डिजिटल आणीबाणी आणि धन्नोभौ - दर्पण

Tuesday, January 22, 2019

डिजिटल आणीबाणी आणि धन्नोभौ(धन्नोभौ आपल्या कार्यालयात येरझाऱ्या घालत असताना आणीबाणी, निषेध अस काहीतरी पुटपुटत असतात )
तेवढ्यात बुवा हातात डायरी घेऊन धा वाजून धा मिनिटाला प्रवेशते झाले.
बुवा : साहेब घात झाला, घात झाला
शांत होण्याचा निर्धार करत असतानाच जोशीबुवांच्या घातवाणी कडे साहेबानी गरकन मान वळवत बघितले  
धन्नोभौ : बुवा, अस आभाळ पडल्यासारखे काय ओरडता, (प्र)शांत व्हा. नीट सांगा काय झाले ते.
बुवा : जुलमी सरकारने माझे व्हॉटस अप बंद केले.
धन्नोभौ  : काय .... व्हॉटस अप बंद केले.  वाटलेच मला. सर्वत्र आणीबाणीसारखे वातावरण असताना व्हॉटस अप कसे चालू . त्रिवार निषेध. बुवा तातडीने पत्रकारांना बोलवा.
बुवा : (आणखीनच अस्वस्थ होत) साहेब त्यामुळे तर आणीबाणी लागली.
धन्नोभौ : म्हणजे ?
बुवा : इरोधी पक्षनेत्यांचा पत्रकारांशी संपर्क वाढल्याने सरकारने हे कुटील कारस्थान केल असेल
धन्नोभौ : काय SSS ? मग तर डिजिटल आणीबाणी लागू झाल्याचे जाहिर करा. आत्ताच्या आत्ता.  
बुवा : साहेब एकवेळ तंत्रकुशल मदतनीसास दाखवू का ?
धन्नोभौ : त्याची काही गरज नाही. तो पण सरकारच्या या कटात सामील असू शकतो.
बुवा : पण मी काय म्हणतो.
धन्नोभौ : आपण विरोधात आहोत. संशय घेणे आपले कर्तव्य आहे. आरोप तर झालेच पाहिजेत.
एव्हाना विरोधी पक्षाच्या नेत्याच्या बुवाचे व्हॉटस अप बंद झाल्याच्या कुजबुजीने चर्चेचे रुपांतर धारण केले. अन नेमके काय झाले हे बघण्यासाठी एक कुतंत्रस्नेही मित्र घटनास्थळी दाखल झाला.  
(कु)तंत्रस्नेही मित्र : व्हॉटस अप का बंद आहे ?
बुवा काही बोलणार एवढ्यात साहेबानी व्यासपीठावरून लाखांच्या सभेला गर्जून सांगितल्यासारखे गरजले
आणीबाणी, आणीबाणी आणि केवळ आणीबाणी.
बुवा : साहेब,  शांत व्हा छातीत कळ निघेल.  
बुवांनी त्यांचा मोबाईल मित्राकडे दिला. मित्राने व्हॉटस अप बघितले अन त्यांना पोटातून हास्याची कळ उठली.
मित्राच्या या उद्दामपणावर बुवांनी डोळे वटारून विचारले.
हसायला काय झाले अशा आणीबाणी प्रसंगी’
साहेबाना तर संशय आला की हा पण तिकडचाच.
(कु)तंत्रस्नेही मित्र : अरे मित्रा साहेबांच्या प्रेसनोट रोज शेकडो पत्रकारांना पाठवतोस ना.
बुवा आश्चर्यकारक मुद्रेने पाहत राहिले तर साहेब गरजले.
धन्नोभौ : निषेध असो या डिजिटल आणीबाणीचा.
(कु)तंत्रस्नेही मित्र : साहेब, कृपया माझे ऐका, तसे काही नाहीये.
धन्नोभौ : माझी समजूत घालण्यासाठी आलास ना? देव इंद्राने काय प्रलोभन दाखवले तुला  ?
बुवा : साहेब एकदा तो काय म्हणतोय ते तर ऐकुया.
धन्नोभौ : आता निर्धार पक्का. माघार नाही.
बुवा : साहेब कृपया एकवेळ ऐका.
धन्नोभौ हम्म म्हणत तयार झाले.
(कु)तंत्रस्नेही मित्र : साहेब, तुमचे भाषण, प्रेसनोट बुवा अनेक पत्रकारांना पाठवतात.
धन्नोभौ : मग पाठवू नये का ? किती मुस्कटदाबी सहन करायची आता. असह्य होतंय हे.
         कुठेतरी थांबलेच पाहिजे. निषेध असो या आणीबाणीचा.
(कु)तंत्रस्नेही मित्र : साहेब तसे नाही. व्हॉटस अप च्या नियमानुसार अशा प्रकारे अनेक ठिकाणी मेसेज पाठवले तर त्याला स्पॅम समजून कंपनीकडून ब्लोक केले जाते. यथावकाश ते अनब्लॉक होईलही.
मित्राच्या या उत्तराने बुवा तर शांत तर साहेब (प्र)शांत झाले.  धन्नोभौचा चेहरा पार कोमेजून गेला अन या प्रश्नावर डिजिटल आणीबाणी जाहीर करून त्याविरुद्ध रणशिंग फुंकण्याची संधी निघून गेल्याचे अपार दुख मनावर घड्याळातील काट्याप्रमाणे स्पष्टपणे दिसले.
धन्नोभौ परिवर्तनाचा निर्धार करत निघून जात असताना केवळ ठीकय ठीकय एवढाच शब्द कानावर पडला. 

No comments: