भिक्षा माई.... - दर्पण

Sunday, January 19, 2020

भिक्षा माई....

भिक्षा माई....
का कुणास ठाऊक पण एरवी सहज वाटणाऱ्या या आवाजामध्ये आज एक विशेष आकर्षण जाणवले
अन कुतूहलापोटी बाहेर जाऊन बघतो तर डोक्यावर फडके बांधलेले एक साधूबाबा होते. त्यांना बघून 
अंत:करणात शांतता निर्माण झाली. संसारी धावपळीने शीण गेल्यासारखा वाटला.
बाबा, ओ, बाबा  
(माझ्या आवाजाने त्यांची तंद्री तुटल्यासारखे वाटले.)  
अत्यंत आल्हाददायक नजरेने कटाक्ष टाकत माझ्याकडे बघून हसले.
 मी विचारले कुठले हो बाबा तुम्ही ?
(अत्यंत गंभीर हास्य वदन करत) या प्रश्नानेच तर हैराण झालोय रे....
(मला काहीच समजेना) म्हणजे हो बाबा ?
बाबा निघणार इतक्यात मी त्यांना बसण्याची विनवणी केली.  
बाबा ओट्यावर बसले अन बोलू लागले  
मी तर साधू-फकीर आहे रे, आम्हाला घर-दार बांधून जमत नाही. आम्ही आपले फिरत राहतो.
लोकांना चार भल्या गोष्टी सांगतो. काही लोकांना आवडत तर काहीना नाही आवडत.
बाबांचे शब्द कारंजाच्या तुषाराप्रमाणे अंगावर पडत होते.
आम्ही हे असे असतो. (फाटके कपडे, हातात झोळी कडे दाखवून बाबा सांगु लागले)
जन्मे न कोणी, मरे न कोणी, हा सर्व मायेचा खेळ
नीतीन वागा, जास्तीची हाव करू नका,
अडकू नका कशात ? नका दुखवू कोणाला
त्या एका मालिकची आठवण ठेवा
हेच सांगतो सर्वाला.
पण लोक विचारतात तुम्ही कोणत्या गावचे ? तुमचा जन्म कुठला ?
बाबा शून्याकडे बघून हसू लागले.
मी त्यांना भक्तीचा मुक्तीचा मार्ग दाखवतो
पण ते मला एकाच ठिकाणी बांधून टाकतात.
साधू घुमता भला हे पण कस कळात नाय त्यांना ?
मी बाबांना विचारलेल्या प्रश्नाबद्दल मला अपराधीपणा वाटू लागला. त्यामुळे बाबांची माफी मागून 
काही पैसे द्यावे असा विचार मनात आला ?
तेवढ्यात बाबा म्हणाले
भुकेलेल्या अन्न द्याव, पैसे नाही. हेच तर सांगतो ना मी, पण तुम्ही मला पैसे देता, सोने देता.
अनीतीने वागता अन मला पैसे, सोने देता. अशाने मी खुश होईल का ?
चांगले वागून मला साधी भिक्षा दिली तरी मी खूप आशीर्वाद देत असतो.             
बाबांच्या पायावर डोके ठेवून माफी मागितली.
चुकलो बाबा क्षमा करा. आता कोणत्याही साधूबाबाला कुठल्या गावचे म्हणून विचारणार नाही.
भिक्षेच्या बदल्यात बाबानी मलाच आयुष्यभराची शिदोरी दिली. 

No comments: