मराठवाडा ही संतांची भूमी. अजूनही येथील जनता प्रचंड सहनशील आहे. म्हणजे रस्ते, वीज व पाणी यासारख्या मुलभूत गरजाही मिळत नसताना येथील जनता मुकाटपणे सहन करते. येथील रस्ते पहिल्या पावसात वाहून जातात. रस्ते नाहीत म्हणून एस.टी. येत नाही. तरीही येथील नागरिक बघ्याची भूमिका घेतात व विरोधाभास असा की हेच लोक सर्वात जास्त राजकारणावर बोलतात .तर असा हा मराठवाडा बातम्यांमध्ये येतोय तो इसिस या नावामुळे.
नुकतेच दहशतवाद विरोधी पथकाने परभणी येथून नासीर या युवकाला
ताब्यात घेतले. नासेर चाऊस हा पदविका अभियांत्रिकी असलेला सुशिक्षित तरुण
सिरीयातील इसिस च्या फारूक नावाच्या व्यक्तीशी संपर्कात होता. नासेर हा फारूकशी
फेसबुक च्या माध्यमातून चर्चा करायचा. चौकशीत समोर आले की, नासेर हा परभणीत बॉम्ब बनवणार होता. परभणी,
नांदेड या सारखी ठिकाणे त्याच्या रडारवर होती. नासेरच्या अटकेने भविष्यात होऊ घातलेला मोठा प्रसंग टळला याबद्दल पोलीस
यंत्रणांचे कौतुक करावयास हवे. याठिकाणी प्रश्न आहे तो
नासेर सारखे तरुण इसिस च्या पाशवी, हिंस्त्र संघटनेकडे
आकृष्ट का होतात याचा. इसिस संघटनेचे ध्येय, वाटचाल ही कशी
मानवतेच्या विरोधी आहे हे सर्वज्ञात आहेच. जिहाद च्या
नावाखाली आजवर हजारो निरपराध व्यक्तींचे अत्यंत निघृण पध्दतीने हत्याकांड या
संघटनेने जगभरात चालवले आहे. अशा या माणुसकीला
मारणाऱ्या संघटनेच्या जाळ्यात नासेर सारखे तरुण सापडणे हे दुर्दैव आहे.
नासेर ने स्वत:हून इसिस च्या फारूक शी संपर्क साधणे व इसिस
मध्ये दाखल होण्यासाठी इच्छा प्रदर्शित करणे हे भारतातील कुठल्याही सुजाण
नागरिकाला धक्का देणारे आहे. विशेष म्हणजे भारतासारख्या लोकशाही देशात
अल्पसंख्यांक समुदायाला ज्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळतात. धार्मिक यात्रे साठी
अनुदान मिळते, शैक्षणिक संस्था,
शिष्यवृत्ती मिळतात त्या पार्श्वभूमीवर अजूनही अल्पसंख्यांक
समाजातील तरुण दहशतवादी संघटनांकडे वळत असतील तर निश्चितच वस्तुस्थिती पेक्षा
धार्मिक बाबी वरचढ ठरत आहेत असे म्हणणे वावगे ठरू नये. भारतात अल्पसंख्यांक
समुदायाला राजकीय, सामाजिक आर्थिक विकास करण्याच्या सर्व
संधी उपलब्ध आहेत. अल्पसंख्यांक समाजातील युवक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश
मिळवत आहेत. हे युवक अल्पसंख्यांक समुदायातील युवकांचा आदर्श बनले पाहिजेत. परंतु
नासेर सारखा युवक सिरीया तील जिहादींच्या अपप्रचाराला बळी पडतो व स्वत:च्या देशात
निरपराध व्यक्तींचे हत्याकांड रचण्याचे मनसुबे आखतो ही बाब राष्ट्राच्या
एकात्मतेच्या भावनेला गंभीर जखमी करणारी आहे.
एमआयएम चे फुत्कार
रझाकारांच्या जुलमी अत्याचाराचे व्रण असलेल्या मराठवाड्यात
ओवेसी बंधूनी रझाकारांचा वारसा सांगणाऱ्या एमआयएम पक्षाची स्थापना केली व
त्यामाध्यमातून अत्यंत धर्मांध प्रचार सुरु केला आहे. त्यांचे आतापर्यंतच वक्तव्य
हे समाजात फुट पाडणारेच आहेत. बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या गैरफायदा कसा घ्यावा
याचे हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. उभयतांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केले
आहे. त्यांच्या विखारी वक्तव्यांनी मुस्लीम तरुण धार्मिक कट्टरतावादाकडे झुकण्याची
दाट शक्यता आहे. ज्या मुस्लीम तरुणाला विकासाच्या संधी दाखवायला हव्या त्यांना
धार्मिक कट्टरपंथीय बनण्याची वाटचाल एमआयएम ने सुकर केली.मुस्लीम तरुण आयसीस कडे
झुकेल असे पोषक वातावरण तयार केले जात आहे.या संदर्भात न्यायालयात अनेक केसेस चालू
आहेत. मुस्लीम तरुण अशिक्षित, गरीब कसा राहील याकडेच राजकीय पक्षांचे लक्ष असते.
आर्थिकदृष्ट्या मागास असलेला तरुणाचे तातडीने ब्रेन वॉश करता येते व असाच
कार्यकर्ता बेकायदेशीर कृत्ये पार पाडतो.
आजपर्यंत हा समज प्रचलित होता. परंतु मागील काही घटनांतून हा समजही मोडीत
निघाला आहे. नासेर सारखा अत्यंत सुशिक्षित तरुण ही दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकतो
आहे. हे चित्र निश्चितच चिंताजनक आहे. व्यावहारिक शिक्षणापेक्षा धार्मिक शिक्षण
अधिक प्रभावशाली आहे हेच यातून दिसून
येते.
इस्लामी धर्मगुरूंची भूमिका
यासंदर्भात देशातील इस्लामी धर्मगुरूंची जबाबदारी अधिक वाढते.
त्यांनी अशावेळी पुढे होऊन इसिस सारख्या संघटनेच्या अपप्रचाराला बळी न पडण्याचे
आवाहन केले पाहिजे. खरा धर्म समजून सांगितला पाहिजे. कारण कुठलाही धर्म निरपराध
व्यक्तींचे हत्याकांड करण्याची परवानगी देत नाही. इस्लामी धर्मगुरुनी आपल्या
मार्गदर्शनातून तरुणांना मानवतावादी धर्म
शिकवला पाहिजे. तसेच भारत माता की जय असे म्हणणार नाही असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या
ओवेसी सारख्या नेत्यांचा जाहीर निषेध करावयास हवा. धर्म हा राष्ट्रहिताला बाधक ठरू
नये याची काळजी प्रत्येक धर्मातील धर्मगुरुनी घ्यायला हवी. धर्माचा अशा प्रकारे गैरवापर होत असल्यास त्याना खडे बोल सुनावले पाहिजेत व सामान्य जणांना
धर्मातील योग्य मार्ग दाखवला पाहिजे. हे त्यांचे
धार्मिक व तसेच राष्ट्रीय कर्तव्य आहे. अन्यथा नासेर सारख्यांना सिरियातील फारूक
भारताविरुद्ध असाच भडकावत राहील व त्याचे परिणाम राष्ट्राच्या सामाजिक ऐक्यावर होत
राहतील यात शंका नाही.