अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार - दर्पण

Monday, February 29, 2016

अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचारअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे . प्रत्येक नागरिक स्वत:च्या इच्छेनुसार बोलू, लिहू शकतो. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला प्रदान केलेला तो अधिकार आहे. म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याशिवाय लोकशाही ही कल्पनाच करता येत नाही. यामुळेच भारतात विविध मतप्रवाह, वेगवेगळ्या वैचारिक भूमिका यांच्यात खंडन-मंडन चालू असते. सत्ताधारी पक्षाच्या  मता विरुध्द  वैचारिक मांडणी ,भाषणे देणे, विरोध करणे, मोर्चे, रास्ता रोको करणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होता येते. लोकशाही व्यवस्था प्रगल्भ असल्याचे हे लक्षण आहे. लोकशाही मतालाही व्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे झाले अधिकाराचे पण कर्तव्याचे काय ?
जेव्हा नागरिक कर्तव्याचा विचार न करता केवळ अधिकारांसाठी आततायीपणा करतात तेव्हा लोकशाही ही तकलादू बनत जाते. आणि लोकशाहीला धोका निर्माण होतो ज्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जातो. येथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्या सोबत सारासार विवेक अत्यंत महत्वाचा आहे. सारासार विवेकाशिवाय केला जाणारा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग हा देशहिताला बाधा निर्माण करणारा ठरतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे स्वत:ला योग्य वाटेल ते मत मांडण्याची परावानगी नव्हे . जे वर्तन  देशहिताला, समाजहिताला बाधा निर्माण होईल अशी विवेकहीन अभिव्यक्ती निश्चितच आक्षेपार्ह आहे. 
सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादाच्या निमित्ताने हा मुद्दा चर्चेत आला आहे.अफजल गुरु ला फाशी दिल्याच्या निषेध करण्यासाठी काही विद्यार्थी जमले होते व तेथे देशविरोधी घोषणा दिल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमातून फिरत आहेत.  त्या विद्यार्थ्यानी देशाच्या विरोधात घोषणा दिल्या अथवा नाही हा पोलिस तपासाचा विषय असला तरी मुळात ते विद्यार्थी ज्या कारणासाठी तेथे जमले होते तेच आक्षेपार्ह नव्हे का ? ज्या दहशतवाद्याला न्यायालयात आरोप सिद्ध होऊन मा. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्याचा निषेध करण्यासाठी ही मंडळी तिथे जमली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान नव्हे का ? हा निश्चितच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग आहे. अशा प्रकारणातील चिंता निर्माण करणारी बाब म्हणजे ज्या उच्च शिक्षण संस्थांमधून भविष्यातील सुजाण नागरिक निर्माण होतात त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या मनामध्ये स्वदेशाबद्दल अशा प्रकारची भावना निर्माण होणे. अफजल गुरूबद्दल सहानुभूती निर्माण करणारी व्यक्ती,संस्था व संघटना यांचा कसून शोध घेतला पाहिजे.विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यामागे सक्रीय असलेल्या शक्तींचा हेतू निसंशय राष्ट्रहिताला बाधा निर्माण करण्याचाच असला पाहिजे व देशातील एकूण वातावरण बघता तो हेतू काही प्रमाणात सफल होत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.   या प्रकरणाच्या निमित्ताने जी अत्यंत गंभीर असलेली बाब समोर आली आहे ती म्हणजे राजकीय प्रगल्भतेचा अभाव. अशा प्रकरणात राजकीय पक्षांनी, नेत्यांनी पक्षीय अभिनिवेश विसरून सारासार विवेकबुद्धीने देशहिताची भूमिका घेणे अपेक्षित होते. परंतु सारासार विवेकबुद्धी वापरण्याच्या बाबतीत राजकीय पक्ष नेहमीच निराशा करतात. किमान पत्रकारितेने तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मांडणी करणे अपेक्षित आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाट्टेल ते व्यक्त करणे असे नव्हे हे ठामपणे सांगणे गरजेचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सारासार विवेकाची चौकट आहे हे समाजमनाला सांगणे हे माध्यमांचे नैतिक कर्तव्य आहे. मात्र राजदीप सरदेसाई यांच्यासारखे ज्येष्ठ माध्यमकर्मी जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानेच होय, मी राष्ट्रद्रोही आहेअसे विचार मांडतात तेव्हा अशा व्यक्तींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समजुतीवर मोठेच प्रश्नचिन्ह कोणी निर्माण केले तर त्यास दोष देता येणार नाही. लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच. पण त्याला सारासार विवेकाची जोड हवी. देशहित, समाजहित दृष्टीसमोर हवे. अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रहिताला बाधा उत्पन्न होऊ शकेल व जेथे राष्ट्रच सुरक्षित नसेल तेथे लोकशाहीचे अस्तित्व टिकूच शकणार नाही. देशहिताचा बळी देऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले जाऊ लागले तर लोकशाहीचा पराभव अटळ आहे. ज्यामुळे देश अराजकतेच्या खाईत लोटला जाऊ शकतो. याकरिता लोकशाहीचे अस्तित्व टिकवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सारासार विवेकबुद्धीची साथ हवी. 

           

No comments: