मेरी मर्जी… - दर्पण

Wednesday, March 22, 2017

मेरी मर्जी…देशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चर्चा ऐकल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाणे आठवले. अभिनेता गोविंदा याच्यावर चित्रित केलेल्या या गाण्याचे बोल आहेत ‘मेरी मर्जी. मै चाहे ये करू, मै चाहे वो करू, मुझे कोई रोके नही मुझे कोई टोके नही.’ म्हणजे मी वाट्टेल तसे बोलणार, वाट्टेल तसे वागणार मला कुणीही अडवू नये. माझ्या वागण्याचा काहीही दुष्परिणाम होवो मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. साधारणपणे अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे हेच आहे असा समज सर्वत्र पसरला आहे. ज्या देशात तक्षशिला, नालंदासारखी विद्यापीठे होती, तेथील विद्यापीठे ही उच्च शैक्षणिक गुणवत्तायुक्त असावयास हवी. या ठिकाणी जगभरातील चिकित्सकांनी, अभ्यासकांनी येथे येऊन ज्ञान संपादन करावे. मानवी समाजजीवनाला व्यापणार्‍या विविध शास्त्रांतून संशोधन व्हावे. जगाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग व्हावा. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हे केवळ स्वप्नरंजन ठरावे असेच चित्र आहे. भारतातील विद्यापीठे गाजताहेत ती अभिव्यक्तिस्वातंत्र्य, आझादी, बरबादी घोषणाबाजीने. ज्या ठिकाणी शास्त्रार्थ चर्चा, खंडन-मंडन, संवाद व्हावेत त्या ठिकाणी कथित आझादीचा कर्कश आवाज ऐकू येत आहे.आम्हाला कोणी थांबवलेच तर आम्ही आमचे पुरस्कार परत करू. शैक्षणिक परंपरेचे यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असू शकेल?
या प्रकरणावरून शासनावर, सत्ताधारी पक्षावर धरणे, आंदोलन, मोर्चा, लेख, वृत्तवाहिनीवरील चर्चा याद्वारे सडकून टीका होत आहे. अत्यंत जहरी शब्दप्रयोग केला जात आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा यापेक्षा मोठा कोणता पुरावा हवा आहे. जर खरेच अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी झाली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोध शक्य झाला असता का? देशाची राजधानीत दिल्लीत ‘काश्मीर : फ्रीडम द ओन्ली वे’सारखा जाहीर कार्यक्रम आयोजित करणे शक्य झाले असते का?
यानिमित्ताने अभिव्यक्तिस्वातंत्र्याची नव्याने व्याख्या करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वत:चे मत, भावना, विचार मुक्तपणाने व्यक्त करण्याची मुभा असणे. मग ते शासन अथवा एखाद्या राजकीय पक्षाच्या, संघटनेच्या विरोधात असले तरीही त्यास कोणताही अटकाव होता कामा नये. सर्वसाधारणपणे अशी व्याखा गृहीत धरली तरी या अभिव्यक्तिस्वातंत्र्यासोबत एक जबाबदारी येते. एखादा व्यक्ती बंद दाराआड कुठल्याही प्रकारे व्यक्त होत असेल तर त्याला निश्‍चितच कोणीही अडवणार नाही. परंतु प्रश्‍न जेव्हा सार्वजनिक जीवनाबद्दल येतो तेव्हा या अभिव्यक्तिस्वातंत्र्याबरोबर जबाबदारी पण येते. ही जबाबदारी समजून वर्तणूक झाली नाही तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होते आणि स्वैराचाराचा पुढचा टप्पा बेकायदेशीर कृत्यामध्ये होतो. याला प्रतिबंध करण्यासाठीच आपल्या देशात इंडियन पीनल कोड आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की, व्यक्तीला स्वातंत्र्यासोबत एक जबाबदारी निश्‍चित होते. वर्तणुकीत शिस्त अपेक्षित आहे. म्हणूनच निवडणूक प्रक्रियेत आदर्श आचारसंहिता लागू केली जाते. मग देशाचा नागरिक म्हणून अशा प्रकारची आचारसंहिता का असू नये?
सार्वजनिक ठिकाणी किंबहुना व्यक्तिगत नातेसंबंधातही बेशिस्तपणा कोणाही सुज्ञ व्यक्तीस आवडणार नाही. मग देशाच्या बाबतीत भारत तेरे टुकडे होंगे, काश्मीर की आझादी तक, भारत की बरबादी तक जंग रहेगी असा बेशिस्तपणा का खपवून घ्यावा? आपण ज्या देशात राहतो तेथील सोयी-सुविधांचा लाभ घेतो आणि त्याच देशाच्या बर्बादीचे स्वप्न कसे काय समर्थनीय ठरू शकते? आणि अशा प्रकारच्या विचारांना विरोध असलेल्या नागरिकांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे काय? की ते सर्व बिनडोक. म्हणून असे वाटते की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.
व्यक्तीच्या भावभावनांचे क्षेत्र व्यापक होण्याच्या प्रक्रियेला रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षण असे म्हटले. त्या दृष्टिकोनातून विद्यापीठातून शिकविण्यात येणारे शिक्षण या क्षमतेचे आहे काय याची चिकित्सा करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचे कारण असे की, ज्या विद्यार्थ्यांनी स्वत:च्या ज्ञानशाखांतून प्रावीण्य मिळवून स्वत:चा व पर्यायाने देशाचा विकास करावा असे अपेक्षित आहे, तेच युवक आझादीच्या मागे लागले आहेत. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे अनुकरणीय प्रेरणादायी आदर्श असताना विद्यार्थ्यांनी कायम दूषणे देत तक्रारखोर बनणे निश्‍चितच अपेक्षित नाही. ना डावे-ना उजवे. ना बहुसंख्य-ना अल्पसंख्य.
कलाम जगले ते फक्त देशासाठी. बाबा आमटे यांनीही प्रश्‍नावर उत्तर शोधले. सध्याही अनेक व्यक्तिमत्त्वे प्रश्‍नावर उत्तरे शोधत आहेत. ते केवळ प्रश्‍न मांडून थांबले नाहीत. अशा आदर्शाची प्रेरणा असेल तर खात्रीने देशाचा विकास होईल.
मात्र याऐवजी जेएनयूतील विद्यार्थ्यांना आझादी हवी आहे. गरिबी, भूकबळी, भ्रष्टाचार यासारखे प्रश्‍न चुटकीसरशी सोडवण्यास कोणतेही शासन, पक्ष, संघटना समर्थ नाहीत. अगदी ज्या राज्यात कम्युनिस्टांची वर्षानुवर्षे सत्ता होती तेथेही हे प्रश्‍न सुटले नाहीत. त्यात पुन्हा वैचारिक गोंधळ असा की, कम्युनिस्टाना भांडवलदार या शब्दाची अस्पृश्यता. समाजातील गरिबीचे कारण बेरोजगारी आहे आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी औद्योगिकीकरणाशिवाय पर्याय नाही. औद्योगिकीकरण भांडवलदारांशिवाय शक्य नाही. मग रोजगार निर्माण करायचा कसा? आणि गरिबी दूर कोणत्या मार्गाने करायची? कम्युनिस्ट चळवळीत हा वैचारिक गोंधळ आहे. देशाचे, समाजाचे प्रश्‍न सोडवायची योजना नसल्याने फक्त प्रश्‍न मांडत राहणे हाच एककलमी कार्यक्रम उरतो. यामुळे फक्त जनतेत जनक्षोभ निर्माण होतो, पण प्रश्‍न सुटत नाहीत. परंतु यामुळे नक्षलवादासारख्या संविधानास उघड आव्हान देणार्‍या कृत्यास पाठबळ मिळते.
अशा प्रकारच्या गोंधळात समाजाला दिशा देण्याचे राष्ट्रीय कर्तव्य बौद्धिक म्हणवल्या जाणार्‍या क्षेत्रातील लोकांनी पार पाडले पाहिजे. कुठलाही अभिनिवेश न बाळगता राष्ट्रहिताच्या दृष्टीने समाजास मार्गदर्शन केले पाहिजे. मात्र ज्यांना बुद्धिवंत म्हणून फक्त मिरवायचे असते, जे केवळ मानसन्मानाचे भुकेले असतात व ज्यांना केवळ स्वत:ची प्रतिमा जपायची असते अशी मंडळी बोटचेपी भूमिका घेतात. म्हणजे जी मंडळी गुरुमेहर कौरला धमक्या देण्याचा निषेध ज्या त्वरेने करतात तीच मंडळी तारेक फतेह, तस्लिमा नसरीन यांच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसत नाही. तसेच जे मोर्चे अखलाकच्या हत्येचा पोटतिडकीने निषेध करण्यासाठी आयोजित केले जातात ते केरळमधील संघ स्वयंसेवकांच्या हत्येच्या वेळी कुठेतरी अदृश्य असतात. हा दुटप्पीपणा कशासाठी? हिंदू धर्मातील श्रद्धास्थानांचा तेजोभंग केला की धर्मनिरपेक्षता आणखी मजबूत होते अशा प्रकारची सेक्युलर परंपरा देशातील प्रज्ञावंत म्हणवल्या जाणार्‍या वर्गात पाळली जात आहे. हे निश्‍चितच वेदनादायी आहे.
यानिमित्ताने प्रकर्षाने समोर येत आहे ते विद्यार्थी व एकूणच शैक्षणिक क्षेत्रातील अस्वस्थ वर्तमान. आझादी मागणार्‍या नेत्यांनी लक्षात घ्यावे की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व अल्पदरात असलेले शिक्षण. येथील विद्यार्थ्याला संधी मिळाली तर त्याला लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवा करायला नक्कीच आवडते. चांगला अभियंता होऊन तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन संशोधन करण्याची त्याची इच्छा आहे. भारतीय सैन्यात भरती होऊन प्राणाची आहुती देण्यासही तो मागेपुढे पाहणार नाही.
पोलिस बनून देशाची आंतरिक सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे त्याला आयुष्याचे ध्येय वाटते. त्यामुळे कृपया विद्यार्थ्यांसाठी काही करता आलेच तर त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काही करा. केवळ आझादीच्या घोषणा देऊन माथी भडकावून त्यांचे आयुष्य बरबाद करू नये.