ऑनलाईन शिक्षणाची इष्टापत्ती - दर्पण

Friday, March 12, 2021

ऑनलाईन शिक्षणाची इष्टापत्तीअस म्हणतात की काळ कोणासाठी थांबत नाही, परंतु या पिढीने काल थांबलेला पाहिला. कधी कोणी कल्पनाही केली नसेल एवढी हादरवून टाकणारी स्तब्धता, भयाण काळरात्रीची शांतता मागील वर्षभरात अनुभवली. कोरोना या शब्दाने प्रचंड दहशत निर्माण केली. जी अजूनही पूर्णत: संपली नाही. या कालावधीत अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ झाली. आर्थिक घडी विस्कटली. शैक्षणिक वर्षाची परवड झाली. जिथे जीवनमरणाचाच प्रश्न असतो तिथे इतर बाबी दुय्यम ठरतात. परंतु या वादळातही जगण्याच्या विजीगिषु वृत्तीने आपले मार्ग शोधले. घरात राहूनच व्यापार, शिक्षण व  नौकरी करण्याचे मार्ग सापडले. टाळेबंदी काळात व नंतरही ऑनलाइन हा जीवनव्यवहारातील महत्वाचा शब्द बनला. विशेषत: शिक्षणाच्या बाबतीत तर सर्व काही भार ऑनलाइन माध्यमावरच होता. मात्र वर्षभरानंतरच्या कालावधी नंतर ऑनलाईन पर्यायाच्या बाबतीत सविस्तर विचार होणे आवश्यक आहे. याचे कारण असे की, ऑनलाईन शिक्षणाच्या जश्या जमेच्या बाजू आहेत तश्या कमतरताही प्रकर्षाने दिसून येत आहेत.

अध्ययन अध्यापन प्रक्रिया

प्रभावी अध्ययन, अध्यापनाचा विचार केला तर प्राथमिक, माध्यमिक  शिक्षणाच्या बाबतीत ऑनलाईन माध्यमाचा प्रभाव अत्यंत कमीच आहे. सुरुवातीच्या काळात अत्यंत उत्साहाने संगणक, मोबाईल समोर बसणारे विद्यार्थी थोड्या कालावधीत या प्रकाराला कंटाळल्याचे दिसून येत आहे. प्रभावी अध्ययण अध्यापन होण्यासाठी विद्यार्थ्याचे एकाग्र चित्त होणे आवश्यक असते.अध्यापन प्रक्रियेत शिक्षक विद्यार्थ्यात शिकण्याविषयी गोडी निर्माण करतात. एकदा हा रस निर्माण झाला की अध्ययन अध्यापन प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे होते.   

मात्र ऑनलाईन पध्दतीत असे एकाग्र चित्त होणे कष्टप्राय असल्याचे दिसून येते. म्हणजे प्रत्यक्ष वर्गात बसून जेवढ्या लवकर शिकवलेले आत्मसात केले जाते. तेवढे ऑनलाईन पध्दतीत निश्चितच होत नाही. तसेच गणित, विज्ञान या सारखे रुक्ष वाटणारे विषय ऑनलाईन माध्यमातून शिकवणे शिक्षकांसाठी अवघड आहे व त्यामुळे विद्यार्थ्यानाही अध्ययन करणे आणखी क्लिष्ट होऊन बसते.

साधनांची कमतरता

सर्वसाधारणपणे ऑनलाईन माध्यमाच्या जमेच्या बाजू बघितल्या तर, विद्यार्थ्यांना घरी बसून शिकता येणे, रेकॉर्डेड व्हिडीओ असतील तर त्याला वेळेचे बंधन नसणे या बाबी दिसून येतात. परंतु केवळ यामुळेच ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सर्वमान्य ठरतो असे नाही. त्यातही प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. ग्रामीण भागात जेव्हा ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह असतो तेव्हा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो तो साधनांचा. म्हणजे त्या कुटुंबात मल्टिमिडीया फोन असणे, पालकांनी तो केवळ ऑनलाईन शिक्षणासाठी घरात ठेवला जातो का ? तसेच इंटरनेट ची सुविधा हा यक्षप्रश्न ग्रामीण भागात भेडसावत असतो. कोणी कितीही करलो दुनिया मुठ्ठी में  च्या वल्गना केल्या तरी ग्रामीण क्षेत्रातील काही भाग मुठ्ठी च्या बाहेरच आहे. हे सर्व झाले साधनांचे.

मोबाईल चा अतिवापर  

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल जास्त वेळ विद्यार्थ्याच्या हातात असतो. त्यामुळे पालकांसमोर दुसरा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. विद्यार्थी ऑनलाईन वर्ग शिकवणी झाल्यानंतरही मोबाईलचा वापर करू लागल्याचे चित्र आहे. विविध मोबाईल गेम्स व इंटरनेट च्या अति वापराने विद्यार्थ्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षणापेक्षा गेम्स खेळणे व इंटरनेट वर सर्फिंग करण्याकडे जास्त कल होत आहे. यामुळे क्रमिक पुस्तका व्यतिरिक्त वाचन, मैदानी खेळ यासारख्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सवयीबाबतीत विद्यार्थी वर्गात अनुत्सुकता दिसून येत आहे.           

उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षासाठी सोयीचे

शालेय शिक्षणासाठी ऑनलाईन माध्यमामध्ये अनेक मर्याद असल्या तरी उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण हे वरदान ठरत आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुणे, मुंबईत येतात. त्यासाठी अनेकदा खर्चही आवाक्याबाहेरचा असतो. ऑनलाईन माध्यमातून त्यापेक्षा कितीतरी कमी खर्चात स्पर्धा परीक्षा वा उच्च शिक्षण घेता येते.

DTH तंत्रज्ञान

ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सर्वदूर पोहोचवण्यासाठी या मार्गातील अडथळे दूर करण्याची आवश्यकता आहे. अभ्यासक्रमाची रेकॉर्डेड व्हिडीओ पाहण्याची सुविधा ऊपलब्ध होणे. DTH सारख्या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक गावखेड्यापर्यंत विविध मनोरंजन, वृत्त वाहिन्या पोहोचल्या. याच पध्दतीने कमी खर्चात अभ्यासक्रमाचे व्हिडिओ या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाले तर शिक्षणाची गंगा सर्वदूर पोहोचेल. विद्यार्थ्याना एकाच मोबाईलवर अवलंबून ण राहता, विद्यार्थी गट निर्माण करून सामूहिकरीत्या शिक्षण घेऊ शकतील. मोबाईलच्या अतिवापराचाही धोका टाळता येऊ शकेल. पालकांनाही इतर साधनांवर अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही. इंटरनेट सुविधा ग्रामपंचायत स्तरापर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असणे तर गरजेचेच आहे, परंतु जर नसली तरीही DTH तंत्रज्ञानामुळे अभ्यासक्रम विना अडथळा बघून आत्मसात करता येऊ शकेल.

 

बदलत्या काळाबरोबर ऑनलाईन शिक्षण ही संधी म्हणूनच बघितले पाहिजे. परंतु त्यातील कमतरता दूर करणे आवश्यक आहे. 

(छायाचित्र : इंटरनेट वरून साभार ) 

No comments: