आम्ही सारे नतद्रष्टग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे ‘ नवरा मेला तरी हरकत नाही पण सवत विधवा झाली पाहिजे’. सवतीमत्सर हा सर्वज्ञात आहे. परंतू त्याचा अतिरेक झाला की ती स्त्री सवतीच्या द्वेशापायी आपल्या पतीचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. असाच काहीसा प्रकार देशातील कॉंग्रेस पक्षातील काही नेत्यांचा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप चा द्वेष करताना आपण वैचारिक नागडे होत आहोत याचेही भान या नेत्यांना राहिले नाही.   

आंतरराष्ट्रीय मंचावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बिरूद आपण मोठ्या दिमाखात मिरवतो. मात्र येथील नेते मंडळीनी लोकशाहीचे कंत्राट स्वत:कडे घेतल्याच्या आवेशात किती विकृत पध्दतीने वैचारिक नंगानाच चालवला करू शकतात याचा प्रयोग काही दिवसांपूर्वी समस्त जगाने दूरचित्रवाणीवर पाहिला आणि त्याबरोबरच समस्त भारतीयांची मान शरमेने खाली गेली. देशाचे माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानात जाऊन आपल्या स्वैर, लाचार मनोवृत्तीचे मुक्त हस्ताने उधळण करत होते.
मणिशंकर अय्यर यांनी एका चर्चेदरम्यान सांगितले की, ‘जोपर्यंत भारतात कॉंग्रेस चे सरकार येत नाही तोपर्यंत भारत-पाकिस्तान संबंध सुधारले जाऊ शकत नाहीत.’ अय्यर यांनी केवळ इतक्यावर न थांबता त्यांना(भाजप) हटवा व आम्हाला (कॉंग्रेस) निवडून द्या अशी दया याचनाही केली.’ अलीकडच्या काळातील हा सर्वोच्च राष्ट्रीय निर्लज्जपणा म्हणावयास हरकत नसावी. राष्ट्रीय याच्यासाठी की हे महाशय माजी केंद्रीय मंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप च्या विरोधाचे रुपांतर थेट राष्ट्रहिताच्या मुळावर यावे आणि तरीही कॉंग्रेस पक्षाकडून याबाबतीत काहीच प्रतिक्रिया येऊ नये देशाचे यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?
पाकिस्तानातील विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याने  भारतात येऊन त्यांच्या देशातील लष्करशाहीविरुद्ध अशा पध्दतीने वक्तव्य करण्याची हिम्मत केल्याचे एखादेतरी उदाहरण शोधूनही सापडणार नाही. भारतात मात्र असे घडते. यापेक्षा मोठा सहिष्णुतेचा कोणता पुरावा असेल ?        

लोकशाही म्हणजे आपल्याच देशाच्या राष्ट्रीय धोरणाची, पंतप्रधानाची शत्रू राष्ट्रात जाऊन निंदानालस्ती करणे असे आहे का? टोकाच्या शांततावाद्यांनी कितीही नाकारले तरी पाकिस्तान हा आपला शत्रूराष्ट्र आहे हे सर्वश्रुत आहे. जम्मू काश्मीर मध्ये भळभळत असलेल्या जखमेचा कर्ता-करविता पाकिस्तानच आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणाही तज्ञाची गरज नाही. कारगिल मधील घुसखोरांना पाकिस्तानी लष्कराने  प्रशिक्षण दिले हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. याचा अर्थ असा नव्हे की पाकिस्तानला नेस्तनाबूत करावे, परंतु त्या देशात जाऊन वक्तव्य करताना आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे किती नुकसान होत आहे याचा माजी केंद्रीय मंत्री म्हणून काहीअंशी तरी सारासार विचार करावयास हवा होता. अन्यथा मणिशंकर अय्यर सारख्यांचे वक्तव्य म्हणजे काश्मीर मध्ये दररोज जीव अर्पण करणा-या सैनिकांच्या हौतात्म्याची थट्टा आहे. केवळ सत्ता मिळवण्यासाठी शत्रूराष्ट्राला मदतीचे आवाहन करणे म्हणजे राष्ट्रद्रोहा पेक्षा कमी गुन्हा नाही.  
देशांतर्गत राजकीय मतभेद जरूर असावेत, त्याबद्दल कुणाचेच दुमत असणार नाही. परंतु हे मतभेद एका शत्रूराष्ट्रात जाऊन जाहीरपणे मांडण्याचे व त्याना हटवा व आम्हाला सत्तेवर आणा इथपर्यंत भाष्य करणे म्हणजे निर्ल्लजपणाच्या सा-या मर्यादा तोडन्यासारखे आहे. मणिशंकर अय्यर ही फक्त एकटी व्यक्ती नाही तर ही नतद्रष्ट प्रवृत्ती उत्तरोत्तर वाढत चालली आहे. देशातील हिंदू-मुस्लीम तेढ धगधगत ठेवण्याचा हा सनातन प्रयत्न आहे. देशातील मुस्लीम समुदायाची पाकिस्तान या देशाबद्दल सहानुभूती आहे असा पक्का समज कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा आहे म्हणूनच ते संधी मिळेल तेव्हा पाकधार्जिणे वक्तव्य करत असतात.
अशाने क्षणभर प्रसिद्धी मिळत असली तरी राष्ट्राच्या प्रतिमेचे दीर्घकालीन नुकसान होते. दुर्दैव म्हणजे याची जाण नसणारे नेत्यांनी देशाचे अनेक वर्षे नेतृत्व केले आहे.देशाच्या प्रगतीचे घोडे नेमके कुठे अडले होते या प्रश्नाचे उत्तर अशा नतदृष्ट नेत्यांच्या मानसिकतेतून स्पष्टपणे उघडकीस येते. अशा वाचाळ नेत्यांवर खरेतर कायदेशीररीत्या पायबंद बसायला हवा. अन्यथा ही लोक ‘ आम्ही  सारे नतदृष्ट’ या नाटकाचे अंक यापुढेही चालूच ठेवतील.

Post a Comment

0 Comments