शकुनीचे असिस्टंट..... - दर्पण

Friday, February 8, 2019

शकुनीचे असिस्टंट.....स्थळ : बहुधा ठाणे असेल...

वेळ : अत्यंत निर्वाणीची

(घडाळ्यातील काटे मंद आवाज करत असताना मध्येच हमसून हमसून कारुण्य रसातील आवाज दस्तुरखुद्दांच्या कर्णी पडला.)

आता पीडितांचे दु:ख दूर करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे असे आम्ही समजतो. म्हणून जरा कानोसा घेतला असता ते परिस्थिती भयंकर कठीण वाटली. जणू काही एका जितेंद्रिय व्यक्तीला कुणी तरी हाड हाड म्हणून हेटाळणी केल्याचा भाव वातावरणात दरवळत होता.

टेबलावर डोके ठेवून एक नेते (स्टार्च चे पांढरेशुभ्र कपडे ) हमसून हमसून रडत होते. मोबाईल मध्ये महाभारत सिरीयल चे थीम सॉंग लावले होते.

दस्तुरखुद्द : सायेब , आत येऊ का ?

सायेब : (आवंढा गिळून) कशाला ?

दस्तुरखुद्द : आपले दु:ख जाणून घेईन म्हणतो.

( स्वतःस सावरत सायेब बोलले )

सायेब : आमच्या सायेबाला त्या शकुनी म्हणाल्या. 

दस्तुरखुद्द : (महाभारतातील श्रीकुष्ण जसे पार्थाला म्हणाले तशा भावात) त्याच्यात काय एवढे दु:ख करण्यासारखे आहे ?

सायेब : आमचे सायेब काय शकुनी आहेत काय ?

(म्हणजे त्यापेक्षा भयंकर आहेत की काय अशी शंका आली) .
दस्तुरखुद्द : म्हणजे ?

सायेब : आमच्या सायेबानी खूप मोठ्ठे कार्य केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एका बहिणीच्या नावाने रुग्णवाहिका सुरु केली.

दस्तरखुद्द : पण सायेब ती बहिण तर....

सायेब : (सायेबानी सावध होत ती दुखरी जखम विसरण्याचा आव आणत पुढचे वाक्य फेकले.) 
सायेबानी इशारा केला की लगेच मी महाराष्ट्राच्या भूषणाला शिव्या दिल्या, मला पाहिजे तसा इतिहास सांगितला.

दस्तुरखुद्द : बर मग.  

सायेब : (सायेब थोडे संतापले ) मग काय मग ? माझे दुख कळत कसे नाय तुमाला ?

दस्तुरखुद्द : कळतंय हो सायेब.

सायेब : सायेबानी पुणेरी पगडी घालू नका असे सांगून समूळ जातीयवाद नष्ट केला.

दस्तुरखुद्द : होय होय (असे म्हणालो खरे पन सायेबांची नेमके दुख कळेचना)
आम्हाला आठवतंय हो सायेब. (समजूत घालताना असे म्हणावेच लागते) तुम्ही जातीची दहीहंडीसुध्दा फोडली. (आम्हास उतरंडी म्हणायचे होते) 
सायेब : दहीहंडी.... (साहेबानी हंबरडाच फोडला ). दहीहंडी बंद पाडली माझी कुटील शत्रूंनी. माझी हाय लागेल त्यांना.
दस्तरखुद्द : (म्हणजे हे काम पण मामाचे का अशी शंका उत्पन्न झाली) तो तर कोर्टाचा निर्णय होता म्हणे.
सायेब : ते जाउद्या हो. काहीही असले तरी बंद पडली ना. कित्ती छान कार्यक्रम व्हायचा. त्या ओबी व्हन, ते कमेरे, बूम. जाम मजा यायची.  
(आम्हास आत्ता कुठे हळूहळू दुखरी नस सापडू लागली.)

सायेब : (अत्यंत उत्तेजित होत) सायेबमामा ओह सॉरी जीभ घसरली. आमचे सायेब म्हणजे एकदम पावरफुल माणूस अन त्यांना शकुनी म्हणतात हे..
(आम्ही अत्यंत बाळबोध भाव चेहऱ्यावर आणले. ते ओळखून सायेब बोलले)
सायेब : म्हणायचेच असते तर श्रीकृष्ण म्हणायचे ना...
दस्तुरखुद्द  : (आम्ही बाळबोध भाव बदलून प्रश्न केला)  त्याने काय झाले असते? 
सायेब : लोक मला पार्थ म्हणाले असते.
दस्तरखुद्द : सायेब ते नको उगाचच धनुष्यबाण हातात घ्यावा लागेल.
सायेब  :  (एकदम सावध होत) अरे बापरे... हे तर खरेच की.
दस्तुरखुद्द : त्यापेक्षा मामाच बरे वाटते.
(आम्ही शत्रूच्या गोटातील असल्याचा संशय आल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसले )

सायेब : कसे काय ?
दस्तुरखुद्द : शकुनी मामा म्हणजे कस. नेहमी राजाजवळ राहायचे. कौरव आणि पांडवात युद्ध लावायचे अन आपण बाजूला बसून खेळाची मज्जा बघायची.
सायेब : हे मस्त आहे.  
(सायेबांची कळी एकदम खुलली पण एक वेगळीच चिंता दिसली)
सायेब शकुनी अन मग मी शकुनीचा असिस्टंट का ?
आम्ही काहीच न बोलता अंतर्धान पावलो.   2 comments:

Unknown said...

तुम्हाला निवडणूक संपल्यानंतर असंच काहीतरी लिहून मनाची करमणूक करावी लागेल असं दिसतंय.

Tukaram said...

😂😂😂 खूप दिवसांनी काहीतरी खास वाचायला मिळालं सर👏👆