जबाबदारी कोणाची ? - दर्पण

Tuesday, April 25, 2017

जबाबदारी कोणाची ?व्यक्तिगत जीवनात, समाजात,राष्ट्रात अथवा जगाच्या पाठीवर कोठेही एखादी बरीवाईट घटना घडली की त्याला जबाबदार कोण याविषयीची कारणमीमांसा सुरु होते. अर्थात ती व्हायलाच हवी. परंतु प्रश्न आहे तो जबाबदारी स्वीकारण्याचा आणि जबाबदारी ढकलण्याचा. समाजातील सर्व नागरिकांना रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मुलभूत सोयीसुविधा पुरवणे, सुरक्षेची हमी व सामाजिक व आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले वातावरण उपलब्ध करणे हे शासनव्यवस्थेचे कर्तव्यच आहे. त्याविषयीच्या बऱ्यावाईट घटनांबद्दल शासनव्यवस्थेस जबाबदार धरलेच पाहिजेत. मात्र प्रश्न जेव्हा समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा चालीरीती बाबत असतो तेव्हा त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनव्यवस्थेवर ढकलून स्वत: जबाबदारीतून मुक्त होण्याची प्रवृत्ती प्रश्नांपासून पळ काढणारी आहे. लातूर येथील शीतल वायाळ च्या दुर्दैवी आत्महत्येने हुंडा समस्या अजूनही प्रबळ असल्याचे दिसून आले आहे.
समाजातील अनिष्ट चालीरीती, प्रथा नष्ट करण्यासाठी शासनव्यवस्था कायदे  करीलही  परंतु जोपर्यंत समाजातील व्यक्ती हा बदल मनापासून स्वीकार करत नाहीत तोपर्यंत त्या संपूर्णपणे होऊ शकत नाहीत. त्या नष्ट होण्यासाठी समाजातील धुरीणानी जबाबदारी स्वीकारून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असते. फुले, शाहु व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य हाच मोलाचा संदेश देते. त्यांनी विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी जबाबदारी अन्य कोणावर ठेवली नाही. याउलट स्वत:वर जबाबदारी घेऊन समस्येवर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळेच समाजात नवे आदर्श प्रस्थापित झाले. थोडक्यात असे म्हणता येईल की जबाबदारी ढकलण्याऐवजी परिवर्तन करण्यासाठी जबाबदारी घेऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. विशेषत: अनिष्ट प्रथा,परंपरा नष्ट करण्यासाठी जबाबदारी स्वीकारून प्रयत्न करणे आवश्यक आहे.           
जर कायदे करून अनिष्ट प्रथा, परंपरा नष्ट झाल्या असत्या तर हुंडाबळी बंद झाले असते. मात्र अजूनही     शीतल वायाळ या मुलीस अनिष्ट प्रथा,परंपरा पाळता येत नसल्याने आत्महत्या करावी लागते. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेले पत्र हुंडाप्रथा अजूनही जीवंत असल्याची साक्ष देते आहे. आजही मुलीचे लग्न ही शेतकरी बापाला घोर लावणारी बाब आहे हे दाहक वास्तव अधोरेखित करणारे आहे. नापिकी, स्वातंत्र्यापासून असलेली शेतीबाबतची कुचकामी धोरणे, कायदे, नैसर्गिक संकटे या बाबी शेतकऱ्यांच्या आत्महत्येस ज्या प्रकारे कारणीभूत आहेत. त्याचप्रकारे मुलीस हुंडा व लग्नाचा खर्च ही चिंताही तितकीच कारणीभूत आहे हे सत्य उघडे करणारे आहे.        
खरे पाहता या पत्रातून बोध घेऊन हुंडाप्रथेविरुद्ध एकमुखाने आवाज निघायला हवा होता. मात्र यावेळीही अन्य कोणत्याही समस्येप्रमाणे यासमस्येबाबतही शासनव्यवस्थेस जबाबदार धरण्याचे प्रयत्न होत आहेत. शेतीबाबतची कुचकामी धोरणे, कायदे याबाबत नक्कीच शासनव्यवस्था जबाबदार आहे. मात्र प्रश्न जेव्हा हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा परंपरांचा निर्माण होतो त्यास शासनास जबाबदार ठरवणे हे मूळ प्रश्नापासून पळ काढण्यासारखे आहे. शासन कुठल्याही पक्षाचे असो त्यास हुंडाबळीसाठी जबाबदार ठरवता येऊ शकत नाही. याचे कारण असे की, हा सर्वस्वी समाजातील व्यक्तीच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. दुर्दैव म्हणजे अनेक ठिकाणी उच्चशिक्षित मुले सुध्दा भरभक्कम हुंडा घेताना आढळून येतात. डॉक्टर असलेला नवरा दवाखाना बांधण्यासाठी डॉक्टर असलेल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ करतो यास शासन काय करणार ? सनदी अधिकारीपदी निवड झालेली मुले मोठा हुंडा मिळणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजतात. अशा परिस्थितीत हुंडा ही समस्या सोडवायची असेल तर त्याची आक्राळविक्राळ व्याप्ती   लक्षात घ्यायला हवी. ती समजून घेतल्यास असे लक्षात येईल की शासनव्यवस्थेच्या बाहेरील असणारा हा प्रश्न आहे. त्यामुळे हुंडाप्रथा बंद करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी त्या घटनेस राज्य सरकारला  जबाबदार ठरवण्यात स्वत:ची सुटका करून घेण्याची सोय आहे. एकदा शासनास जबाबदार ठरवले की स्वत:कडे काही करायचे राहत नाही. अशा प्रकारच्या सुरक्षित मानसिकतेत राहणे नागरिकांना आवडू लागणे हे मूळ समस्येबाबत दुर्लक्ष करणे तर आहेच शिवाय प्रगल्भ लोकशाहीच्या दृष्टीने हानिकारक आहे.
आपल्या देशातील नागरिक अधिकाराबाबतीत जेवढे जागृत असतात तेवढे कर्तव्याबाबत नसतात हे उघड सत्य आहे. त्यामुळे कुठल्याही समस्येवर सर्वात प्रथम शासनास जबाबदार ठरवले जाते. सार्वजनिक ठिकाणी स्वत: नियम मोडण्यात काही गैर आहे असे चुकुनही न वाटणारे आपण इतरांकडून मात्र नियम पालनाची अपेक्षा करतो. विशेष म्हणजे गैरकायदेशीर कामासाठी राजकीय नेत्यांकडे याचना करतो व त्यांनी भ्रष्टाचार करू नये अशी आपली अपेक्षा असते. याच मानसिकतेतून समाजातील हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी सुध्दा शासनव्यवस्था काहीतरी करेल अशी अपेक्षा जन्मास येते. आणि अर्थातच ही मानसिकता लोकशाही शासनव्यवस्थेस मारक आहे.
याकरिता ज्या युवकांना, नागरिकांना असे वाटते की ही प्रथा बंद व्हावी त्यांनी प्रथम परिवर्तनाची  जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेऊन एक कृती कार्यक्रम ठरवायला हवा व त्यात सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. हुंडाप्रथा ही सर्वप्रकारच्या दृष्टीकोनातून अनैतिक आहे हे समाजमनावर बिंबवण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून प्रयत्न व्हावयास हवेत. विशेषत: ग्रामीण भागातील जनतेवर ज्यांचा मोठा प्रभाव आहे अशा आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीनी याबाबतीत आपली जबाबदारी ओळखून आपल्या अनुयायास हुंडा घेण्यापासून परावृत्त केले पाहीजे. सर्वसाधारणपने विवाह करण्याचे आदर्श घालून दिले पाहिजेत. असे सामुहिक प्रयत्न झाले तरच ही कुप्रथा नष्ट होऊ शकेल. अन्यथा केवळ शासनास जबाबदार ठरवून हुंडाप्रथा नष्ट होऊ शकणार नाही व शेतकरी बांधवांची एक महत्वाची समस्या सुटणार नाही. त्यामुळे आणखी शीतल बळी जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ज्या दिवशी हुंडाप्रथा नष्ट होईल तीच शीतल वायाळ ला खरी श्रद्धांजली असेल.