राज्यातील निवडणूका आज संपतील. प्रचाराची रणधुमाळी पूर्णपणे
थंडावली आहे. आरोप, प्रत्यारोपानी सभा गाजल्या. राजकारण हे कुस्तीसारखे असल्याचे
पुन्हा एकदा सिध्द झाले. म्हणजे मानसिक स्तरावर डावपेच तयार करूनच शारीरिक ताकद
लावायची असते.
राज्यस्तरावर विचार करता ही कुस्ती भाजप अन कॉंग्रेस या दोन
पैलवानात होती. परंतु लढताना दिसले भाजप अन राज ठाकरे. राज्यात भाजप अन राज ठाकरे यांच्यात कुस्ती
व्हावी हा भाजपचा व्यूहरचनात्मक विजय आहे. याचे कारण असे की, जो प्रमुख विरोधी
पक्ष आहे त्या कॉंग्रेसला फोकसच मिळु नये हे त्यांचे अपयश. अन ज्या राज ठाकरेंचा
एकही उमेदवार रिंगणात नसुनही सर्व फोकस त्यांनी आकर्षित करने हे त्यांचे यश.
राज ठाकरे भाजपवर आरोप करणार अन भाजप नेते त्याला सभेतुन
प्रत्युत्तर देणार. ही अशी कुस्ती रंगली होती.आणि कॉंग्रेस बिच्चारी हा सामना
निमुटपणे पाहत होती.
राज ठाकरे यांनी कोणाला मत द्या हे शेवटपर्यंत सांगितले नाही. फक्त
भाजपला मत देउ नका असे आवाहन केले. अशा प्रकारच्या प्रचाराने मतदार कॉंग्रेस
राष्ट्रवादीकडे वळतील ही भाबडी आशा आहे. कॉंग्रेसच्या प्रचारावर मीडीया फोकस असता
तर त्याचा थेट फायदा कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या उमेदवाराला झाला असता.
म्हणजे विरोधी पक्षाला जो काही फोकस मिळायला हवा होता. त्याचा
निम्मा भाग राज ठाकरे यांनी काबीज केला व कोणाला मतदान करा हे न सांगता.
उरलेल्या भागात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी
आपले बस्तान बसवले. जे की कॉंग्रेस राष्ट्रवादीला नुकसानकारक आहे.
राहिलेल्या भागावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रभुत्व
होते ज्यानी राहुल गांधी यांच्यासोबत एकही प्रचार सभा घेतली नाही. ते आजही
चंद्राबाबू, मायावती, ममता यांना पंतप्रधानपदाचे सक्षम उमेदवार मानतात.
अन सर्वात शेवटचा भाग कॉंग्रेसला मिळाला.
अशा प्रकारे अंगाला तेल लावून तयार असलेल्या एका पैलवानाला मैदान
रिकामे होण्याची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागले.
आता या सामन्याचा निकालासाठी २३ मे ची वाट बघावी लागणार.