जातीयवादाचा पराभवच - दर्पण

Monday, January 8, 2018

जातीयवादाचा पराभवच

एखाद्या विषयाचे,घटनेचे विश्लेषण करत असताना तेथील परिस्थितीचे  आपल्या  पूर्वग्रहदूषित सिद्धांतानुसार  चित्रण करायचे आणि शेवटी आपल्या सोयीचा निष्कर्ष काढायचा अशी  लेखनशैली महाराष्ट्राला नवीन नाही. किंबहुना ढोंगी पुरोगामित्वाचा टेंभा मिरवयाचा असल्यास अशा प्रकारची लेखनशैली तर तलवारीचे काम करते. गुजरात निवडणूकीमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा जातीयवादाचा पराभव असल्याचे सांगितले मात्र काही लेखक आपल्या लिखाणातून जातीयवादाच्या पराभवावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत .  
 अशा प्रकारच्या लेखनातून संबंधित लेखकाचा केवळ संघ- भाजप व विशेषत: मोदी यांच्याविषयीचा पराकोटीचा द्वेष आढळून येतो. म्हणून  अशा द्वेषमुलक विचारातून जातीयवादाचे निर्मुलन करण्याविषयी काही ठोस विवेचन मिळेल अशी अपेक्षाच फोल ठरते. 
प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या विषयाचा स्वतः:चा असा अभ्यास असतो. सखेल चिंतन आणि मनन करून व्यक्ती त्या विषयातील तज्ञ बनतात व समाजाला  अशा व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळते. प्रज्ञावंत असलेले व्यक्तिमत्वे सुध्दा त्यांच्या अभ्यास विषयाबद्दल बोलताना जबाबदारीने बोलतात. मात्र काही लेखक कदाचित एवढीही तसदी घेत नाहीत असे त्यांच्या टिपणातील वाक्यांवरून कळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संघ आणि भाजपला शिव्याशाप देताना हिंदू धर्माला दुषणे देण्याशिवाय  त्यांचे लिखाण पूर्णच होत नाही. त्यातही हिंदू धर्मावर टीका करताना  हिंदू धर्माची बोळवन केवळ जात एवढ्यावरच करून मोकळे होतात.  अशा लेखकांना विचारावेसे वाटते की, हिंदू धर्मातील चार वेद, अठरा उपनिषदे ही सर्वच्या सर्व जातीयवादाबद्दल बोलतात काय ? जातव्यवस्था ही हिंदू धर्माचा भाग नव्हतीच हे भगवद्गीता अभ्यासल्यानंतर आपल्याला कळेल. गीतेतील भगवान श्रीकृष्ण आणि  अर्जुन संवाद हा जातीयवादाबद्दल आहे का ? चार वेद, उपनिषदे ही मानवाच्या आयुष्यातील सर्व सद्गुणांचा विकास होण्यासाठीची ती शिकवण आहे. अर्थात वसुधैव कुटुंबकम शिकवणारी ही संस्कृती आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर यानी आता विश्वात्मके देवे अशी प्रार्थना केली व पसायदान मागत असताना विश्वातील सर्व जीवांसाठी मागितले. ईश्वराला प्राप्त करणे अथवा त्या चैतन्याची अनुभूती मिळवणे यासाठी विविध मते आहेत. ज्यांना जसा अनुभव आला त्यांनी तशाप्रकारे मांडणी केली. म्हणून अद्वैत, द्वैत, द्वैताद्वैत, सांख्य अशाप्रकारे साधनेचे विविध मार्ग आहेत.आदर्श जीवनामुल्यांवर आधारित जगणे शिकवणारी संस्कृती हा हिंदू धर्माचा प्राण आहे.  महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात कोणती जात शोधाल ? समस्त मराठीजन वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत. लेखकाना सल्ला द्यावासा वाटतो की हिंदू धर्म समजून घेण्यासाठी आपण एकवेळ स्वामी विवेकानंद यांचे विचार अभ्यासावेत. यामुळे असे म्हणावेसे वाटते की, हिंदू धर्म म्हणजेच जात हे वाक्य टाळ्या मिळवून देत असले तरी त्यात जराही तथ्य नाही.     
जणू काही फतवा काढल्याप्रमाणे ब्राम्हणी धर्मशास्त्राच्या परंपरेनुसार जातीचा त्याग धर्मनिषिध्द असल्याचे  सांगतात.जात व्यवस्था ही हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे व तो मिटवण्यासाठी अनेक संत महंतानी प्रयत्न केले आहेत आणि  करतही आहेत. विश्व हिंदू परिषदेने १९६९ मध्ये कर्नाटक येथे घेतलेल्या हिंदू धर्म संमेलनात चार पीठांचे शंकराचार्य, महामंडलेश्वर यांना एका व्यासपीठावर बोलावून जाहीर केलेले आहे की, अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही  म्हणून अस्पृश्यतेचे पालन हे पातक समजण्यात येईल. म्हणून हिंदू धर्मात राहून जातीचा त्याग केवळ असंभवनीय असल्याचे जाहीर करणे ही धादांत दिशाभूल आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची लेखकाची मते तर भन्नाट मनोरंजन करणारी असतात. मोदी वर्णवर्चस्ववादी जातव्यवस्थेचे समर्थक आहेत येथपासून ते मोदीनी त्याचे समर्थनही केले आहेत असा साक्षात्कार होईपर्यंतचा मजकूर सर्रास छापला जातो. अर्थातच अशा लिखाणात व्यक्तिगत द्वेषापलीकडे काहीही तथ्य नसते. केवळ आरोप केले तर त्यात फार काही दखल घेण्यासारखे नसतेही मात्र त्यांनी समर्थन केल्याचा दाखला म्हणजे बालिशपणाचाच कळस आहे . अशा लेखकानी आरोप केल्याप्रमाणे मोदी जर जात व्यवस्थेचे समर्थक असते तर ते स्वतः राजकारणात आले असते का ? आणि संघ- भाजपचा पाया वर्णवर्चस्ववादी असता तर मोदींच्या नेतृत्वाला कोणी जुमानले असते का ? मोदी व अन्य कितीतरी नेते आहेत जे विविध जाती जमातीमधून व विशेषत: कुठल्याही राजकीय वारसा असल्याशिवाय राष्ट्रीय स्तरावर आपले कार्य करत आहेत. त्यामुळे मोदींवर आरोप जरूर करावेत मात्र ते किमान तर्कधारित तरी असावेत. 
जातीअंताच्या लढ्याविषयी असे लेखक सुचवतात की जातीअंताचा कायदा संसदेत आणायला हवा. तसेच जातव्यवस्था कायद्याने निषिध्द घोषित करावी. लेखक या प्रश्नावर पुन्हा गोंधळलेले दिसतात. त्याचे कारण असे की, जात व्यवस्था ही घटना निर्माण झाली त्याच वेळेस कायदेशीररीत्या संपुष्टात आली. तसेच अनुसूचित जाती- जामातीना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यास म्हणजेच जातीयवाद करणाऱ्यास एट्रोसिटी कायदा लागू आहे. विविध मागास जाती जमातींना शिक्षण, नौकरी अशा ठिकाणी विशेष संधी, सवलत उपलब्ध आहेत. या देशातील कोणताही नागरिक जातीच्या आधारावर संधी नाकारू शकत नाही. तसेच आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण वाढते आहे.    
अशाच प्रकारच्या एका लेखाचा मुळ विषय होता तो गुजरात मधील निवडणुकीचा.  त्यात लेखक जिग्नेश मेवानी व हार्दिक पटेल यास जातवर्गोच्छेदक प्रेरणेचे राजकारण या गोंडस नावाखाली गोंजारतात तेव्हा फार आश्चर्य वाटत नाही कारण लेखक मोदीविरोधी प्रत्येकाचेच अशाप्रकारे उदातीकरण करतील. गुजरात निवडणूकीत सामाजिक स्तरावर अत्यंत घृणास्पद प्रकार पहायला मिळाला तो हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी व अल्पेश ठाकूर यासारख्या वाचाळाकडून. पाटीदार समाजाचे नेतृत्व सांगणाऱ्या हार्दिक पटेल ने जातीआधारित विखारी प्रचार असो किंवा मोदी हे गोरे होण्यासाठी लाख रुपयांचे विदेशी मशरूम खातात असा बालिश आरोप असो हे सर्वच प्रकार अत्यंत घृणास्पद होते. एखाद्या समाजाला आरक्षणाचे प्रलोभन दाखवायचे. आपल्या मुलाबाळांना सहजतेने चांगले शिक्षण, सरकारी नौकरी मिळेल अशा स्वप्नरंजनात झुलवत ठेवायचे. आणि त्या समाजाचा तारणहार बनून मिरवायचे. लोकनेता बनण्याची ही साधी-सोपी रेसिपी. हार्दिक हे त्याचे जीवंत उदाहरण. या रेसिपीने अनेकांना लोकनेता बनवले खरे मात्र देशहिताचे काय ? हा प्रश्न आ वासून उभा आहे. सध्याच्या व्यवस्थेत ५० % आरक्षण आहे. ही मर्यादा ओलांडून एखाद्या समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया इतकी सोपी आहे का ? आरक्षण हा घटनात्मक विषय आहे. देशातील अनेक राज्यात अशा प्रकारे आरक्षण देण्याचा प्रयोग झाला व त्याला न्यायालयानी रद्दबातल पण ठरवले आहे. अशा परिस्थितीत एखाद्या समाजघटकाचा विकास करण्याची प्रामाणिक इच्छा असल्यास अन्य अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्या समाजातील युवकाना शिक्षण व रोजगार मिळवून देण्यासाठी काही संस्थात्मक, विधायक काम उभे करता येऊ शकते. अशा प्रकारे कार्य करणाऱ्या अनेक संस्था काम उत्कृष्ट काम करत आहेत.  गुजरात निवडणुकीत पाटीदार समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापवला गेला होता. तसाच प्रचार जिग्नेश मेवानी कडून होत होता. भाजप दलितविरोधी आहे व त्यांना धडा शिकवायचा असेल तर मला निवडून द्या. केवळ याच भांडवलावर जातीय प्रचार करण्यात आला. मात्र सुजाण मतदारानी अशा प्रकारच्या जातीय प्रचाराला बळी न पडता भाजप सरकारला स्पष्ट बहुमत देऊन निवडले. जातीअंत होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने भारतीय ही ओळख व त्यानुसार त्याचे आचरण असले पाहिजे. धर्माचे आचरण व्यक्तिगत आध्यात्मिक उन्नतीसाठी व तसेच राष्ट्रहित, समाजहितास अनुकूल असले पाहिजे. अशा प्रकारचे कोणतेही कार्य हार्दिक,जिग्नेश अथवा अल्पेश यांनी केलेले नसल्याने त्यांचे राजकारण जातीयवादी स्वरुपाचेच होते किंबहुना आताही आहे. 
महाराष्ट्रात येऊन जिग्नेश आपल्या भाषणात नवपेशवाई निर्माण झाल्याचा उल्लेख करतात व तिला नष्ट करण्यासाठी रस्त्यावरील लढाई लढण्याचे आवाहन करतात. ही नवपेशवाई म्हणजे नेमके काय आहे ते त्यांनी स्पष्ट केले नाही. म्हणजे मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती कोणत्या राजेशाही हुकुमाद्वारे नियुक्त झालेली आहे अथवा कोणा तथाकथित उच्चवर्णीय व्यक्तीस नौकरी, शिक्षणासाठी विशेष सवलत मिळत आहे याचाही संदर्भ द्यावा. हे सर्व कपोलकल्पित असल्याने  हा सर्व अपप्रचार अतिकडव्या डाव्या तसेच देशविघातक असणाऱ्या नक्षलवादी विचारसरणीच्या माध्यमातून केला जात आहे. 
अशा प्रकारच्या टिपणाचा समारोप शाही ढोंगी पुरोगामित्वाच्या परंपरेला अनुसरून केला जातो . म्हणजेच संघ व भाजप ब्राम्हणी, वर्णवर्चस्ववादी असल्याचा आरोप करून. या सर्व लेखकांना सुचवावेसे वाटते की कृपया एकवेळ संघ प्रेरणेने कार्यरत असलेली विविध सेवाकार्यांचे अवलोकन करावे. समाजातील सर्व जनतेसाठी हजारो ठिकाणी आरोग्य प्रकल्प, एकाल विद्यालय हे सर्व वर्ण वर्चस्ववादी मनोवृतीतून निर्माण होते का ? गेली ९० वर्षे संघ हा आरोप सहन करतच मोठा झाला आहे. त्यामुळे जातीअंताची लढाई संघ लढत आहे. कृपया आपण पूर्वग्रहदूषित न होता प्रामाणिकपणे अभ्यासने  आवश्यक आहे इतकीच अपेक्षा.