आनंदाची क्रमवारी - दर्पण

Sunday, April 26, 2015

आनंदाची क्रमवारी

           

जागतिक पातळीवर वेगवेगळ्या मुद्यांच्या अभ्यासासाठी सर्वेक्षण, पाहणी केली जाते. कधी उत्कृष्ट गुणवत्ता असलेली शैक्षणिक संस्था शोधण्यासाठी तर कधी पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. जगातील सर्वाधिक आनंदी देश शोधण्यासाठी जागतिक पातळीवर नुकतेच एक सर्वेक्षण केले गेले. ज्यामध्ये त्या देशातील नागरिकांच्या आनंद व समाधान याबाबतीत पाहणी करून क्रमवारी तयार करण्यात आली. या यादीत भारताचा क्रमांक ११७ वा असल्याचे सांगितले गेले. अर्थात भारतासारख्या बहुरंगी, बहुढंगी व लोकजीवनात पावलापावलावर विविधता आढळणा-या या देशात आनंद व समाधान यासारख्या मानसिक पातळीवरील बाबीसंबंधात काही निवडक लोकांना प्रश्न विचारून संबंध देशाविषयी अनुमान काढणे कितपत व्यवहार्य आहे याबद्दल निश्चितपणे शंका निर्माण होऊ शकतात. खरे पाहता मुळातच या पाहणीचे प्रयोजन फारच गमतीशीर वाटते.
याचे कारण असे की, आनंद व समाधान या बाबी प्रथमत: व्यक्तीसापेक्ष व त्याहून महत्वाचे म्हणजे कालसापेक्ष आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीस काही कार्य करताना एका क्षणाला आनंद अनुभवास येत असेल परंतु याचा अर्थ प्रत्येक वेळी अगदी तसाच आनंद येईलच याची हमी तो व्यक्तीही देऊ शकत नाही. उदा. विनोद झाल्यावर हसण्याने एखाद्या व्यक्तीला आनंद वाटेल परंतु याचा अर्थ विनोद झाल्यावर प्रत्येक वेळी तो हसेलच याची हमी देता येत नाही. याहीपलीकडे जाऊन असे म्हणता येईल की, मुळात विनोद करून हसणे हाच प्रकार दुस-या व्यक्तीस टवाळकी करण्यासारखा वाटू शकतो. म्हणजे असे म्हणता येईल की, आनंद व समाधान या बाबी अगदीच व्यक्तीसापेक्ष  व तसेच कालसापेक्ष आहेत. म्हणून एका क्षणाला एखादी आनंदी व समाधानी असलेली व्यक्ती दुस-याच क्षणाला दु:खी व असमाधानी होऊ शकते.
दुसरे असे की, आनंद व समाधान अनुभवण्याच्या प्रत्येकाच्या अशा वेगळ्या स्थिती आहेत. एखाद्या व्यक्तीला इतरांचे दु:ख अडी अडचणी बघून दु;ख वाटत असेल व यामुळे काही वेळेस तो नैराश्यही अनुभवत असेल परंतु दुस-या एखाद्या व्यक्तीला इतरांचे दु:ख अडी अडचणी बघून आनंद वाटू शकतो. काही विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीना स्वत:चे सुख मिळवण्याकरता इतरांना त्रास देण्यात काहीच गैर वाटत नाही. असे करण्याने त्यांना समाधान सुध्दा वाटू शकते. याकरिता असे म्हणावेसे वाटते की, सकारात्मक अथवा करुणेने उत्पन्न होणारे नैराश्य, अस्वस्थता समाजास अधिक उपयुक्त की इतरांच्या दु:खात स्वत:चे सुख शोधणारे समाधान व खरेतर निर्ढावलेपणा उपयोगी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ शकतो. तात्पर्य हे की आनंद व समाधान या मानसिक पातळीवर असलेल्या बाबीसंदर्भातील काही लोकांची निरीक्षणे संबंध भारताचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत.
                           
अविश्रांत श्रम करून थकलेल्या,शिणलेल्या कष्टक-यांच्या आयुष्यात निर्माण झालेले असमाधान पंढरपूरची वारी करत असताना, विठोबा रुखमाई चे दर्शन करत असताना एका क्षणात नष्ट होते व अंत:करणात कृतार्थतेचा भाव निर्माण होऊन त्यामुळे चेह-यावर समाधानाचे उमटलेले चित्र अवर्णनीय असते. हा क्षण कुठल्याही पाहणीच्या मोजमापात न बसणारा आहे. आयुष्यात खडतर कष्ट करून स्वत:च्या पाल्याला शक्य तेवढ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात पालकांना मिळणारे समाधान मोजणार तरी कसे ? सार्वजनिक जीवनात वावरत असताना भ्रष्टाचार, अन्याय यांच्याशी तोंड देत वैतागलेला नागरिक भारतीय असल्याचे आनंदाने, अभिमानाने सांगतोच ना. एखाद्या भुकेलेल्या जीवास अन्न देऊन मिळणारा आनंद कुठल्याही जागतिक क्रमवारीवर अवलंबून नाही. केवळ भौतिक सोयी सुविधा वाढल्याने इंद्रियांना मिळणा-या सुखद अनुभवास सुख मानणे भारतीय संस्कृती मध्ये मान्य नाही. मनुष्यत्वाचा, त्याच्यातील सदगुनांचा संपूर्ण विकास होण्यात सुखी होण्याचे मर्म भारतीय संस्कृतीत सांगितले गेले आहे. म्हणून सुख,आनंद व समाधान याचे भारतात असलेले परिमाण इतर देशाहून काकणभर तरी नक्कीच वेगळे आहे.
निरपेक्षपणे देण्यात म्हणजेच सेवाकार्यात वाहून घेतलेले कित्येक स्वयंप्रेरित दीपस्तंभ समाजात दीनजणांचे दुख दूर करत आहेत. महत्वाचे म्हणजे यातील अनेकांनी भौतिक सुख –सुविधा व अगदी स्वत:च्या संसार सुखाचा, वैभवी जीवनाचा, प्रसिद्धी,प्रकाशझोत असलेल्या जीवनशैलीचा सुध्दा त्याग केलेला आहे. आनंद व समाधानाची पाहणी करणा-यांनी एकवेळ अशा व्यक्तींकडे जाऊन त्यांचे आनंद व समाधान समजून घेतल्यास त्यांना आनंद व समाधानाची जगावेगळी असलेली व्याख्या कळेल. थोडक्यात असे म्हणावेसे वाटते की आनंद व समाधान यांची व्याख्या व्यक्तीपरत्वे निराळी आहे. त्याला एका पाहणीच्या चौकटीत बांधता येणार नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग हे केवळ शब्द नव्हेत तर ती एक प्रत्यक्ष अनुभूती आहे. भारतीय आध्यात्मिक परंपरेत आनंद व समाधान या दोन मूल्यांचे विस्तृत विवेचन केले आहे. याकरिता सर्वाधिक आनंदी देश शोधण्यापेक्षा वास्तविक आनंद  व समाधान कशात आहे याचा शोध घेतला तर समाजास ते अधिक उपयुक्त ठरू शकेल.      

No comments: