दाहक दुष्काळात संवेदनांचा ओलावा - दर्पण

Saturday, May 21, 2016

दाहक दुष्काळात संवेदनांचा ओलावा

राज्यातील व विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळाची भीषण अवस्था दररोज वर्तमानपत्रातून वाचायला मिळत आहे. शेतकरी आत्महत्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या चारयाचा प्रश्न, रोजगारासाठी शहराकडे वाढलेले विस्थापन या व अशा अनेक सामाजिक समस्या या दुष्काळाने निर्माण केल्या आहेत. माणुसकीची परीक्षा पाहण्यासच हा दुष्काळ आला आहे याची खात्री पटते.
दुष्काळाने निर्माण केलेल्या संकटाकडे पाहून समाजातील संपन्न वर्गात क्षणभर अस्वस्थता निर्माण करण्यापलीकडे फार काही होत नाही. प्रार्थना करणारे हात मदतीसाठी पुढे येत नाहीत असा साधारण समज असतो. मात्र या समजाला खोटे ठरवणारे शुभवर्तमान दुष्काळाच्या दाहकतेत संवेदनेच्या ओलाव्याच्या गारवा निर्माण करणारे आहे.
मराठवाड्यातील दुष्काळी भागातील बांधवांच्या मदतीसाठी निस्वार्थीपणे अनेक हात समोर येत आहेत. या हातांना सृजनाचा सुगंध आहे कारण हे हात प्रश्न मांडून मोकळे होत नाहीत, परिस्थितीच्या नावाने बोटे मोडत नाहीत तर परिस्थितीत अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी मेहनत घेत आहेत. विशेषत:आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था दुष्काळनिवारणाच्या कार्यात हिरीरीने सहभागी होत आहेत.   
सर्वात प्रथम उल्लेख करावा असे कार्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराचे आहे. स्वाध्याय परिवार हा प्रामुख्याने आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून स्वाध्याय परिवारातील कार्यकर्ते गावोगावी जलपुनर्भरण शोषखड्डा निर्मिती चे कार्य करत आहेत. जलसंवर्धन करण्यासाठी आवश्यक जागृती करत आहेत. अत्यंत निस्वार्थ भावनेने स्वाध्याय परिवाराचे कार्यकर्ते शोषखड्डा निर्माण करून देतात. घरमालकाने साहित्य उपलब्ध करून दिले की स्वाध्याय परिवाराचे कार्यकर्ते एक रुपयाही न घेता शोष खड्डा तयार करून देतात. विशेष बाब म्हणजे ते जाणीवपूर्वक प्रसिद्धी पासून दूर राहतात.  
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात दुष्काळाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. अर्ध्याहून अधिक जिल्हा टंकर वर अवलंबून आहे. अंबाजोगाई येथे पाणी फाउंडेशन मार्फत वोटर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जलसंवर्धनाला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा आहे. तालुक्यातील राडी तांडयाने या स्पर्धेत सहभाग घेतला. ग्रामसेवक असलेल्या विनोद देशमुख यांनी राडी तांडा येथे ग्रामसभेत ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे यांना निमंत्रित केले. या तांड्यावरची एक महत्वाची समस्या चिक्षे यांच्या लक्षात आली.या तांड्यावरील युवक मोठ्या प्रमाणावर दारुच्या व्यसनास बळी पडलेले होते. पाणी समस्या सोडविण्याबरोबरच या तरुणांना व्यसनमुक्त करण्याची भन्नाट कल्पना चिक्षे यांना सुचली. ग्रामसभेत चिक्षे यांनी जाहीर केले की एका तरुणाने दारू सोडली तर तांड्यावरील विहीर पुनरुज्जीवन  प्रकल्पास १० हजार रुपये मदत दिली जाईल. ही घोषणा ऐकताच ग्रामसभेतील युवकांमध्ये कुजबुज सुरु झाली व काही वेळाने एक हात वर झाला. त्या युवकाने सर्वांसमक्ष देवाची शपथ घेऊन दारू सोडण्याची घोषणा केली. त्या दिवशी १० युवकांनी कायमची दारू सोडली व प्रसाद चिक्षे यांनी ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून १ लक्ष रुपये विहीर पुनरुज्जीवन व पाणलोट च्या उपक्रमास दिले. डोंबिवली च्या काही तरुण कार्यकर्त्यानी अंबाजोगाई तालुक्यातील दुष्काळी भागास भेट दिली. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले व या मित्रांनी एkkक लक्ष रुपये निधी जमा करून कुंभेफळ येथील विहीर पुनर्भरण व पाणलोट कार्यास दिले व तेथील श्रमदानात सहभाग नोंदवला. अंबेजोगाई मध्ये जलसहयोग चळवळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धन जागृती करण्यात येत आहे.  
आतापर्यंत लातूर हे नाव राजकीय नेत्यांसाठी ओळखले जायचे. दुर्दैवाने सध्या ते अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केलेल्या पाणी टंचाई साठी ओळखले जात आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मांजरा नदीचे पुरुज्जीवन करण्याचे लातुरकरानी ठरवले. लातूर मधील विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी एकत्र येऊन नदी पुनरुज्जीवन करण्याचा हा उपक्रम यशस्वी करण्याचा निश्चय केला आज त्याचे रूपांतर लोकचळवळी मध्ये झाले आहे. लातूर मधील सामान्य व्यक्ती ते उद्योगपती यांच्या सहभागाने मांजरा नदीचे १८ किलोमीटर अंतरापर्यंत रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे.    
परभणी जिल्ह्यातील मानवत पाथरी तालुक्यात जन्मभूमी फाउंडेशन च्या वतीने एक अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक लाख बियाणे थैली वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात पाथरी मानवत तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या परंतु नोकरी व्यवसायानिमित्त पुणे मुंबई येथे स्थायिक झालेल्याकडून आर्थिक मदत करण्यात येत आहे. मानवत पाथरी तालुक्यात ठीक ठिकाणी शेतकरी बियाणे दानकुंड ठेवण्यात आले आहेत.    
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आर्ट ऑफ लिविंग व लोकसहभागातून तलावातील गाळ काढणे, नाला रुंदीकरण व खोलीकरण अशी कामे करण्यात आली ज्यामुळे भूजलपातळी वाढण्यास मदत होत आहे. २०१५ मध्ये प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे परिसरातील ३१ गावांना फायदा झाला आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध संस्था,संघटना विविध माध्यमातून जलजागृती केली जात आहे. विपरीत परिस्थितीसाठी शासन यंत्रणा, राजकीय नेतृत्व यांना दोष देऊन कुढत बसण्यापेक्षा परिस्थिती बदलण्यासाठी आत्मशक्ती जागृत करून या सृजनशील हातानी स्वकर्तुत्वाचे बी पेरले आहे. संवेदनशीलता,निस्वार्थीपणा, कर्तव्याची भावना यांच्या सिंचनाने लोककल्याणाचे व पर्यायाने सामुहिक विकासाचे पीक जोमाने डोलू लागेल याची खात्री वाटते.

No comments: