तारांकित कलंक - दर्पण

Tuesday, March 31, 2015

तारांकित कलंक

सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना नियम सर्वांसाठीच असतात  असे आपण दिमाखात सांगत असलो तरीही  दुर्दैवाने आपल्या देशात नियम लागू आहेत की नाही हे त्या व्यक्तीच्या आर्थिक संपत्ती  वरून ठरते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समाजात वावरताना नियम पाळायचे नसतील तर त्याने सर्वात प्रथम स्वत:चा    आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. विशेष म्हणजे हे करताना कुठलेही नीतीनियम पाळण्याची आवश्यकता नाही. आर्थिक स्तर उंचावला की अनायासे सामाजिक स्तर उंचावला जातो व अल्पशा कालावधीत व्यक्ती सेलिब्रिटी या  गौरवास पात्र होते. त्यातही व्यक्ती जर अभिनय क्षेत्र वा अन्य कोणत्याही प्रकारे दूरचित्रवाणी माध्यमा वर झळकली की मग तर जीवंतपणीच स्वर्गसुख मिळते.  अशा अनेक सेलिब्रिटी कायदा व असुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे उडवत असतात. संजय दत्त  प्रकरण असो अथवा नुकतेच सलमान खान चे प्रकरण असो. विशिष्ट व्यक्तींसाठी सर्वच ठिकाणी सर्व सामान्य नियमाना खुलेआम हरताळ फासला जातो. सलमान खान याने दारुच्या नशेत तर्र होऊन फुटपाथवर झोपलेल्या निरपराध व्यक्तीना आपल्या भरधाव वेगाने धावणा-या गाडीने लक्ष्य बनवले असा आरोप  आहे. अर्थात  न्यायालयात हा आरोप सिद्ध होण्याची प्रक्रिया चालू आहे.परंतु तरीही ज्या व्यक्तीना आपला जीव गमवावा लागला  त्यांचा दोष  तरी कोणता होता ?  त्याना न्याय मिळेल अशी शाश्वती देणे धारिष्ट्याचे ठरेल. याचे कारण आरोपी हा सेलिब्रिटी आहे. त्याच्या विरोधात तपास करताना अथवा साक्षीदार साक्ष देताना आरोपींचे सेलिब्रिटीत्व विसरून आपले कर्तव्य पार पाडतील याबाबतीत शंका घेण्यास भरपूर वाव आहे. इतिहासात अशी अनेक प्रकारणे सांगता येतील की ज्यामध्ये आरोपीचे  सेलिब्रिटीत्व  त्यांना शिक्षेपासून वाचवते. संजय दत्त प्रकरण तर अगदी ताजे आहे. जवळपास प्रत्येक दोन महिन्याने या गुन्हेगाराला परोल ची रजा मिळते. विशेष म्हणजे या सार्वजनिक पापास नेमके जबाबदार कोण हे उजेडात येत नाही. सामान्य गुन्हेगाराला अशा प्रकारे रजा मिळू शकत नाही हे सत्य अगदी पारावर गप्पा मारणा-यानाही खात्रीने माहित असते. मग संजय दत्त याला का मिळते ? तर केवळ सेलिब्रिटी आहे म्हणून.

असे प्रकार वाढण्यास खरेतर जेवढे जबाबदार ही लोक आहेत तितकीच जबाबदार सामान्य जनता व अधिकारी-कर्मचारी आहेत. शासकीय रुग्णालयात जर योग्य उपचार मिळावे असे वाटत असेल तर एखाद्या वजनदार नेत्याचा दूरध्वनी आवश्यकच असतो. अगदी स्वस्त धान्य दुकानावर सामान्य नागरिकाला धान्य मिळवताना मोठाच लढा द्यावा लागतो. कुठलेही शासकीय कार्यालय असो प्रत्येक कामाला एकतर पैसे अथवा वजनदार नेत्यांचा वरदहस्त लागतोच. यामुळे सामान्य लोकात जर सामान्य लोकात नेत्यांशिवाय कामच होत नाही अशी धारणा झाली तर त्याना दोष देता येणार नाही.    
अशी परिस्थिती असताना हैद्राबाद येथील एक प्रसंग आठवतो. लोकसभेच्या मतदानावेळी रांग मोडून पुढे जाणा-या अभिनेता व राजकीय नेता चिरंजीवी याला एका सामान्य नागरिकाने थांबवले व रांगेत उभे राहण्यास सांगितले. अशा प्रकारे सामान्य जनतेणे धारिष्ट्य दाखवले तर निश्चितच  सेलिब्रिटी ही जमात ताळ्यावर येईल. अन्यथा सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीत्व केवळ  स्वत:चे वेगळेपण जपणार नाही तर त्याहीपुढे जाउन स्वत:च्या वेगळ्या विश्वाचे ओंगळवाने प्रदर्शन करण्याचा उद्दामपणा दिमाखात करतच राहील. करण जोहर सारख्या उपटसुंभानी  एआयबी रोष्ट सारख्या विकृत कार्यक्रमातून हे दाखवून दिले आहे.   सेलिब्रिटीत्वाच्या या विश्वाचे देशातील सामान्य जनतेच्या सुख-दुखाशी काडीमात्र देणेघेणे नसते. आपल्या सामान्य देशबांधवांविषयी मनात करुणा नसली  तरी एकवेळ  चालेल परंतू त्यांचे जीवनमान आपल्या सारखे नाही म्हणून त्यांच्या जीवाची किंमत कमी आहे असे मानणे अथवा त्यांच्याकडे तुच्छतेने बघणे असले प्रकार चीड आणणारे आहेत तसेच  आपले जीवनमान उच्च दर्जाचे आहे म्हणून सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्याला अनेक नियम माफ असल्याचा समज असणे अनेक प्रश्नांना जन्म देऊ शकते. एका अर्थाने हा तारांकित कलंक आहे. गरीब-श्रीमंत आर्थिक दरी अधिक रुंद करणारा हा कलंक सेलिब्रिटी गुन्हेगारांना न्यायालयाकडून शिक्षा  झाल्यास  मिटवता येऊ शकतो.

No comments: