संपूर्ण स्वराज अशी आरोळी देणा-या आंदोलकांनी पारंपारिक आम आदमी च्या नावाने राजकीय पक्ष स्थापन केला. प्रामाणिकपणा, भ्रष्टाचाराविषयी पोटतिडकीने विरोध या मुद्द्यांच्या आधारे राजकारणाला वैतागलेल्या सामान्य जनतेच्या अंतर्मनाचा ठाव घेत नवा पर्याय देत असल्याचा दावा केला. परंतु सध्या ज्या काही घटना घडत आहेत त्यावरून आम आदमी पक्ष हा सुद्धा इतर राजकीय पक्षांसारखाच आहे व स्वत: केजरीवाल हे सुध्दा इतर राजकीय नेत्यांसारखेच आहेत यावर शिक्कामोर्तब होत आहे. प्रत्येक राजकीय पक्षात वर्चस्वाची लढाई असतेच व यामुळे नेत्यांमध्ये अंतर्गत स्पर्धा,कुरघोडी या होतच असतात ही वस्तुस्थिती आहे. केजरीवाल व तत्सम नेत्यांनी नेमक्या याच वस्तुस्थितीला नाकारत इतर राजकीय पक्ष व नेते यांना शिव्याशाप देण्याचा उद्योग चालू केला व आपणच सर्वात प्रामाणिक,त्यागी व म्हणून वेगळे असल्याचा आव आणला. यासाठी त्यांनी अनेक क्लृप्त्या लढवल्या. अंतर्गत लोकपाल सारखे पद निर्माण केले, वेबसाईट वर जमा खर्चाचा तपशील जाहीर केला. ही कार्य पध्दती आदर्श स्वरूपाची असली तरीही जेव्हा याच पध्दती मुळे केजरीवाल यांच्या नेतृत्वाला आव्हान मिळू लागले तेव्हा हीच कार्यपध्दती अडचणीची ठरू लागली. आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य असलेल्या योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली गेली ती पाहता केजरीवाल यांना पक्षातील कोणताही  नेता डोकेदुखी ठरावा असे वाटत नाही. पक्षाची ध्येयधोरणे ही स्वत:च्या सोयीप्रमाणेच असली पाहिजेत यासाठी त्यांवर अंतिम नियंत्रण स्वत:चेच असले पाहिजे ही भावना स्पष्टपणे केजरीवाल यांच्या व्यक्तिमत्वातील खुर्चीचा मोह अथवा टोकाची महत्वाकांक्षा अधोरेखित करते ?  केजरीवालाना महत्वाकांक्षा,सत्तेचा मोह  अथवा पक्षावर वर्चस्व असावे असे वाटणे याला आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही.परंतु प्रश्न हा आहे की, या सर्व बाबीवर टीका करत केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला. या आधारावर आम आदमी पक्षाची मोट बांधली गेली. जेव्हा ते स्वत: एका महत्वाच्या पदावर गेले तेव्हा मात्र त्यांनीही हाच कित्ता गिरवला. मग त्यांनी वेगळेपणाच्या केलेल्या दाव्याचे अस्तित्व मुळासकट संपले असे म्हणल्यास वावगे ठरू नये. स्वत:च्या सोयीप्रमाणे चालणा-या कार्यपद्धतीला अंतर्गत लोकशाही ठरवणे जसे भाबडेपणाचे आहे तसेच   विरोधी सूर ऐकून न घेण्याच्या प्रवृत्तीला हुकुमशाही न मानणे झोपेचे सोंग घेतल्यासारखे आहे.

खरेतर दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर केजरीवाल यांनी पक्ष व सरकार यामध्ये अत्यंत सावधतेने समन्वय साधायला हवा होता. अंतर्गत लोकपाल यापेक्षा कार्यकर्त्यांची जडणघडण व्हावी याकरता त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था निर्माण करायला हवी होती. याचे कारण एका तात्विक, वैचारिक मांडणी वर कुठल्याही पक्षाचा पाया निर्माण झालेला असतो. एक निश्चित वैचारिक बैठक असण्याची व नेते -कार्यकर्त्यात ती रुजण्याची अधिक आवश्यकता असते. अशा वैचारिक मांडणीच्या अभावी वैचारिक गोंधळ निर्माण झाल्यास त्यात काहीच आश्चर्य वाटायला नको. नेमके हेच सध्या आम आदमी पक्षात होत आहे. भ्रष्टाचाराला विरोध ही घोषणा असू शकते पक्षाची वैचारिक बैठक असू शकत नाही.   
आम आदमी पक्षाचा जन्म हा आंदोलनातून झालेला असल्याने या पक्षात नेते-कार्यकर्त्यांच्या वैचारिक जडण घडणीची प्रक्रिया अधिक वेगाने होणे आवश्यक होते. योगेंद्र यादव यांच्या सारख्या समंजस नेत्याकडे या प्रशिक्षण प्रक्रियेची जबाबदारी दिली गेली असती तर निश्चितच सद्यस्थितीतील अनागोंदी निर्माण झाली नसती. 
तसेच पारदर्शिपनाचा आग्रह करत असताना जेव्हा स्वत:च्या पक्षाला माहिती अधिकारांतर्गत आणण्याची मागणी झाली तेव्हा मात्र ही मागणी अव्यवहारी असल्याची जाणवले. आप च्या एका उमेदवारावर गुन्ह्याचे आरोप असताना त्याची चौकशी करणे गैरसोयीचे वाटू लागले. अशा त-हेने सर्वच पातळ्यांवर आप हे खरोखरीच ‘आम’ म्हणजेच प्रवाहपतित राजकीय पक्ष आहे हे उघड झाले. एकुणात साधनशुचिता ही सर्वोच्च असल्याचे सांगत असताना इतर पक्षांना व नेत्यांना बदमाश, अप्रामाणिक ठरवताना स्वत: मात्र साधन शुचीतेच्या पायघडयावरून वाटचाल सुरु आहे. हे खरे तर कार्यकर्त्यांचे दुर्दैव आहे ज्यांनी भाजप-कॉंग्रेस ला पर्याय म्हणून आम आदमी पार्टीचा स्विकार केला होता.        
स्वत: मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पक्षाचे नेतृत्व सोपवून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कशी होईल याकडे अधिक लक्ष द्यायला हवे होते. परंतु असे काहीही न करता केजरीवाल पक्षातील स्वत:चे स्तुतिपाठक जमा करत गेले व विरोध करणा-या प्रत्येकाला वजा करत आहेत.अशा प्रकारे केजरीवाल व आम आदमी पक्ष यांनी आम्हीही त्याच गावचेहे सिद्ध केले आहे. यामुळे दिल्ली तील यश पचवण्यात अरविंद केजरीवाल सपशेल अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल. 

Post a Comment

Previous Post Next Post