भारत पुरुषार्थ विसरलेला आहे यावर ठाम विश्वास असलेला पाकिस्तान - दर्पण

Monday, February 25, 2019

भारत पुरुषार्थ विसरलेला आहे यावर ठाम विश्वास असलेला पाकिस्तानविविध माध्यमातून नित्य कुरापती काढणारे, चार युद्धे हरुनही खुमखुमी कायम असणारे कांगावाखोर राष्ट्र अन सर्वात महत्वाचे म्हणजे भिकेकंगाल असूनही काश्मिरात फुटीरतावादी चळवळीना प्रोत्साहन देणारे अपयशी राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानसारख्या डोकेदुखीने आतापार्यात हजारो जवानांचा बळी घेतला. स्थानिक पोलिसांवर, अर्धसैनिक बलावर सहजतेने दगडफेक करून जखमी केले जाते. अशा प्रकारचे गुन्हे करण्याची हिम्मत येते कुठून ?
भारताजवळ अनलिमिटेड माणुसकी तर आहेच शिवाय भारत पुरुषार्थही विसरलेला आहे यावर पाकिस्तानचा ठाम विश्वास असल्याने पाकिस्तानकडून अशा प्रकारचे कार्य बिनबोभाट केले जाते. तीव्र शब्दात निषेध यापलीकडे भारताकडून काहीही होणार नाही यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. अन्यथा हातात बंदुका असलेल्या  जवानावर शेकडोंचा जमाव हातात दगड घेऊन चाल करण्याच्या घटनाना प्रोत्साहन देणे पाकिस्तानला कधीही शक्य झाले नसते.

शास्त्र आणि शस्त्र हाच भारताचा पुरुषार्थ
याच भारतभूमीवर अन्याय, अत्याचाराला संपवण्यासाठी हातात शस्त्रे घेऊन युद्धे झाली आहेत. त्यात सत्य,सदाचार व नैतिक मूल्यांचा विजय झाला आहे. किबहुना त्यांच्या रक्षणासाठीच तत्कालीन योध्यानी हाती शस्त्र घेतले होते. श्रीराम- रावण युद्ध, श्रीकृष्ण- कंस युद्ध, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, पृथ्वीराज चौहान, शीख संप्रदायातील शूरवीर योद्धे आणि स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारी योद्धे भारताचा देदीप्यमान पुरुषार्थाची जाज्वल्य उदाहरणे आहेत. शस्त्र सज्जता असेल तर आणि तरच तुमचे म्हणणे ऐकले जाईल. अन्यथा तुमच्या बोलण्याला काडीचीही किमत मिळत नाही. हाच इतिहासपुरुषाचा संदेश आहे. वरील उल्लेखित शूरवीरांपैकी एकानेही केवळ अहिंसा आणि चर्चा हे सूत्र अंगिकारले असते तर वर्तमानकाळात एका भीषण अंधकाराला सामोरे जावे लागले असते.

पुरुषार्थ जाणीवपूर्वक पुसला जातोय
अनलिमिटेड माणुसकीच्या नावाखाली भारताचा देदीप्यमान पुरुषार्थ जाणीवपुर्वक पुसला जातोय. भारताने आजपर्यंत एकाही देशावर स्वतः:हून आक्रमण केलेले नाही. याउलट पुलवामा हल्ला होईपर्यंत पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन चा दर्जा दिलेला होता. तरीही पाकिस्तानकडून कुरापती चालूच आहेत. याचे कारण देशातील तथाकथित सामाजिक कार्यकर्ते व काही बुद्धिवंत दर्जा प्राप्त असलेली उपद्रवी जमात. लोकशाहीचा गैरवापर कसा करावा ते यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. देशाच्या राजधानीत काश्मीर : फ्रीडम द ओन्ली वे यासारखे जाहीर कार्यक्रम होतात. विद्यापीठातून भारत तेरे टुकडे होंगे सारख्या घोषणा दिल्या जातात. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरुला श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित केला जातो. विविध एनजीओ च्या माध्यमातून परदेशी निधीच्या मार्गे अशा कार्यक्रमाना प्रायोजित केले जात असल्याचे आता लपून राहिलेले नाही. हे सर्व घडण्याचे कारण म्हणजे भारताकडे मुबलक प्रमाणात असणारी माणुसकी. याच्या हट्टापायी देशाची सुरक्षा व्यवस्था खिळखिळी होत असल्याचेही भान आपणास राहिले नाही. माणुसकीच्याच अतिरेकापायी आपले कित्येक जवान शहीद झाले. स्वसंरक्षण म्हणजे हिंसा नव्हे. माणुसकी अन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेत भारताचा पुरुषार्थ नष्ट करण्याचे प्रयत्न जोमाने होत आहेत.

भगवद्गीतेचा संदेश
कुरुक्षेत्रातील रणसंग्रमात जेव्हा आपलेच सगेसोयरे आपल्या विरुद्ध, आपल्याला मारण्यासाठी हातात शस्त्र घेऊन उभे आहेत हे पाहताक्षणी अर्जुन गलितगात्र झाला व त्याने युद्ध करण्यास नकार दिला. तेव्हा योगेश्वर श्रीकृष्णानी त्याला भगवद्गीतेचा उपदेश केला. हे युद्ध दोन भावंडामधील नसून धर्म व अधर्म म्हणजेच न्याय- अन्याय, सदाचार- अत्याचार, सत्य-असत्य अशा नैतिक मुल्यांची आहे व यामुळे तु युद्ध करण्यास तयार हो असेच सांगितले. याचे कारण असे होते की, चर्चा, समजूत अशा सर्व प्रकारचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. अशा प्रसंगी केवळ युद्ध हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. पुलवामा हल्ल्यानंतर यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. चर्चा, वाटाघाटी, परिषदा अशा सर्व प्रकारचे मार्ग बंद झाले आहेत. आणि यापुढेही जर भारताचे शांततेचे प्रस्ताव पाकिस्तानने स्वीकारावेत असे  अशी अपेक्षा असेल तर भारताला एकवेळ पुरुषार्थ सिद्ध करावाच लागेल. हे पाउल याअगोदर उचलले गेले असते तर पाकिस्तानने आपला शांती प्रस्ताव आनंदाने स्वीकारला असता व कित्येक जवानांची कुटुंबे अनाथ होण्यापासून वाचली असती. तेव्हा राज्यकर्त्यानी भारताचा देदीप्यमान पुरुषार्थ पुनः एकवेळ जागृत करावा ही अपेक्षा.  
No comments: