खोडसाळपणाचा धर्म - दर्पण

Friday, January 15, 2021

खोडसाळपणाचा धर्म

विवेकानंदांचा धर्म या  दै. लोकसत्ता मध्ये प्रकाशित लेखात दत्त प्रसाद दाभोळकर यांनी दावा केला आहे की,  शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले नव्हते. त्याला प्रतिवाद करणारा हा लेख. 


 

लाखो, करोडो हिंदूंच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देत आहे. सर्व धर्माची जननी असणाऱ्या धर्माच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देत आहे. मला गर्व आहे की, मी त्या धर्माचे प्रतिनिधित्व करतो ज्याने विश्वाला सहनशीलता व सर्व दर्शन स्वीकृतीची शिकवण दिली
 

हे वाक्य आहेत स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे केलेल्या जगप्रसिद्ध भाषणातील. परंतु दत्तप्रसाद दाभोलकर लेखात अत्यंत सहजतेने सांगतात की त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले नाही. इतका बुद्धिभ्रम पसरवणे केवळ पुरोगामित्व पांघरलेल्या विचारवंतांकडूनच होऊ शकते.

दाभोळकराना असे वाटत असेल की, विवेकानंदानी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करू नये. त्यासाठी त्यांच्या विदेशातील अपमानाचे प्रसंग सांगून, निवडक प्रसंग सांगून त्यांना हिंदू धर्मापासून विवेकानंदाना तोडून टाकू. परंतु त्यांनी लक्षात घ्यावे की, विवेकानंदानी हिंदू धर्माचे प्रतिनिधत्व केले नसते तर त्यांनी तसे स्पष्ट सांगितले असते. ज्याला स्वामी विवेकानंदाबद्द्ल किमान माहिती आहे. तो ही मान्य करेल की गुरुची परीक्षा घेणारे विवेकानंद अपरिहार्यता म्हणून गप्प बसतील हे शक्य नाही. इथे तर ते मला गर्व आहे असे आपल्या भाषणात सांगत आहेत. स्वामी विवेकानंदनी हिंदू धर्मातील वाईट चालीरीती, अनिष्ट प्रथा यावर कठोर प्रहार केले हे सत्यच आहे. पण म्हणून त्यांचा अन हिंदू धर्माचा संबंधच खोडून काढणे हा वैचारिक खोडसाळपणा आहे.

खरा प्रश्न असा दिसतो की, दाभोळकरानी काही अनिष्ट चालीरीती व प्रथांनाच हिंदू धर्म समजण्याची चूक केली आहे. रामकृष्ण मिशन, विदेशातील वेदांत सोसायटी या कोणत्या धर्माचे प्रतिनिधित्व करतात ? या संस्थाच्या वतीन प्रकाशित केल्या जाणाऱ्या ग्रंथांची यादी बघितली तरी लक्षात येईल. भगवद्गीता, उपनिषदे, नारद भक्ती सूत्र ही काही निवडक नावे.             

सामान्यपणे महापुरुषांचा विचारांचा अभ्यास, चिंतन, मनन करून स्वत:च्या व पर्यायाने समाजाच्या उन्नतीसाठी त्या व विचारांनुसार अनुकरण केले जाते. दाभोळकर मात्र विवेकानंदानाच स्वत:च्या विचारांच्या चौकटीत ओढून त्यांना अस्सल महाराष्ट्रीयन पुरोगामी सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. दु:खद बाब म्हणजे त्यांच्या या प्रयत्नात ते विवेकानंदांचाही उपमर्द करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अनेक अडचणीना तोंड देत एक भारतीय संन्यासी जागतिक परिषदेला उपस्थित राहतो. केवळ ऊपस्थितीच नाही तर सर्वांची वाहवा मिळवतो. हे दाभोळकरांच्या लेखी कौतुकास्पद नाही तर त्याऐवजी विवेकानंद यांचा तिथे कसा अपमान झाला याची रसभरीत वर्णने दाभोलकरांसाठी महत्वाचे. स्वामी विवेकानंद म्हणजे जत्रेत कुस्ती खेळणारा पहलवान असून त्याने ओलिंपिक स्पर्धेत भाग घेण्याचे स्वप्नही बघू नये. भारतीय म्हणून आपण किती करंटे आहोत याचा अनुभव दाभोलकरांच्या या शब्दातून प्रत्ययास येतो.

नरेंद्र नावाच्या या युवकाने रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करले. आध्यात्मिक साधना करून अद्वैत वेदांताच्या प्रसारासाठी आपले अवघे आयुष्य समर्पित केले. हिंदू धर्मातील पध्दतीने सन्यास दीक्षा ग्रहण केली. सन्यस्त जीवनाचे कठोर आचरण केले. अद्वैत वेदांताच्या प्रचार प्रसारासाठी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. अनेक युवकांना या मार्गाकडे प्रेरित केले. दाभोलकरांनी बुद्धी भ्रम पसरवण्यासाठी आणखी कितीही लेख लिहिले तरी ही वस्तुस्थिती बदलणारी नाही.

हिंदू तत्वज्ञान, अध्यात्म याला विवेकानंदानी नवा आयाम दिला. चुकीच्या गोष्टी वर कठोर प्रहार केले. धर्म हा केवळ चर्चेचा विषय नसून प्रत्यक्ष आचरणाचा विषय आहे असे ठाम प्रतिपादन केले. खरेतर त्यांच्या विचारांचे वारसदार असणाऱ्या भारतीयांनी त्यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक मार्गावरून चालत त्यांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. मात्र यापेक्षा विवेकानंद कसे पुरोगामी होते, हिंदू धर्माचा अन त्यांचा संबंध नव्हता हे ओढूनताणून सिद्ध करणे दाभोळकरांच्या दृष्टीने महत्वाचे.  

अशाने भारतीय नतदृष्ट, करंटेच असल्याचे वारंवार सिद्ध होते. ही वस्तुस्थिती नव्याने सांगण्याची आवश्यकता नव्हती परंतु विचारवंत म्हणवल्या जाणारे जेव्हा समाजात बुद्धीभ्रम पसरवतात तेव्हा व्यक्त व्हावेसे वाटते.

रामकृष्ण आश्रम, बेंगळूरू चे प्रमुख स्वामी हर्शानंदजी ज्यांचे नुकतेच देहावसान झाले. त्यांनी ‘A Concise Encyclopaedia of Hinduism’ हा ग्रंथ लिहिला. ज्याचे तीन खंड प्रकाशित झाले आहेत. दाभोळकरानी आपल्या लेखात अशा प्रकारची माहिती सांगितली असती तर कदाचित त्यांची चिकित्सक वृती प्रामाणिक वाटली असती. मात्र केवळ पूर्वग्रहदुषित विचारांनी प्रेरित होऊन स्वामी विवेकानंदाना आधुनिक पुरोगामीत्वाच्या चौकटीत खिळे ठोकून बसवण्याचा खोडसाळपणा करण्याने सत्य झाकले जाणार नाही.

विवेकानंदाना एका चौकटीत बळजबरीने ठोकण्यापेक्षा, त्यांना हिंदू धर्मापासून तोडण्यापेक्षा, हिंदुत्व या शब्दाची अलर्जी न बाळगता त्यांनी सांगितलेला अद्वैत वेदांत आचरणात आणण्याचा प्रयत्न केला,  तरी विवेकानंदांच्या कार्याचा हेतू सफल होईल.

No comments: