजे गनीम आता शस्त्राने नाही तर बुद्धीभ्रम पसरवत हल्ला करत आक्रमण करत आहे. आमच्या नेत्यांना सत्तेच्या मोहात अडकवून मराठी रयतेत जाती-जाती मध्ये वितुष्ट निर्माण करून आपला डाव साधत आहे.  दुर्दैव म्हणजे आम्ही सुध्दा अत्यंत स्वार्थी झालो आहोत. स्वराज्यासाठी काही त्याग करण्याचे तर  दूरच राहो , आम्हाला स्वराज्याची प्रतिष्ठा असणारे गडकिल्ले यांचे जतन करणे सुध्दा आवश्यक वाटत नाही. तळपायाची आग मस्तकात जाते जेव्हा गडकील्लॆ हे पिकनिक स्पौट बनून जातात, स्वराज्याच्या या जिवंत स्मारकावर अलीकडील प्रेमवीर स्वतःची नावे लिहितात.  परंतु आम्ही इतके दुबळे झालो आहोत की आमच्या रागाला,संतापाला काहीच अर्थ उरला नाही.
    
स्वराज्याचे वारसदार आम्ही अत्यंत बेजबाबदार झालो आहोत की काय अशी शंका वारंवार उत्पन्न होते. नव्या पिढीमध्ये स्वराज्याचा अभिमान रुजवण्याचे आम्हाला काहीच महत्व वाटत नाही. खरेतर आपल्या प्रेरणादायी चरित्राचा घरा-घरात किमान परिचय व्हायला हवा त्याऐवजी कार्टून, व्हिडिओ गेम च्या खोल दरीत आम्ही आमच्या पाल्यांना ढकलून देत आहोत.  शारीरिक संपत्ती कमावण्यास प्रोत्साहन देणे आम्हाला महत्वाचे वाटत नाही. देशाच्या भल्या बु-याचा  विचार करणे आम्हाला निरर्थक वाटते. आमच्या तरुणाईला व्यसनाधीन होण्यात, प्रेयसी बरोबर फिरण्यात, शरीर सुख मिळवण्यात आयुष्याची सार्थकता वाटते आहे. शरीर प्रदर्शन म्हणजेच केवळ स्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्याची बालिश मनोधारणा मान्यता पावत आहे. डोक्यात झिणझिन्या येतात जेव्हा एखाद्या बारसमोर उभे असलेल्या चारचाकी वर आपला फोटो असतो. काही कर्तुत्व गाजवण्याऐवजी जाहिरातबाजी व आत्मप्रौढी आम्हा लोकाना अधिक आवडू लागली आहे. खा, प्या व मजा करा असे आचरण शिकवणारी अवदसा मराठी रयतेत उत्तरोतर रुजू  पाहत आहे. राजे, खरे सांगायचे तर आम्ही केवळ स्तुतिपाठक झालो आहोत. आम्हाला जयजयकार करायला आवडतो. परंतु स्वराज्यासाठी स्वत:च्या आचरणात बदल घडवून आणणे, उत्तम चारित्र्य निर्माण करणे, व्यसनापासून परावृत्त होणे, इतराना परावृत्त करणे, अन्यायाला वाचा फोडणे, लोककल्याणासाठी  निरपेक्ष हेतूने विधायक कार्य  करण्याचे कष्ट घेणे आम्हाला नकोसे वाटते. स्वराज्याच्या रक्षणासाठी आम्ही आपापसातील मतभेद  मिटवू शकत नाही. याउलट गनीमाच्या फोडा  आणि राज्य करा  या नीतीला बळी पडतो आहोत. राजे थोडक्यात सांगायचे तर आमच्या संवेदना मेल्या  आहेत. स्वदेश, स्वसंस्कृती यांच्या विषयीची बांधिलकी झाडाच्या वाळलेल्या पानाप्रमाणे झाली आहे.
राजे, अशा या भयान वास्तवाचे कथन करताना हृदयाला पीळ पडत आहे. परंतु अजुनही विश्वास आहे की, आपल्या वास्तवाने पुनीत झालेली ही गड- किल्ल्यावरील मातीच मराठी रयतेची या ग्रहणातून लवकर सुटका करेन. भव्य-दिव्य अशा इतिहासातून प्रेरणा घेऊन वर्तमानात स्वकर्तृत्वाने पराक्रम गाजवण्यासाठी व स्वराज्याची गगनचुंबी पताका उभारण्यासाठी शक्ती,स्फूर्ती या जिवंत स्मारकातुनच मिळेल. याकरिता गडकिल्ल्यांचा सांभाळ आम्ही मंदिराप्रमाणे करायला हवा. आपल्या जन्मोत्सवाच्या प्रसंगी आपल्या परम-प्रतापी चरित्रातून प्रेरणा मिळावी व  मराठी रयतेने  पुन्हा एकदा आपले गमावलेले तेज प्राप्त करण्यास प्रवृत्त व्हावे.  शरीर संपत्ती,  नैतिक मुल्यांचे मजबूत संस्कार, उज्ज्वल चारित्र्य, अतुट स्वामीनिष्ठा, स्वराज्य,स्वसंस्कृती चा स्वाभिमान या गुणांनी आजची तरुणाई समृध्द होवो. आमच्या प्रयत्नाना आपल्या आशीर्वादाचे बळ मिळो हीच आपल्या चरणी प्रार्थना. 

No comments: