महाराष्ट्र, राजकारण आणि सत्ताकेंद्र
अशा तीनही शब्दांना एकच समानार्थी शब्द म्हणजे शरद पवार. सत्ता कोणाचीही असो
सत्तेचे वलय या नावापासून कधीही वेगळे झाले नाही. राज्यात अन केंद्रातही ज्यांचा
शब्दाला कायम वजन होते असे नाव म्हणजे शरद पवार. वसंतदादाकडून सत्ता मिळवण्याची
घाई असो किंवा तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या
मुद्द्यावरून राष्ट्रवादी नावाने नवीन पक्षाची स्थापना अन पुन्हा
सत्ताप्राप्तीसाठी कॉंग्रेसच्या सरकारमध्ये मंत्रीपद
स्वीकारणे असो प्रत्येकवेळी सत्ताप्राप्ती हेच एकमेव ध्येय दिसून आले. सत्ता असो
वा नसो शरद पवार या नावाभोवती सत्तेचे वलय कायम राहिले. मात्र कायम सत्तेत
राहण्याच्या महत्वकांक्षेने मोठे वलय निर्माण केलेल्या या नावाभोवती
सत्ताप्राप्तीचे भुकेले गोळा झाले. आणि अर्थातच जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत ही
भुकेली मंडळी पवार साहेंबांसोबत होती अन सत्ता दूर होताना दिसताच ही मंडळी आपली
भूक भागवण्यासाठी नवीन ताट शोधायला बाहेर पडली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने
सत्ताप्राप्ती साठी शरद पवार साहेबानी वेळोवेळी भूमिका बदलली त्याच पध्दतीने
त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर जात आहेत. त्यामुळे सत्ताप्राप्तीची
महत्त्वाकांक्षा या अस्त्राने पवारांनी साम्राज्य उभे केले तेच अस्त्र आज पवारांवर
उलटत आहे.
खरे पाहता पवार साहेबांना राज्यातील
शेतीची अन शेतकऱ्यांची स्थिती आमुलाग्र बदलता आली असती. शेतकरी आत्महत्याकडे वळलाच
नसता. तेवढा वेळ अन शक्ती पवार साहेबांकडे नक्कीच होती. प्रश्न होता तो प्रखर
राजकीय इच्छाशक्तीचा. मात्र पवार साहेबानी पारंपारिक मतदार खुश राहण्यासाठीच प्रयत्न
केलेले दिसतात. म्हणजे राज्यात दलित मुस्लीम वोटबँक कायम आपल्या सोबत रहावी यासाठी
स्वतःस वेळोवेळी पुरोगामी म्हणवून सिद्ध करणे हा एक अलिखित नियम होता. म्हणून
साहेबांनी शेट्टीची जात काढणे, सातारच्या संभाजीराजेना खासदारकी मिळाल्यावर पेशवे-छत्रपती
असा अत्यंत जातीयवादी उल्लेख करणे, जातीयवादी दृष्टीकोनातून
पुणेरी पगडी नाकारणे कधीही गैर मानले नाही. कडेलोट म्हणजे राष्ट्रवादी च्या
आव्हाडानी इशरत जहांच्या नावाने रुग्णवाहिका सुरु केल्या, सेव्ह
गाझा म्हणून निदर्शने केली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भात राज्यभर जातीयवादाला
चिथावणी दिली. या सर्व वेळी शरद पवार शांत होते. यात त्याना काहीही गैर वाटले
नाही. या सर्व प्रकाराने पवार साहेब अन त्यांच्या पक्षाबाबत समाजाच्या एका वर्गात
कायम नकारात्मक भाव निर्माण झाला. विशेष म्हणजे ज्यांनी त्यांना वर्षानुवर्षे
मतदान केले त्यांच्याही पदरात फार काही पडले नाही. त्यांनाही याची जाणीव झाली अन
त्यातून राज्यात वंचित बहुजन आघाडी जन्माला आली. अन पदार्पणातच तीने कॉंग्रेस
राष्ट्रवादीला धूळ चारली. वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते खऱ्या
अर्थाने धास्तावले आहेत.
मराठा आरक्षण हा पक्षाच्या हातातील
शेवटचा मुद्दा होता. मात्र विद्यमान सरकारने संवैधानिक मार्गाने आरक्षण दिले अन ते
टिकलेही. न्यायालयात ते टिकले नसते तर त्या मुद्द्यावर राष्ट्रवादीने विधानसभेचे
मैदान गाजवले असते अन कदाचित राष्ट्रवादीची पडझड थांबली असती. मात्र ती शक्यता संपल्याने
आता राष्ट्रवादीकडे विधानसभा निवडणूक जिंकून देईल असा कोणतांही ठोस मुद्दा उरला
नाही. अशा निर्वाणीच्या स्थितीत पक्षालां उभारी देणारा घटक म्हणजे गावपातळीवरील
सामान्य कार्यकर्ता. मात्र पक्ष कायम नेत्यांच्या ताब्यात राहिला अन कार्यकर्ता
कार्यकर्ताच राहिला. अनेकवेळा तर सभागृहातील व व्यासपीठावरील उपस्थिती समसमान होती
की अशी शंका यायची. स्व.आर.आर.पाटील वगळता कार्यकर्ता नेता झाल्याचे उदाहरण पक्षात
सापडत नाही. म्हणून जे मुळातच नेते होते अन सत्ता उपभोगण्यास आले होते ते दूर जाणे
अगदीच नैसर्गिक आहे. जसे साहेब कॉंग्रेसपासून दूर झाले तसेच राष्ट्रवादीतील नेते
पक्षापासून दूर होत आहेत. अन त्यासाठी सत्ताधारी पक्षाला बोल लावणे हे शरद
पवारांना शोभणारे नाही. कारण राष्ट्रवादी हा मुळातच सत्ताप्राप्तीची
अतिमहत्वकांक्षा असणाऱ्या प्रस्थापित नेत्यांचा गोतावळा होता. त्याची संघटनात्मक
बांधणी कधी झालीच नाही. तसे असते तर आजचे हे घाउक प्रमाणात होणारे पक्षांतर झाले
नसते. म्हणून एका अर्थाने सत्तावादी पक्षाची झालेली ही वाताहात ही आज ना उद्या
होणारच होती. त्यात अनपेक्षित असे काहीच नाही. फक्त ती वेळ लवकर आली इतकेच.