गुलामगिरी अजून कशी जात नाही ? - दर्पण

Sunday, April 25, 2021

गुलामगिरी अजून कशी जात नाही ?

जगात सर्वात वाईट काय असेल तर गुलामगिरीची भावना. आपला मालक जे सांगेल तसे वागायचे, काम करायचे अन तो जेव्हा तुकडा फेकेल त्याला आवडीने खायचे. त्याच्या हो मध्ये हो म्हणायचे. त्याच्या आवडी निवडी आपण वाहायच्या. आणि मनात कितीही कुंचबणा होत असली, घुसमट होत असली तरी चेहऱ्यावर कायम समाधान दिसेल याची काळजी घ्यायची. सर्वात महत्वाचे म्हणजे आपला मालक हाच आपला उद्धारकर्ता आहे ही कायम मनात ठेवायची. 

परकीय आक्रमकांनी शेकडो वर्ष भारतावर राज्य केले. ब्रिटिशांनी १५० वर्ष भारतीयांना गुलाम बनवले. स्वातंत्र्य मिळवण्याच्या यज्ञात अनेकानी आपले आयुष्याच्या समिधा समर्पित केल्या. खरेतर एवढा मोठा संघर्ष केल्यावर स्वातंत्र्योत्तर काळातील नेतेमंडळीनी गुलामगिरीचे जे प्रतिक असतील ते नष्ट करायला हवे होते. पण दुर्दैव म्हणजे याउलट घडते. आपल्याकडे विक्टोरिया टर्मिनस असते. औरंगजेब, अकबर, खिलजी च्या नावाने गावं असतात, रोड असतो. इतिहासात हे सर्व आक्रमक कसे उदारमतवादी होते हे शिकवत असतो. नुकतेच एका लाचारपणाची सीमा नसलेल्या(असिम) वाचाळवीराने कुंभमेळा अकबराने सुरु केला असल्याचे ज्ञान पाजळले. 

याला एकमेव कारण म्हणजे काही भारतीयांमध्ये रूजून बसलेली गुलामगिरीची भावना अनेकदा उफाळून येते. 

काहीजणाना आजही असे वाटते की, ब्रिटिशांनी रेल्वे, टेलिफोन, पुल, पोस्ट या सुविधा भारतीयांच्या सोयीसाठी निर्माण केल्या आहेत. त्याबदल्यात आपण किती जणांच्या प्राणाची आहुती दिली याची पर्वा नसते. 

एखादा स्वाभिमानी व्यक्ती गुलाम म्हणून राजसुख जरी मिळत असले तरी नाकारेल. स्वतःच्या कष्टाने मिळालेली शिळी भाकर त्याला गुलाम म्हणून मिळणाऱ्या पक्वानापेक्षा कितीतरी अधिक गोड वाटते.

मात्र प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक केदार शिंदेंची ब्रिटिशांची आवश्यकता अधोरेखित करणारी समजामाध्यमावरील पोस्ट बघितली की  स्वाभिमानी बाणा असलेली व्यक्तीमत्वे दुर्मिळ होत आहेत की काय अशी शंका येते. 

कोरोना संकटांच्या पार्श्वभूमीवर कोणाही नागरिकाला संताप येणे साहजिकच आहे, परंतु म्हणून ब्रिटिश आणखी काही दिवस भारतात हवे होते असे म्हणणे म्हणजे स्वाभिमानी भाकरी पेक्षा गुलामगिरीची पक्वान्नाची गोडी वाटत असल्याचे लक्षण आहे. 

शिंदे साहेब ब्रिटिशांच्या जुलमी अत्याचाराच्या बदल्यात तुम्हाला oxygen cylinder हवा होता का ? 

ब्रिटिशांनी रेल्वे, पुल, टेलिफोन भारतातील जनतेच्या सोयीसाठी नव्हे तर, त्यांना भारतीयाना म्हणजेच गुलामांना जास्तीत जास्त कसा त्रास देता येइल यासाठी तयार केल्या. कोणा क्रांतिकारकाच्या फाशीची वेळ निश्चितीसाठी, त्यांच्या घरच्यांवर अत्याचार करण्याच्या ऑर्डर देण्यासाठी, माहिती शेअर करण्यासाठीच्या मुख्य हेतूनेच टेलिफोनचा वापर सुरु केला. तसेच गुलामांना मारण्यासाठी, चिरडण्यासाठी वेळेत पोहोचता यावे म्हणूनच रेल्वेचा वापर करण्यात येत होता. 

त्यांच्या डोक्यात भारतीयांचा म्हणजे पुन्हा एकदा सांगतो गुलामांचा उद्धार करण्याचा विचार असता तर देश सोडून जाताना संपत्ती नेली नसती. कोहिनूर नेला नसता. रेल्वे, टेलिफोनच्या तारा त्यांना परत नेता येत नव्हत्या म्हणून त्या इथे आहेत. आणि हो ब्रिटीश त्या देशात गेले नव्हते तिथेपण रेल्वे, टेलिफोन, पोस्ट पोहोचली आहेत आहेत बर का. 

आणखी किती वर्ष त्यांनी फेकलेल्या तुकड्याला मेजवानी समजून चखळत राहणार ? 

आपल्याला याची कल्पना आहे का की अशा वक्तव्याचा परिणाम येणाऱ्या पिढीवर होतो. समजा त्यांच्या मनात ब्रिटिशांविषयी असे चित्र निर्माण झाले तर, की ब्रिटिश हे  अत्यंत कनवाळु ह्रदयाचे, आधुनिक तंत्रज्ञान अवगत असणारे होते व त्यामुळे त्यांनी भारतीयांच्या कल्याणासाठी, अत्यंत निस्वार्थी भावनेने रेल्वे, टेलिफोन  पोस्ट सुरु केले, पुल  बांधले. व म्हणून भारतीयानी क्रांतिकारकानी उगाचच फुकाची मेहनत घेतली अन त्यांच्याविरूध्द लढा दिला. 

चित्रपट माध्यमातून आपण जे मनोरंजन करता ते ठिकच आहे किंबहुना तेवढेच ठिक आहे. परंतु कृपया आम्हाला पुन्हा गुलामगिरीची आठवण होत राहील असे वक्तव्य करु नका.

No comments: