विद्यापीठ की विश्रामगृह ? - दर्पण

Wednesday, November 20, 2019

विद्यापीठ की विश्रामगृह ?


सुखार्थी त्यजते विद्यां विद्यार्थी त्यजते सुखम् ।
सुखार्थिन: कुतो विद्या कुतो विद्यार्थिन: सुखम् ॥
जो व्यक्ती सुखाच्या मागे धावतो त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही अन ज्याला ज्ञान प्राप्त करायचे आहे त्याने सुखाचा त्याग केला पाहिजे. विद्या प्राप्त करायची असेल तर सुख कसे मिळेल ?
देशातील केंद्रीय विद्यापीठात जो काही गोंधळ चालू आहे त्या पार्श्वभूमीवर हे सुभाषित लक्षात घेण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या या प्रामुख्याने सोई-सुविधा संदर्भात आहेत. आणि जर मुद्दा केवळ फीवाढी संदर्भात असेल तर त्याला कमवा व शिका सारख्या योजना राबवून मार्ग काढता येऊ शकतो. जे की, देशातील बहुसंख्य विद्यार्थी करतात. परंतु येथे प्रश्न असा आहे की, मुळात शिक्षण प्राप्त करणे हे अंतिम ध्येय आहे का ? असे असते तर अन्य कुठलेही प्रश्न उपस्थित झाले नसते. मुळात विद्यापीठ हे आंदोलन करण्यासाठी नसून ज्ञान प्राप्त करण्यासाठी आहे हेच आपण विसरून चाललो आहोत की काय अशी शंका निर्माण होत आहे.     

एखाद्या देशाचे यशापयशाचे गमक तेथील शिक्षण व्यवस्थेत सापडते. लौकिकार्थाने शिक्षण म्हणजे केवळ अर्थार्जनासाठी आवश्यक पात्रता निर्माण करणे असा अर्थ घेतला जात असला  तरी शिक्षण म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया असाच आहे.
  
     शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या भावभावनांचे क्षेत्र व्यापक होणे  ही व्याख्या रवीन्द्रनाथानी केली.  
विद्यार्थ्याला ज्ञान मिळवण्याची असणारी जिज्ञासा ही ज्ञान मिळवण्याच्या या सर्व प्रक्रियेत अत्यंत मुलभूत पात्रता असते. ही जिज्ञासा जेवढी तीव्र तेवढयाच गतीने ज्ञान प्राप्त होते. गुरु सुध्दा शिष्याला पारखून घ्यायचे व त्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा घ्यायचे. त्यातून जो उत्तीर्ण होईल त्याला ज्ञान मिळायचे. त्यामुळे शिष्याच्या विद्या प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत आराम, सुख-सोई,सुविधा वगैरे शब्दांना थाराच नसे. अशा स्थितीत मिळालेले ज्ञान अत्यंत परिपक्व असायचे.    
अगदी अलीकडील उदाहरण द्यायचे झाल्यास शामची आई सारखा नितांतसुंदर ग्रंथ लिहिणारे साने गुरुजी. शिक्षण घेत असताना त्यांच्या आयुष्यातील अडचणी, प्रतिकूल परिस्थिती कधीही अडथळा निर्माण करू शकली नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, Super 30 चे आनंद कुमार या सर्वानी अत्यंत हलाखीच्या स्थितीत शिक्षण घेतले. अनेकवेळा तर उपाशीपोटी झोपून शिक्षण घेतले. परंतु कधीही गरिबीचे भांडवल केले नाही. याउलट देशाच्या, समाजाच्या उत्कर्षासाठी आपले अवघे जीवन समर्पित केले. जे दु: ख, हाल अपेष्टा वरील महान व्यक्तिमत्त्वानी सहन केल्या त्या येणाऱ्या पिढीला सहन करावे लागु नये म्हणुन जे.एन.यु. सारख्या केंद्रीय विद्यापिठातून कमी खर्चात शिक्षण उपलब्ध करुन दिले गेले. त्याच्या हेतु हाच होता की, येथे शिकलेल्या, ज्ञान संपादन केलेल्या विद्यार्थ्यानी देशाच्या, समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करावेत.
परंतु शिकायचे तर राहुच द्या. येथील विद्यार्थी गैरशैक्षणिक कामातच सतत व्यस्त असल्याचे दिसते. आजपर्यंत जे.एन.यु. मधील कोणते संशोधन देशाच्या, समाजाच्या उपयोगी पडले आहे. नुसती डफली वाजवून देशातील प्रश्न मिटणार आहेत का ? हॉस्टेल मधील चिकन बिर्याणीत तुप कमी वाढल्याने शिक्षणावर परिणाम होणार आहे का ? ज्याला प्रामाणिकपणे शिक्षण प्राप्त करायचे आहे त्यासाठी या बाबी अत्यंत गौण स्वरूपाच्या आहेत.

विद्यार्थ्याच्या या स्थितीला तेथील प्राध्यापक वर्ग जबाबदार असण्याची जास्त शक्यता आहे. विद्यार्थी घडण्यास अथवा बिघडण्यास शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असतो. शिक्षक हा विद्यार्थ्याच्या मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकाचे स्थान हे महत्वाचे असते. त्यामुळे लौकिक शिक्षणासोबतच आयुष्यात उपयोगी असणारे नैतिक शिक्षण विद्यार्थ्याला देणे हे शिक्षकाचे कर्तव्य असले पाहिजे. परंतु सद्यस्थितीत कर्तव्याचा हा भाग उत्तरोत्तर क्षीण होत असल्याचे चित्र आहे. म्हणूनच विद्यार्थी शिक्षणापेक्षा, गैरशैक्षणिक कार्यात व्यस्त होत असेल तर शिक्षकानी या गोष्टीचे आत्मचिंतन केले पाहिजे.

खरे पाहता जे.एन.यु.सारख्या विद्यापीठातून देशातील विविध समस्यांवर उपाय शोधणारे संशोधन होणे अपेक्षित आहे. तेथील अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अध्ययन- अध्यापन प्रक्रीयेसाठी उपयोगी असले पाहिजे. विविध ज्ञान शाखातील मुलभूत सिध्दांत, त्यातील बऱ्या वाईट बाजू यावर चर्चासत्रे, परिषदा यांनी विद्यापीठ परिसर गाजायला हवा. परंतु इथे गाजतो तो डफली च्या तालावर कसल्यातरी आजादी च्या घोषणा, आंदोलनानी. अशा स्थितीत अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बासनात गुंडाळली गेल्यास अजिबात आश्चर्य वाटू नये. आणि याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसतोय हे त्यांच्या लक्षात येऊ नये यासारखे दुर्दैव नाही.     

एकूण काय तर विद्यापीठ हे ज्ञान मिळवण्याचे केंद्र असावे त्याचे विश्रामगृह अथवा कुस्तीचा आखाडा होऊ नये हीच अपेक्षा.


x

No comments: