ढोंगी पुरोगामीत्वाला युद्धज्वराची व्याधी - दर्पण

Saturday, March 2, 2019

ढोंगी पुरोगामीत्वाला युद्धज्वराची व्याधीबालाकोटमध्ये दहशतवादी अड्ड्यावर भारताकडून झालेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर देशातील समस्त ढोंगी पुरोगामी कंपूत हडकंप निर्माण झालेला असल्याने कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सर्वांच्या हृदयातून अहिंसा,शांतता उचंबळून आली होती.
सर्व वृत्तवाहीन्यातून हुसकावून लावलेले संपादक, ढोंगी पुरोगामीत्वाचे प्रदूषण करणारे चाचा तसेच अन्य क्षेत्रातील काही मंडळींना युद्धज्वराचा त्रास होत असल्याचे कळताच सर्व जन एका गुप्त ठिकाणी एकत्र झाले. सुरुवातीस तुरळक संख्या होती परंतु पुरोगामी युद्धज्वर हा संसर्गजन्य असून त्याचा अतिरेक झाल्यास व्यक्ती दिसेल त्याला  शिव्या शारीरिक, मानसिक इजा करतो असे कळल्याने सर्व रुग्ण एका ठिकाणी जमले.  
या व्याधीवर काय उपचार करावा यासाठी सर्व चिंतातूर झाले होते. एक महिला जरा विचित्रच वागु लागली. युद्धज्वराने तिच्या मेंदूचा ताबा घेतल्याने एखाद्याकडे शस्त्रतर नसेल ना अशा संशयाने प्रत्येकाकडे बघत होती.
त्यातील वयोवृद्ध कुमाराने विनंती केली की कृपया आपल्यात संशय घेऊ नका. आपण सर्व संघ भावनेने एकत्र आलो आहोत अन सामंजस्यने एखादा वैद्य शोधुया.
झाले... संघ भावना अन वैद्य हे शब्द ऐकताच वातावरणात एकच आक्रोश सुरु झाला.
अगोदरच ढोंगी पुरोगामी युद्धज्वर आणि त्यात पुन्हा संघ भावना अन वैद्य या शब्दाने कुमारांवर सर्वजन खेकसले. माजी संपादकांनी मनातल्या मनात कुमारांची थेरड्या अशी शाब्दिक हिंसा केली. (आम्हाला मनातले व्यवहार कळतात)
माजी संपादक : तुम्ही गप्प बसा हो जरा. प्रसंग काय बोलताय काय ?
कुमारवृद्धानी घोटभर पाणी घेत पाठ खुर्चीला टेकवली. (त्यांच्या मनात एकच भावना होती तुम्ही अन तुमची व्याधी)
पर्यावरण तज्ञ सामाजिक प्रदूषणकार यांनी सर्वांना शांत केले अन काही वैद्यकीय व्यावसायिकांचा सल्ला मागण्यावर विचार मंथन सुरु केले. वेगवेगळ्या उपचार पद्धती संदर्भात मंथन सुरु झाले.    
त्यातच एका सदस्याने आयुर्वेदिक पद्धती, योगासने ही भगवेकरणाशी संबंधित असल्याने ती सोडून इतर उपचार पध्दती बद्दल विचार करण्याचे सुचवले. त्यास लगोलग मान्यताही मिळाली.
मोठ्या विचारमंथनातून हाती काहीच येत नसल्याचे लक्षात येताच सर्वत्र चिडचिड वाढली. प्रत्येकजन एकमेकांवर रोष व्यक्त करत होता. वैचारिक मंथनातून हाती अमृत घेऊन धन्वंतरी येतील अशी अपेक्षा होती मात्र शेवटी समस्त पुरोगामीत्वाचे संरक्षक असणारे व सर्ववेळी, सर्व ठिकाणी अध्यक्षपदावर यावद्चंद्रदिवाकरौ विराजमान असलेल्या शकुनीकाकांचा सल्ला घेण्यावर एकमत झाले. माजी संपादकांनी क्षणाचाही विलंब न करता  त्यांना परिस्थिती सांगितली अन काका लगेच उपस्थित झाले (ते धन्वंतरीचा स्वरूपात हाती फाईल घेऊन आले)     
या फाईल ने अनेकांचे होत्याचे नव्हते केलेले असल्याने त्यात कोणता उपचार असेल याबद्दल उत्सुकता अन भीतीही निर्माण झाली.
काका : हे पहा, आपण सर्व एका समान व्याधींनी त्रस्त आहोत. (सर्वानी अत्यंत करुनायुक्त भावनेने माना डोलावल्या). त्यातून मुक्त होण्यासाठी मी काही उपचार संहिता आणली आहे. ती आपण वापरून बघू.
असे म्हणून काकानी फाईल उघडली.
त्यातील उपचार संहिता पुढीलप्रमाणे:
१)      सर्जिकल स्ट्राईक झालीच नाही हे वाक्य सकाळ दुपार संध्याकाळ जोराने म्हणायचे.  
२)      कृष्णाच्या कुंजात वसलेल्या व्यंगचित्रकाराची व्यंगचित्रे बघून जोराने हसायचे.  
३)      आपल्या नातेवाईकांशी बोलताना इमूलाला यांना शांततेसाठी नोबेल द्या अशी मागणी करायची.
(त्या महिला सदस्या या वाक्यावर खूपच खुश झाल्याने त्यांनी एकट्यानेच जोराने टाळ्या वाजवल्या )
४)      सकाळी उठल्याबरोबर अहिंसा, शांतता हा मंत्र म्हणत कोमट पाण्याने गुळण्या करायच्या.
५)      प्रतिगामी, प्रतिगामी असे म्हणत वमन झाल्यास अतिउत्तम.  
६)      कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र हा शब्द ऐकायचा नाही. अन्यथा युद्धज्वर वाढून घेरी येऊ शकते.
७)      सर्व प्रकारच्या निवडणुकीपासून लांब राहायचे. सोसायटीची सुध्दा नको.
८)      शक्यतो सोशल मिडियापासून लांब राहायचे.

अशी उपचारसहिंता पाळली तर किमान महिनाभरात युद्धज्वराचे निर्मुलन होऊ शकते.  पथ्ये पाळली तर आणि तरच उपचार यशस्वी होतील. अन्यथा सर्जरी करावीच लागेल अशी तंबी दिल्याने  सर्व जन प्रमाणापेक्षा जास्त गंभीर झाले.
काकांच्या या उपचार संहितेचे निष्ठेने पालन केले जाईल अशी सर्वांना शपथ देण्यात आली. अन ढोंगी पुरोगामी युद्धज्वरावर यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आनंद काकांच्या चेहऱ्यावर दिसला.

1 comment:

Tukaram said...

Surgical strike ला मराठीत काय म्हणतात माहित नाही, पण पुरोगाम्यांच्या "तो" तुम्ही ओळीने करून टाकला 😊😊😊😊